पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने याला प्रत्युत्तर म्हणून ऑपरेशन सिंदूर राबवले. भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांचे तळ उध्वस्त केले आणि या महत्त्वाच्या मोहिमेत भारतीय सैन्याच्या अग्निवीरांनी मोलाची भूमिका बजावल्याची माहिती समोर आली आहे. ऑपरेशन सिंदूरच्या कामगिरीत तब्बल ३००० हून अधिक अग्निवीरांनीही आपले शौर्य दाखवले. गेल्या दोन वर्षात अग्निपथ योजनेअंतर्गत त्यांची भरती करण्यात आली होती.
ऑपरेशन सिंदूर दरम्यान सुमारे ३,००० अग्निवीर जे बहुतेक जेमतेम २० वर्षांचे आहेत आणि गेल्या दोन वर्षांत अग्निपथ योजनेअंतर्गत भरती झाले आहेत हे सर्व आघाडीवर होते. त्यांनी पाकिस्तानी क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ल्यांपासून भारतीय लष्करी केंद्रांचे रक्षण केले. हवाई संरक्षण प्रणाली हाताळण्यात या शूर अग्निविरांनी महत्त्वाची भूमिका बजावली. ७ ते १० मे दरम्यान पाकिस्तानने केलेल्या क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून ही कारवाई करण्यात आली होती, ज्यामध्ये अनेक भारतीय लष्करी तळ, हवाई तळ आणि शहरांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता.
माहितीनुसार, या आव्हानात्मक काळात अग्निवीरांनी त्यांच्या प्रशिक्षणाचा पुरेपूर वापर केला आणि त्यांच्या धैर्याने त्यांनी नियमित लष्करी सैनिकांप्रमाणेच कामगिरी केली. लष्कराच्या हवाई संरक्षण युनिट्सकडून मिळालेल्या अभिप्रायानुसार, अग्निवीरांनी शत्रूचे क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ले हाणून पाडून भारताचे रक्षण करण्यात त्यांची उपयुक्तता सिद्ध केली आहे. पाकिस्तानी क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ले हाणून पाडणाऱ्या अनेक हवाई संरक्षण प्रणालींमध्ये १५०-२०० अग्निवीर होते.
पश्चिम आघाडीवर तैनात असलेल्या अग्निवीरांना चार प्रमुख क्षेत्रांमध्ये विशेष प्रशिक्षण देण्यात आले होते. गनर्स, फायर कंट्रोल ऑपरेटर, रेडिओ ऑपरेटर आणि हेवी ड्युटी व्हेईकल ड्रायव्हर्स आणि या सर्व भूमिका त्यांनी चोख पार पाडल्या. स्थानिक पातळीवर विकसित केलेल्या ‘आकाश तीर’ हवाई संरक्षण नियंत्रण प्रणालीच्या संचालनात अग्निवीरांनीही महत्त्वाची भूमिका बजावली. शत्रूच्या हल्ल्यांची जलद ओळख पटवून त्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी ही प्रणाली महत्त्वाची ठरली. आकाश तीर हे गेल्या वर्षीच सैन्यात दाखल झाले आणि ते भारताच्या बहुस्तरीय हवाई संरक्षण प्रणालीचा एक महत्त्वाचा भाग बनले आहे.
हे ही वाचा:
हमास नेता मोहम्मद सिनवारचा खात्मा? काय म्हणाले पंतप्रधान नेतान्याहू
किरीट सोमय्यांना धमकी देणारा युसुफ अन्सारी तडीपार
पाकच्या मदतीने चीनचा नवा डाव; CPEC चा विस्तार अफगाणिस्तानपर्यंत होणार
भारत आणि पाकिस्तानमधील या युद्धाने पुन्हा एकदा अग्निपथ योजनेची प्रासंगिकता सिद्ध केली. ही योजना २०२२ मध्ये लागू करण्यात आली. याअंतर्गत सैनिकांची भरती फक्त चार वर्षांसाठी केली जाते. त्यापैकी फक्त २५ टक्के लोकांना पुढील १५ वर्षांसाठी नियमित सेवेत सामावून घेतले जाते. या योजनेमुळे राजकीय वादविवाद निर्माण झाला होता मात्र आता कठीण प्रसंगी अग्निविरांनी आपली कामगिरी चोख बजावत आपले महत्त्व अधोरेखित केले आहे.
