बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना या सत्तेतून बाहेर पडल्यानंतर जवळपास दोन वर्षांनी भारतात प्रथमच सार्वजनिकरित्या समोर येणार आहेत. ५ ऑगस्ट रोजी नवी दिल्लीत आयोजित करण्यात येणाऱ्या एका व्हर्च्युअल कार्यक्रमातून त्या माध्यमांशी संवाद साधणार असून, आपल्या पुढील राजकीय वाटचालीबाबत आणि बांगलादेशात परतण्याच्या योजनेबाबत महत्त्वाची भूमिका मांडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
२०२४ मध्ये बांगलादेशात झालेल्या विद्यार्थी आंदोलनानंतर निर्माण झालेल्या तीव्र राजकीय अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर शेख हसीना यांना पंतप्रधानपदाचा राजीनामा देऊन भारतात आश्रय घ्यावा लागला होता. त्यानंतर त्या भारतात वास्तव्यास असून त्यांनी कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमात किंवा औपचारिक माध्यमांपुढे हजेरी लावलेली नव्हती. त्यामुळे त्यांचा हा कार्यक्रम विशेष महत्त्वाचा मानला जात आहे.
हे ही वाचा:
उन्नती शर्माची कांस्यपदकाची कमाल
आषाढी वारीत एसटीला ₹४१.१८ कोटींचे उत्पन्न
कुरकुरेच्या पाकिटातील प्लास्टिकचा चेंडू गिळला, पाच वर्षांचा मुलगा दगावला
माझ्या हत्येचा कट रचला जात आहे;पप्पू यादवांचा खळबळजनक दावा
नवी दिल्लीतील फॉरेन करस्पाँडंट्स क्लब ऑफ साउथ एशिया (FCC South Asia) आयोजित या व्हर्च्युअल कार्यक्रमात शेख हसीना बांगलादेशातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य करण्याबरोबरच आपल्या पक्षाच्या भविष्यातील रणनीतीवरही बोलण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, त्या बांगलादेशात परतण्याबाबतचा आराखडाही यावेळी स्पष्ट करू शकतात, अशी माहिती समोर आली आहे.
अलीकडेच शेख हसीना यांनी योग्य वेळ आल्यावर बांगलादेशात परतण्याचा निर्धार व्यक्त केला होता. देशात परतल्यानंतर अटक, न्यायालयीन कारवाई किंवा इतर धोके संभवत असल्याची जाणीव असूनही त्या माघार घेणार नसल्याचे त्यांनी संकेत दिले आहेत. या पार्श्वभूमीवर त्यांचे ५ ऑगस्टचे भाषण बांगलादेशच्या राजकारणासाठी निर्णायक ठरू शकते, असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.







