23 C
Mumbai
Thursday, December 11, 2025
घरदेश दुनियापाकिस्तान-अफगाणिस्तान संघर्ष का चिघळला?z

पाकिस्तान-अफगाणिस्तान संघर्ष का चिघळला?z

Google News Follow

Related

अफगाणिस्तानाचे परराष्ट्रमंत्री आमिर खान मुत्तकी सध्या भारत दौऱ्यावर येऊन गेले. हा दौरा प्रादेशिक कूटनीती आणि भौगोलिक-सांस्कृतिक समीकरणांच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा होता. दुसऱ्या बाजूला पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यातील सीमावादामुळे गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला लष्करी संघर्ष अधिकच चिघळला आहे. अफगाणिस्तानवर नियंत्रण मिळवल्यास मध्य आशियावर नियंत्रण प्रस्थापित करता येते, तसेच पश्चिम आशियातील सर्व अरब देशांवर आणि चीनचा शिनशियांग प्रांत तसेच रशिया यांच्यावरही नजर ठेवता येते. पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यातील संबंधांना ड्युरांड लाईन सीमारेषेच्या निश्चितीवरून वादाचा इतिहास असला तरी तालिबान आणि पाकिस्तानातील राज्यकर्ते आणि लष्कर यांच्यात मधुर संबंध होते. त्याचप्रमाणे भारत- अफगाणिस्तान यांच्यातील सांस्कृतिक संबंध ऐतिहासिक काळापासून चालत आलेले असले आणि भारत वेळोवेळी अफगाणिस्तानला मदत करत आलेला असला तरीदेखील गेल्या काही काळात ते काहीसे दुरावलेले होते. अशा परिस्थितीत भारत, अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यातील परस्परसंबंधांच्या नव्याने निर्माण होत असलेल्या समीकरणाने भारताला नक्कीच लाभ होईल यात शंका नाही. नरेंद्र मोदी यांच्या सरकारने स्वीकारलेल्या सावध आणि संयमी परराष्ट्र धोरणामुळेच आशियात स्फोटक परिस्थिती निर्माण होत असूनही भारताचे स्थान अधिकाधिक बळकट होत आहे.
पाकिस्तान-अफगाणिस्तान संघर्ष कसा पेटला
अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यामध्ये सध्या लष्करी संघर्षाचा भडका उडाला असून येणार्‍या काळात हा संघर्ष अधिक चिघळण्याची शक्यता दिसत आहे. अफगाण तालिबान पाकिस्तानात तालिबानच्या अतिरेकी इस्लामिक राजवटीच्या धर्तीवर अतिरेकी इस्लामिक राजवट आणण्याच्या उद्देशाने पाकिस्तानी तालिबानला (तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान किंवा TTP) मदत करत आहेत, हा पाकिस्तानचा संशय या संघर्षाच्या केंद्रस्थानी आहे.तहरीक-ए-तालिबान पाकिस्तानने या महिन्यात पाकिस्तानच्या सुरक्षा दलांवर हल्ले केले. त्यात २३ लोकांचा बळी घेणाऱ्या पोलीस प्रशिक्षण शाळेवरील झालेल्या आत्मघाती बॉम्बस्फोटाचाही समावेश आहे. या हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून, पाकिस्तानने काबूल आणि कंदाहार येथील तहरीक-ए-तालिबान पाकिस्तानच्या कथित ठिकाणांवर हल्ले केले. या हल्ल्याच्या बदल्यात, तालिबानच्या सैन्याने अफगाणिस्तान-पाकिस्तान यांच्यातील ड्युरांड लाईन या २,६०० किलोमीटर लांबीच्या वादग्रस्त सीमेवरील पाकिस्तानी लष्करी चौक्यांवर हल्ला केला. पाकिस्तानने अफगाणला जाणारे मार्ग बंद केल्यामुळे आधीच डबघाईस आलेल्या अफगाण अर्थव्यवस्थेला मोठा धक्का बसला.

दोन्ही देशांमध्ये १५ ऑक्टोबरच्या रात्री शस्त्रसंधीवर सहमती झाली, पण पाकिस्तानने १७ ऑक्टोबरच्या रात्री अफगाणिस्तानच्या पक्तिका भागात हवाई हल्ले केले. त्यात अफगाणिस्तानच्या स्थानिक क्रिकेट टीममधील कबीर, सिबगतुल्लाह आणि हारून या तीन उदयोन्मुख क्रिकेटपटूंसह काही नागरिक ठार झाले. त्यानंतर कतार आणि तुर्कस्तानच्या मध्यस्थीने १९ ऑक्टोबर रोजी पुन्हा उभय देशांमध्ये शस्त्रसंधी झाली. पण ही शस्त्रसंधी किती काळ टिकेल याबाबत शंका व्यक्त केल्या जात आहेत.

अफगाणिस्तानमध्ये १५ ऑगस्ट २०२१ रोजी दुसर्‍यांदा तालिबानचे शासन प्रस्थापित झाले. यापूर्वी १९९६ ते २००१ मध्ये अफगाणिस्तानवर तालिबानचा कब्जा होता. २०२१ नंतर पहिल्यांदा तालिबान आणि पाकिस्तान यांच्यामध्ये इतका मोठा संघर्ष उफाळून आला आहे.

पाकिस्तानच्या धोरणांमुळे पाकिस्तान-अफगाणिस्तान यांच्यात तणावनिर्मिती

अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत मेजवानी झोडल्यानंतर पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल आसिम मुनीर आणि पंतप्रधान शाहबाज शरीफ जग जिंकल्याच्या आविर्भावात भारतावर डोळे वटारत असले तरी सध्या पाकिस्तानात प्रचंड अंतर्गत असंतोष माजला आहे. विशेषतः पख्तुन लोकांचे वर्चस्व असलेल्या अफगाणिस्तान-पाकिस्तान सीमेवरील खैबर पख्तुनवा प्रांतात सातत्याने हिंसाचार सुरु आहे. हा भाग ब्रिटिशांनी १८९३ मध्ये आखलेल्या तत्कालीन ब्रिटिश भारत आणि अफगाणिस्तान यांच्यामधील २ हजार ६११ किमी लांब ड्युरांड लाईन या सीमारेषेलगत आहे.

अफगाणिस्तानला ही ड्युरंड लाईन मान्य नसल्यामुळे १९४७ साली पाकिस्तान स्वतंत्र झाल्यापासून अफगाणिस्तान-पाकिस्तान यांच्यात हा सीमावाद सुरु आहे. पाकिस्तानातील इस्लामाबाद पर्यंतच्या भागावर अफगाणिस्तान दावा सांगत आलेले आहे. या भागातील अनेक पख्तुनी टोळ्यांना पाकिस्तानचा अंमल मान्य नाही आणि संपूर्ण खैबर पख्तुनवा प्रांत त्यांचा असल्याचा दावा त्या करतात.

त्यामुळे दोन्ही देशातला सीमावाद भडकू नये यासाठी पाकिस्तानमधील लष्करी हुकुमशहा किंवा लोकशाही मार्गाने निवडून आलेल्या सर्व सरकारांचा अफगाणिस्तानमध्ये आपल्या मर्जीतले सरकार प्रस्थापित करण्याचा प्रयत्न असतो. विशेष म्हणजे सध्या अफगाणिस्तानमध्ये सत्तेत असलेल्या तालिबानला पाकिस्ताननेच अल् कायदाच्या मदतीने जन्माला घातले होते. कट्टरपंथी तरुणांवर लक्ष केन्द्रित करणाऱ्या तालिबानच्या माध्यमातून दहशतवाद्यांची एक मोठी फौज उभारून तिचा वापर भारताला रक्तबंबाळ करण्यासाठी करावा, असा पाकिस्तानचा डाव होता.

अल कायदा आणि तालिबानशी संबंध ठेवण्यासाठी अमेरिकेच्या तत्कालीन परराष्ट्रमंत्री हिलरी क्लिटंन यांनीदेखील पाकिस्तानला खडसावले होते. त्या म्हणाल्या होत्या की,‘तुम्ही ज्या सापाला दूध पाजत आहात आणि तुमची अपेक्षा आहे की ते साप शत्रूंना चावावेत; पण असे कधीही घडत नाही. साप हा साप असतो. तो कोणालाही डसू शकतो. उद्या तो तुम्हालाही डसायला कमी करणार नाही.’ परंतु हिलरी क्लिटंन यांच्या इशार्‍याकडे पाकिस्तानने दुर्लक्ष केले. अफगाणिस्तानातून अमेरिकन फौजा मागे फिरल्यानंतर पाकिस्तानच्या मदतीनेच तेथे तालिबानचे शासन प्रस्थापित झाले. आज त्याच तालिबानचा पाकिस्तानशी संघर्ष सुरु आहे.

अफगाणिस्तानचे परराष्ट्रमंत्री आमीर खान यांनी नुकतीच भारताला भेट दिली. भारतीय परराष्ट्रमंत्र्यांसोबत त्यांची चर्चा-वार्तालाप सुरू असतानाच पाकिस्तानने अफगाणिस्तानवर हवाई हल्ले केले हा केवळ योगायोग नाही. तालिबानने पहिल्यांदा जेव्हा अफगाणिस्तानवर कब्जा मिळवला होता, तेव्हा भारतातील जम्मू आणि काश्मीरमध्ये दहशतवादी हिंसाचाराने परमोच्च बिंदू गाठला होता. जैश ए मोहम्मद, लष्कर ए तैय्यबा यांसारख्या दहशतवादी संघटनांना तालिबानचा पूर्ण पाठिंबा होता. त्यामुळे भारताने अफगाणिस्तानसोबतचे सर्व संबंध तोडून टाकले होते.

हे ही वाचा:

उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन सेशेल्सकडे रवाना

‘छत्रपती संभाजीनगर’ या नावाने ओळखले जाईल औरंगाबाद रेल्वे स्थानक

ब्लिंक इट, ओला आणि उबेरमध्ये बांगलादेशी घुसखोर!

रश्मिका मंदानाच्या ‘द गर्लफ्रेंड’चा ट्रेलर प्रदर्शित

परंतु २०२१ नंतर अफगाणिस्तानात दुसर्‍यांदा तालिबानचे शासन प्रस्थापित झाले त्यावेळी परिस्थिती बदलली होती. गेल्या काही वर्षात भारताने अफगाणिस्तानात विकास प्रकल्पांमध्ये अब्जावधी डॉलर्सची गुंतवणूक केलेली आहे. हे विकासात्मक प्रकल्प पुढे सुरू राहावेत, तसेच अफगाणिस्तानच्या भूमीचा वापर पाकिस्तानकडून भारतविरोधी कारवायांसाठी केला जाऊ नये अशी भारताची भूमिका राहिली आहे. त्यामुळे आमीर खान यांनी त्यांच्या भारत दौऱ्यात स्पष्टपणे सांगितले की, “जैश ए मोहम्मद व लष्कर ए तैय्यबा या दहशतवादी संघटनांना आम्ही आमच्या भूमीवर पाय ठेवू दिलेला नाही.”

बगराम हवाई तळाचे महत्व

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अफगाणिस्तानची राजधानी काबूलपासून ३० किलोमीटर अंतरावर असणार्‍या बगरामचा एअरबेस आम्हाला परत द्या, अन्यथा परिणामांना सामोरे जा अशी उघड धमकी अलीकडेच तालिबानला दिली. तत्कालीन सोव्हिएत महासंघाने भौगोलिकदृष्ट्या अतिशय मोक्याच्या ठिकाणी बगराम विमानतळ बांधला होता.

अफगाणिस्तानवर नियंत्रण मिळवल्यास मध्य आशियातील कझाकिस्तान, उजबेकिस्तान, किरगिझस्तान परिसरावर तसेच पश्चिम आशियातील सर्व अरब देश, चीनचा शिनशियांग प्रांत तसेच रशिया यांच्यावर नजर ठेवता येते. त्यामुळे अफगाणिस्तानला ताब्यात घेण्यासाठी जागतिक महासत्तांनी सातत्याने प्रयत्न केले; पण कुणालाही यामध्ये यश आले नाही.

गेल्या काही महिन्यांमध्ये अमेरिकेचे रशिया आणि चीनशी संबंध पराकोटीचे ताणलेले आहेत. अशा स्थितीत बगराम हवाई तळावर नियंत्रण मिळवणे अमेरिकेसाठी अत्यंत महत्वाचे आहे. त्याचमुळे ट्रम्प विमानतळाचा ताबा मागत आहेत. त्यासाठी त्यांनी पाकिस्तानला जवळ केले आहे. पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल आसिम मुनीर यांनी बगराम हवाई तळाचा ताबा अमेरिकेला देण्यासाठी तालिबानशी बोलणी केली. परंतु तालिबानने यास पूर्णपणे नकार दिला. भारताने तालिबानच्या या निर्णयाला पाठिंबा दिला. त्यामुळे अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचे स्वप्न भंगणार आहे. या सर्व पार्श्वभूमीवर अफगाणिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांनी त्यांच्या भारत दौऱ्याच्या दरम्यान बगराम विमानतळावर भारताने उतरावे अशी अपेक्षा व्यक्त केली. ही खूप महत्वाची बाब आहे.

अफगाणिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांच्या भारत दौऱ्यामुळे उभय देशांचा एकमेकांबाबतचा बदलता दृष्टिकोन स्पष्ट दिसून आला. काबूलमधील भारतीय दूतावास पुन्हा सुरू होणार आहे. कदाचित २०१८ चा करारही पुढे सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो. या माध्यमातून अफगाणी सैन्याला प्रशिक्षण देण्यासाठी भारतीय सैन्य, भारतीय वायूदल पुन्हा अफगाणिस्तानात जाऊ शकतात. तसेच बगराम विमानतळावर भारतीय विमाने उतरू शकतात.

भारत-अफगाणिस्तान संबंधांमधील या सुधारामुळे पाकिस्तानची अवस्था अधिकच बिकट होण्याची चिन्हे दिसत आहेत. पूर्वेकडील संघर्षाचा सामना करताना जर्जर झालेल्या पाकिस्तानच्या पश्चिमेला अफगाणिस्तानमध्ये आता भारताचे स्थान अधिक मजबूत होत असल्याने पाकिस्तानची असुरक्षिततेची भावना वाढली आहे.

भारत-अफगाणिस्तान सलोख्याचा इतिहास

भारत-अफगाणिस्तान यांच्यात ऐतिहासिक काळापासून अनोखे सांस्कृतिक संबंध चालत आलेले आहेत. अफगाणी लोकांसोबत भारतीयांचे भावनिक बंध जुळलेले आहेत. मध्यंतरी तालिबानच्या काळात उभय देशात दुरावा आला होता. परंतु प्रतिकूल नैसर्गिक परिस्थिती आणि रशिया व अमेरिका यांच्या साठमारीमुळे सातत्याने अडचणीत येत असलेल्या अफगाणिस्तानला भारताने वेळोवेळी मदत केली आहे. २०२१ मध्ये तालिबानने अफगाणिस्तानचा कब्जा घेतल्यानंतर संपूर्ण जगाने या देशाकडे पाठ फिरवली होती. परिणामी, या देशातील नागरिकांवर उपासमारीचे संकट आले. त्यावेळी भारताने मानवतेच्या भूमिकेतून १० लाख टन गहू देऊन आपली भूमिका स्पष्ट केली होती. या सर्व बाबींची तालिबानला पूर्ण जाणीव आहे.

तालिबान सत्तेत आल्यावर थुई थुई नाचणाऱ्या पाकिस्तानला काश्मीर विजयाची स्वप्ने पडू लागली होती. आज मात्र परिस्थिती पूर्णपणे बदलली असून स्वतःचीच भूमी गमावण्याचा धोका पाकिस्तानला भेडसावत आहे. भारताच्या सावध व संयमी परराष्ट्र धोरणामुळेच ही परिस्थिती निर्माण झाली आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
284,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा