अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मंगळवारी अमेरिकेच्या नवीन क्षेपणास्त्र संरक्षण प्रणाली, गोल्डन डोमसाठी महत्त्वाकांक्षी योजनेची घोषणा केली आहे. १७५ अब्ज डॉलर्सच्या गोल्डन डोम क्षेपणास्त्र संरक्षण प्रणालीचा मुख्य उद्देश हा चीन आणि रशियाकडून निर्माण होणाऱ्या धोक्यांपासून अमेरिकेचे संरक्षण करणे असणार आहे. व्हाईट हाऊसमधून बोलताना ट्रम्प यांनी स्पष्ट केले की, त्यांनी या प्रकल्पासाठी अंतिम डिझाइन निवडले असून यूएस स्पेस फोर्स जनरल मायकेल गुएटलिन यांना या उपक्रमाचे प्रमुख म्हणून नियुक्त केले आहे.
“गोल्डन डोम ही संरक्षण प्रणाली अमेरिकेचे संरक्षण करेल, असा विश्वास डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केला. तसेच कॅनडाने या कार्यक्रमात सहभागी होण्यास रस दाखवला आहे असेही त्यांनी सांगितले. ही प्रणाली २०२९ मध्ये म्हणजेच ट्रम्प यांचा कार्यकाळ संपण्यापूर्वी पूर्णपणे कार्यरत होईल आणि अंतराळातून सोडलेले क्षेपणास्त्रे रोखण्याचीही याची क्षमता असेल, असे ट्रम्प म्हणाले. डोनाल्ड ट्रम्प यांनी या वर्षाच्या सुरुवातीला केलेल्या भाषणात गोल्डन डोमचा उल्लेख केला होता आणि त्यासंदर्भातील कार्यकारी आदेशावर स्वाक्षरी देखील केली होती.
गोल्डन डोम संरक्षण प्रणाली काय आहे?
गोल्डन डोम ही येणाऱ्या क्षेपणास्त्रांचा शोध घेण्यासाठी, त्यांचा मागोवा घेण्यासाठी आणि अडथळा आणण्यासाठी शेकडो उपग्रहांवर अवलंबून राहण्याची शक्यता आहे. ही प्रणाली इस्रायलच्या ‘आयर्न डोम’पासून प्रेरित आहे. आयर्न डोम हे धीम्या गतीने चालणाऱ्या क्षेपणास्त्रांना आणि कमी पल्ल्याच्या रॉकेटना रोखण्यासाठी बांधले गेले असले तरी, अमेरिकेला असलेला क्षेपणास्त्रांचा धोका खूप वेगळा आहे. दोन्ही प्रणालींमधील फरकाचा एक मोठा भाग म्हणजे भूभागाचा आकार जो संरक्षित करणे आवश्यक आहे. अहवालानुसार, इस्रायल हा अमेरिकेपेक्षा ४०० पट लहान आहे आणि बहुतेक भाग हा सपाट वाळवंट असून त्याचे संरक्षण करणे सोपे आहे.
अमेरिकेवर हल्ला करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या क्षेपणास्त्रांमध्ये हमासच्या रॉकेटपेक्षा खूप फरक आहे. रशिया, चीन आणि अमेरिकेवर हल्ला करू शकणाऱ्या इतर कोणत्याही देशांकडे इंटरकॉन्टिनेंटल बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे आहेत, ज्यांचा वेग वेगवान आहे आणि त्यांचा पल्ला जास्त आहे. हायपरसोनिक क्षेपणास्त्र रोखण्याचा मार्ग म्हणजे अवकाशात असलेल्या तंत्रज्ञानाचा वापर करून क्षेपणास्त्र संरक्षण तयार करणे.
हे ही वाचा:
‘ऑपरेशन सिंदूर’ मदरशांच्या अभ्यासक्रमात शिकवले जाणार
शीख गुरूंबद्दलच्या वादग्रस्त क्लिपमुळे ध्रुव राठीने युट्युबवरून व्हिडीओ हटवला
“राहुल गांधी नव्या युगाचे मीर जाफर”
ज्येष्ठ खगोल शास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर काळाच्या पडद्याआड
या अंतर्गत कक्षेत असे उपग्रह ठेवण्याची कल्पना आहे जे क्षेपणास्त्रे शोधू शकतील आणि नंतर त्यांच्या उड्डाणाच्या सुरुवातीलाच त्यांच्यावर मारा करू शकतील. उपग्रह पृथ्वीभोवती फिरत राहतात त्यामुळे त्यांना योग्य वेळी योग्य ठिकाणी ठेवणे हे या प्रणालीसाठी आव्हान असणार आहे. डोनाल्ड ट्रम्प यांचे निकटवर्तीय उद्योजक एलोन मस्क यांनी त्यांच्या स्टारलिंक इंटरनेट उपग्रहांद्वारे दाखवून दिल्याप्रमाणे हे निश्चित करता येईल. पण ते खर्चिक काम असणार असल्याचे अहवालात म्हटले आहे.







