युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी दावा केला आहे की, युक्रेनियन सैन्याने पुन्हा एकदा रशियातील महत्त्वाच्या लष्करी आणि ऊर्जा पायाभूत सुविधांवर यशस्वी लांब पल्ल्याचे हल्ले केले आहेत. विशेष म्हणजे, एका आठवड्यात दुसऱ्यांदा मॉस्कोमधील तेल शुद्धीकरण प्रकल्पाला लक्ष्य करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वरील पोस्टमध्ये झेलेन्स्की यांनी म्हटले की, “गेल्या रात्री आमच्या लांब पल्ल्याच्या कारवायांनी पुन्हा मॉस्को प्रदेशापर्यंत मजल मारली. या आठवड्यात दुसऱ्यांदा मॉस्कोच्या तेल रिफायनरीवर हल्ला करण्यात आला. याशिवाय रोस्तोव प्रदेश आणि युक्रेनच्या तात्पुरत्या ताब्यात असलेल्या भागांतील अनेक लक्ष्यांवरही कारवाई करण्यात आली.”
झेलेन्स्की यांच्या मते, हे हल्ले रशियाकडून युक्रेनमधील शहरे आणि नागरिकांवर सातत्याने होत असलेल्या हल्ल्यांना दिलेले योग्य प्रत्युत्तर आहे. तसेच रशियाची युद्धयंत्रणा चालविण्यास मदत करणाऱ्या महत्त्वाच्या ठिकाणांना लक्ष्य करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला. या मोहिमेत सहभागी झालेल्या युक्रेनच्या संरक्षण आणि सुरक्षा दलांचे त्यांनी विशेष कौतुक केले. युक्रेनची सुरक्षा सेवा, मानवरहित प्रणाली दल, विशेष अभियान दल, संरक्षण गुप्तचर विभाग आणि क्षेपणास्त्र तुकड्यांनी अत्यंत अचूकतेने कामगिरी बजावल्याचे त्यांनी नमूद केले.
झेलेन्स्की म्हणाले की, “गेल्या काही दिवसांत आमच्या मध्यम आणि लांब पल्ल्याच्या कारवायांची अचूकता आणि परिणामकारकता आमच्या सर्व आंतरराष्ट्रीय भागीदारांनी नोंदवली आहे. आता हे युद्ध संपवण्याची वेळ आली असून, रशियाने राजनैतिक पातळीवर आवश्यक पावले उचलली पाहिजेत.”
हे ही वाचा:
घुसखोरीमुळे स्थानिक लोकसंख्या रचनेत होतोय बदल
फाल्टा पोलीस ठाण्यावर हल्ला प्रकरणी सात जण अटकेत
पाकिस्तानातील गुरुद्वारात वृद्ध शीख दाम्पत्याची गोळ्या झाडून हत्या
पोस्ट केली, नंतर एडिट केली! अमेरिका-इराण कराराबाबत घोषणेची पाकिस्तानची घाई
दरम्यान, फ्रान्समधील एव्हियन येथे झालेल्या G7 समीट परिषदेत सहभागी झालेल्या झेलेन्स्की यांनी युक्रेनला आंतरराष्ट्रीय भागीदारांकडून महत्त्वाचा पाठिंबा मिळाल्याचेही सांगितले. रशियावरील दबाव वाढविणे आणि युक्रेनची संरक्षण क्षमता अधिक मजबूत करण्यासाठी अनेक महत्त्वाच्या उपाययोजनांवर सहमती झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले. रशिया-युक्रेन युद्ध सुरू असतानाच दोन्ही बाजूंनी एकमेकांच्या महत्त्वाच्या पायाभूत सुविधांवर हल्ले सुरू ठेवले आहेत. अशा परिस्थितीत मॉस्कोच्या तेल शुद्धीकरण प्रकल्पावरील या ताज्या हल्ल्यामुळे संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
