युट्युबर ध्रुव राठी पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकल्याचे समोर आले आहे. शीख धर्माबाबत अपलोड केलेल्या व्हिडीओमुळे ध्रुव राठीच्या अडचणी वाढल्या असून आक्षेप घेताच त्याने व्हिडीओ डिलीट केला आहे. अकाल तख्त, शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समिती आणि शिरोमणी अकाली दल (एसएडी) यांच्या विरोधानंतर ध्रुव राठी याला हा व्हिडिओ हटवावा लागला आहे.
ध्रुव राठी याने त्याच्या युट्युब चॅनेलवर ‘द राईज ऑफ शीख’ या नावाचा एक व्हिडीओ अपलोड केला होता. या व्हिडीओत काही ग्राफिक्स तसेच एआयचा वापर करण्यात आला होता. दरम्यान, व्हिडीओतील एका क्लिपवर आक्षेप घेण्यात आला होता. ध्रुव राठीवर कारवाई करावी, अशी मागणी पंजाब तसेच इतर प्रांतातून होत होती. ध्रुव राठीच्या व्हिडिओला विरोध करणाऱ्या संघटनांनी म्हटले आहे की, या व्हिडिओमध्ये शीख गुरुंना सामान्य व्यक्ती म्हणून दाखवण्यात आले आहे. तसेच शीख गुरु गोविंद सिंह यांना बालपणी रडताना दाखवण्यात आले आहे.
व्हिडीओला विरोध झाल्यानंतर ध्रुव राठीने तो व्हिडीओ हटवला आहे. हा व्हिडीओ २४ मिनिटे ३७ सेकंदांचा होता. या व्हिडीओत शीख धर्माबाबत सांगण्यात आलं होतं. या धर्माचा इतिहास, शीख धर्मगुरू यावरही माहिती देण्यात आली होती. मात्र शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक कमिटीने (SGPC) या व्हिडीओवर गंभीर स्वरुपाचे आक्षेप घेतले होते. ध्रुव राठी याने काही ऐतिहासिक तथ्यांची मोडतोड केल्याचाही आरोप करण्यात येत आहे.
हे ही वाचा:
“राहुल गांधी नव्या युगाचे मीर जाफर”
ज्येष्ठ खगोल शास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर काळाच्या पडद्याआड
राजधानी एक्स्प्रेसला घातपात करण्याचा होता कट
“अमेरिका दहशतवाद्याला भारताच्या ताब्यात देऊ शकते, तर पाकिस्तान का नाही?”
दरम्यान, व्हिडीओवर वाद झाल्यानंतर ध्रुव राठी याने त्याची भूमिका स्पष्ट केली आहे. अनेकांनी व्हिडीओची प्रशंसा केली आणि व्हिडीओ चॅनेलवर ठेवावा असे आवाहन केले. मात्र, या व्हिडीओला हटवण्याचा निर्णय घेत असून व्हिडीओतील काही दृश्य शीख गुरूंच्या तसेच शिखांच्या धार्मिक भावनेविरोधात असल्याचे अनेकांचे मत आहे. हे प्रकरण धार्मिक तसेच राजकीय वादाचे कारण होऊ नये अशी भूमिका आहे.
