अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ओव्हल ऑफिसमधून एलोन मस्क यांच्यासोबत माध्यमांशी संवाद साधताना पुन्हा एकदा भारत आणि पाकिस्तानमधील तणाव कमी करण्याचे श्रेय घेतले आणि असे सुचवले की अमेरिकेच्या हस्तक्षेपामुळे संभाव्य अणु संघर्ष रोखण्यास मदत झाली.
ट्रम्प म्हणाले, “आम्ही भारत आणि पाकिस्तानला युद्ध करण्यापासून रोखले. मला वाटते की ते अणु आपत्तीत बदलू शकले असते.” परिस्थिती कमी करण्यात भूमिका बजावल्याबद्दल ट्रम्प यांनी दोन्ही देशांच्या नेत्यांचे तसेच त्यांच्या प्रशासनाचे आभार मानले. व्यापारविषयक चिंता अधोरेखित करताना ट्रम्प पुढे म्हणाले, “आपण अशा लोकांशी व्यापार करू शकत नाही जे एकमेकांवर गोळीबार करत आहेत आणि संभाव्यतः अण्वस्त्रे वापरत आहेत.”
दरम्यान, ट्रम्प यांच्या विधानावर भारताकडून तात्काळ प्रतिक्रिया आली. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी स्पष्ट केले की, भारत आणि पाकिस्तान यांच्यात १० मे रोजी झालेला युद्धबंदी करार दोन्ही देशांच्या लष्करी ऑपरेशन्स महासंचालक (डीजीएमओ) यांच्यातील थेट संपर्कातून झाला होता.
“या मुद्द्यावर आमची भूमिका १३ मे रोजी आधीच स्पष्ट करण्यात आली आहे. ७ मे रोजी ऑपरेशन सिंदूर सुरू झाल्यापासून १० मे रोजी झालेल्या युद्धबंदी करारापर्यंत, भारत आणि अमेरिकेच्या नेत्यांमध्ये लष्करी परिस्थितीवर चर्चा झाली होती. यामध्ये कुठेही व्यापार किंवा शुल्काचा उल्लेख नव्हता,” असे जयस्वाल म्हणाले.
हे ही वाचा :
‘दहशतवादाला पाठीशी घालणाऱ्यांना मोठी किंमत मोजावीच लागेल’
पाकिस्तानी गुप्तहेर कासिमनंतर त्याचा भाऊ असीमलाही घेतले ताब्यात!
शशी थरूर यांच्या खंडनानंतर कोलंबियाने ‘ते’ विधान घेतले मागे!
दरम्यान, भारत आणि पाकिस्तान युद्धबंदीसाठी मध्यस्थी केल्याचा दावा करणारे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपले विधान नुकतेच मागे घेतल्याचे समोर आले होते. मी भारत आणि पाकिस्तानमधील तणाव दूर करण्यास मदत केली होती, असे ट्रम्प म्हणाले होते. १५ मे रोजी कतारची राजधानी दोहा येथे एका कार्यक्रमाला संबोधित करताना डोनाल्ड ट्रम्प यांनी हे विधान केले होते. मात्र, आता पुन्हा एकदा भारत-पाक युद्धबंदीत मध्यस्थीचा त्यांनी दावा केला आहे.







