उद्योगपती अनिल अंबानी यांच्या नेतृत्वाखालील रिलायन्स एडीए समूहातील कंपन्यांविरोधात केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) शनिवारी मुंबईतील १७ ठिकाणी शोधमोहीम राबवली. रिलायन्स टेलिकॉम लिमिटेड, रिलायन्स कमर्शियल फायनान्स लिमिटेड, रिलायन्स होम फायनान्स लिमिटेड आणि त्यांच्या संचालकांविरोधात दाखल करण्यात आलेल्या तीन प्रकरणांमध्ये ही कारवाई करण्यात आली. सीबीआयकडून जारी करण्यात आलेल्या निवेदनानुसार, संबंधित कंपन्यांच्या संचालकांच्या निवासस्थानी तसेच बँकेतील निधी वळवण्यासाठी वापरल्या गेलेल्या मध्यस्थ कंपन्यांच्या कार्यालयांमध्ये ही छापेमारी करण्यात आली.
मुंबईतील सीबीआय प्रकरणांसाठीच्या विशेष न्यायालयाने ८ मे रोजी जारी केलेल्या सर्च वॉरंटच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. छापेमारीदरम्यान अनेक महत्त्वाचे आणि संशयास्पद कागदपत्रे जप्त करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. सीबीआयच्या माहितीनुसार, तपासादरम्यान अनेक मध्यस्थ कंपन्या एकाच पत्त्यावरून कार्यरत असल्याचेही समोर आले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
गेल्या काही महिन्यांत सार्वजनिक क्षेत्रातील बँका आणि LIC कडून मिळालेल्या तक्रारींवरून सीबीआयने अनिल अंबानी यांच्या नेतृत्वाखालील रिलायन्स समूहाविरोधात एकूण सात गुन्हे नोंदवले आहेत. हे सर्व प्रकरणे हजारो कोटी रुपयांच्या कथित आर्थिक गैरव्यवहाराशी संबंधित आहेत. या प्रकरणांमध्ये एकूण कथित नुकसानाची रक्कम २७,३३७ कोटी रुपये असल्याचे सांगितले जात आहे. यापूर्वीही सीबीआयने या प्रकरणांच्या नोंदीनंतर मुंबईतील १४ ठिकाणी छापेमारी केली होती.
हे ही वाचा:
मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात पंजाबचे मंत्री संजीव अरोरा यांना अटक
अखेर ममतांनी पराभव स्वीकारलाच!
शुभेंदू अधिकारी बनले भाजपचे पहिले मुख्यमंत्री!
९८ वर्षीय माखनलाल यांच्या पायाला मोदींनी केला स्पर्श, दिले आलिंगन…
रिलायन्स कम्युनिकेशनच्या बँकिंग व्यवहारांचे एकूण प्रभारी डी. विश्वनाथ आणि बँकिंग ऑपरेशन्स, निधीचा वापर व पेमेंट व्यवस्थापनात सक्रिय भूमिका बजावणारे अनिल कलय यांना २० एप्रिल रोजी अटक करण्यात आली होती. सीबीआयच्या निवेदनात म्हटले आहे की, दोन्ही आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. समूहाशी संबंधित प्रकरणांच्या तपासावर सर्वोच्च न्यायालय देखरेख ठेवत आहे.







