व्हाइट हाऊसबाहेरील अमेरिकन सीक्रेट सर्व्हिसच्या सुरक्षा तपासणी नाक्यावर गोळीबार करणारा एक बंदूकधारी ठार झाल्याची माहिती सीक्रेट सर्व्हिसच्या प्रवक्त्याने सीबीएस न्यूजला दिली.
प्राथमिक तपासानुसार, संशयित व्यक्ती तपासणी नाक्यावर आली, तिने बॅगेतून शस्त्र बाहेर काढले आणि तेथे तैनात अधिकाऱ्यांवर गोळीबार सुरू केला.
सीक्रेट सर्व्हिसच्या कर्मचाऱ्यांनी प्रत्युत्तरादाखल गोळीबार केला, ज्यात संशयित जखमी झाला. त्याला रुग्णालयात नेण्यात आले, मात्र तेथे त्याचा मृत्यू झाला, असे प्रवक्त्याने सांगितले.
हे ही वाचा:
अंदमान समुद्रात मान्सूनची दमदार एन्ट्री
शिर्डीत आता क्षेपणास्त्रे, तोफगोळे, ड्रोन यांचे उत्पादन
बंगालमध्ये ईदची सुट्टी फक्त एका दिवसाची!
सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण
गोळीबाराच्या या चकमकीदरम्यान एक सामान्य नागरिकही जखमी झाला. मात्र, त्याला संशयिताच्या गोळ्या लागल्या की अधिकाऱ्यांच्या गोळीबारात जखमी झाला, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्या व्यक्तीच्या प्रकृतीबाबत तात्काळ कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.
सीक्रेट सर्व्हिसने सांगितले की, या घटनेत त्यांच्या कोणत्याही कर्मचाऱ्याला दुखापत झाली नाही.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प त्या वेळी व्हाइट हाऊसमध्ये उपस्थित होते, मात्र “या घटनेचा त्यांच्यावर कोणताही परिणाम झाला नाही,” असे प्रवक्त्याने स्पष्ट केले. व्हाइट हाऊसच्या एका अधिकाऱ्याने सीबीएस न्यूजला सांगितले की, राष्ट्राध्यक्षांना या गोळीबाराबाबत माहिती देण्यात आली आहे.
ही घटना अशा वेळी घडली, जेव्हा ट्रम्प आणि त्यांचे वरिष्ठ सल्लागार इराणसोबतचा संघर्ष संपवण्यासाठी शांतता कराराच्या प्रयत्नांवर लक्ष केंद्रित करत होते.
व्हाइट हाऊसच्या नॉर्थ लॉनवर उपस्थित असलेल्या अनेक पत्रकारांनी सांगितले की, संध्याकाळी सुमारे ६ वाजण्याच्या सुमारास त्यांना गोळीबारासारखे आवाज ऐकू आले. त्यानंतर सीक्रेट सर्व्हिस एजंट्सनी पत्रकारांना तात्पुरत्या लॉकडाऊनचा भाग म्हणून आत नेले.
व्हाइट हाऊसशी संबंधित निर्माता एमा निकल्सन यांनी सोशल मीडियावरील पोस्टमध्ये म्हटले की सीबीएस न्यूजची टीम चित्रीकरणाची तयारी करत असताना त्यांना व्हाइट हाऊसजवळ अनेक गोळ्यांचे आवाज ऐकू आले आणि त्यांनी तात्काळ आश्रय घेतला.
त्यानंतर सीक्रेट सर्व्हिस कर्मचाऱ्यांनी त्यांना व्हाइट हाऊसमध्ये नेले, असे त्यांनी सांगितले. व्हाइट हाऊसमधील लॉकडाऊन सायंकाळी ७ वाजण्यापूर्वी उठवण्यात आला.
अधिकाऱ्यांनी सांगितले की ते गोळीबाराच्या अहवालांची चौकशी करत आहेत आणि घटनास्थळी तैनात कर्मचाऱ्यांकडून माहिती पडताळत आहेत.
या घटनेनंतर व्हाइट हाऊस परिसरात सुरक्षा अधिक कडक करण्यात आली. सशस्त्र सीक्रेट सर्व्हिस एजंट्स नॉर्थ लॉन परिसरात फिरताना दिसले, तर पत्रकारांना आश्रयासाठी व्हाइट हाऊसच्या प्रेस ब्रीफिंग रूममध्ये “धावत जा” असे सांगण्यात आले. नंतर कारवाईचा भाग म्हणून नॉर्थ लॉन रिकामा करण्यात आला.
सुरक्षा धोक्याच्या पार्श्वभूमीवर सीक्रेट सर्व्हिसच्या स्नायपर टीम्सनाही व्हाइट हाऊसच्या छतावर तैनात करण्यात आले.
व्हाइट हाऊसबाहेरील शनिवारी झालेला हा गोळीबार, गेल्या महिन्यात ट्रम्प यांच्या हत्येचा कट उधळून लावण्यात आल्याच्या घटनेनंतर अवघ्या महिनाभरात घडला आहे. २५ एप्रिल रोजी वॉशिंग्टनमधील एका हॉटेलमध्ये आयोजित वार्षिक मेजवानीच्या दरम्यान हा कट उघडकीस आला होता.
कॅलिफोर्नियातील टॉरन्स येथील कोल टोमास अलन याच्यावर राष्ट्राध्यक्षांची हत्या करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. त्याने आरोप नाकारले असून तो सध्या फेडरल कोठडीत आहे.







