इस्रायलकडून गाझा शहरावर सतत होत असलेल्या हल्ल्यांदरम्यान, बुधवारी अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन डीसीमध्ये एक धक्कादायक घटना घडली. बुधवारी रात्री उशिरा एका ज्यू कार्यक्रमादरम्यान कॅपिटल ज्यूइश म्युझियमच्या बाहेर इस्रायली दूतावासाच्या दोन कर्मचाऱ्यांवर गोळीबार करण्यात आल्याची माहिती आहे. या गोळीबाराच्या घटनेत दोन्ही कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. इस्रायली दूतावासाने या घटनेची पुष्टी केली आहे. प्रवक्ते ताल नैम कोहेन म्हणाले की, “आम्हाला तपास संस्थांवर पूर्ण विश्वास आहे की ते हल्लेखोराला पकडण्यात आणि संपूर्ण अमेरिकेतील इस्रायली प्रतिनिधी आणि ज्यू समुदायांची सुरक्षा सुनिश्चित करण्यात यशस्वी होतील.”
वायव्य वॉशिंग्टन डीसीमधील तिसऱ्या आणि एफ स्ट्रीट्सजवळ, कॅपिटल ज्यूइश म्युझियम, एफबीआय फील्ड ऑफिस आणि यूएस अॅटर्नी ऑफिसजवळ, एका पुरूष आणि एका महिला कर्मचाऱ्याला गोळ्या घालून ठार करण्यात आले. हे जोडपे होते आणि काहीच दिवसांत ते लग्न करणार होते, अशी माहिती इस्रायलचे अमेरिकेतील राजदूत येचियल लीटर यांनी सांगितले. वॉशिंग्टन पोलिस प्रमुख पामेला स्मिथ यांनी सांगितले की, या घटनेतील एका संशयिताला ताब्यात घेण्यात आले आहे. यावेळी त्याने “फ्री पॅलेस्टाईन, फ्री पॅलेस्टाईन” असे घोषणा दिल्याचेही त्यांनी सांगितले. संशयित व्यक्ती हा ३० वर्षीय असून तो शिकागो येथील एलियास रॉड्रिग्जचा आहे.
इस्रायलचे अध्यक्ष आयझॅक हर्झोग आणि अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनीही या घटनेचा निषेध केला. इस्रायलचे अध्यक्ष आयझॅक हर्झोग यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, “वॉशिंग्टन डीसीमधील घटनेमुळे हताश झालो आहे. हे द्वेषाचे, यहूदी-विरोधी कृत्य आहे, ज्यामध्ये इस्रायली दूतावासातील दोन तरुण कर्मचाऱ्यांचा बळी गेला आहे.” आपल्या लोकांच्या आणि आपल्या सामायिक मूल्यांच्या रक्षणासाठी अमेरिका आणि इस्रायल एकत्र उभे राहतील. दहशतवाद आणि द्वेष आपल्याला तोडू शकणार नाहीत, असे ते पुढे म्हणाले.
हे ही वाचा:
‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये ३००० अग्निवीरांनी पाकला दाखवली ताकद!
हमास नेता मोहम्मद सिनवारचा खात्मा? काय म्हणाले पंतप्रधान नेतान्याहू
किरीट सोमय्यांना धमकी देणारा युसुफ अन्सारी तडीपार
राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भावना व्यक्त करताना म्हटले की, वॉशिंग्टन, डीसीमध्ये अलिकडच्या काळात झालेल्या हत्या, ज्या त्यांना वाटते की ते स्पष्टपणे यहूदी-विरोधी विचारसरणीमुळे प्रेरित आहेत, ते त्वरित थांबवायला हवेत. त्यांनी यावर भर दिला की अमेरिकेत द्वेष आणि अतिरेकीपणाला कोणतेही स्थान नाही.







