=अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील अलीकडील युद्धविरामानंतर काही आठवड्यांतच शांतता चर्चा पुन्हा एकदा गंभीर संकटात सापडल्याचे दिसत आहे. इराणच्या सरकारी वृत्तसंस्था ‘फार्स न्यूज’ने प्रसिद्ध केलेल्या कथित एका लीक अहवालानुसार, अमेरिकेने पाकिस्तानच्या मध्यस्थीने इराणसमोर पाच कठोर अटी ठेवल्या आहेत. त्याला प्रत्युत्तर म्हणून तेहराननेही स्वतःच्या पाच पूर्वअटी मांडल्या असून दोन्ही देशांमध्ये तडजोडीची शक्यता सध्या अत्यंत कमी असल्याचे स्पष्ट झाले आहे.
अहवालानुसार, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाची मागणी आहे की, कायमस्वरूपी शांतता करारापूर्वी इराणने आपल्या अणु आणि लष्करी संरचनेत मोठे बदल स्वीकारावेत. अमेरिकेच्या पहिल्या अटीमध्ये इराणने आपला ४०० किलोग्रॅम उच्च समृद्ध युरेनियम साठा थेट अमेरिकेकडे सुपूर्द करावा, असे म्हटले आहे. दुसऱ्या अटीत इराणने आपल्या बहुतांश अणु संरचना कायमस्वरूपी बंद कराव्यात आणि फक्त एकच अणु केंद्र सुरू ठेवण्याची परवानगी असेल, असे नमूद करण्यात आले आहे.
तिसऱ्या अटीमध्ये युद्धादरम्यान झालेल्या मोठ्या पायाभूत नुकसानीबद्दल इराणला कोणतीही भरपाई दिली जाणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. चौथ्या अटीप्रमाणे, परदेशात गोठवलेल्या इराणच्या अब्जावधी डॉलरच्या मालमत्तेपैकी २५ टक्के रक्कमही मुक्त केली जाणार नाही. पाचव्या अटीमध्ये प्रादेशिक युद्धविरामाला चर्चेच्या प्रगतीशी जोडत टप्प्याटप्प्यानेच कायमस्वरूपी शांतता शक्य असल्याचे सांगण्यात आले आहे.
याला उत्तर देताना इराणनेही स्वतःच्या पाच प्रमुख मागण्या पुढे केल्या आहेत. तेहरानने सर्व आघाड्यांवरील लष्करी कारवाया तात्काळ थांबवण्याची मागणी केली असून त्यात लेबनॉनमधील इस्रायली लष्करी मोहिमांचाही समावेश आहे. दुसऱ्या मागणीत १३ एप्रिलपासून लागू असलेली अमेरिकेची नौदल नाकेबंदी तातडीने हटवण्याची मागणी करण्यात आली आहे. तिसऱ्या अटीमध्ये इराणने अमेरिका आणि इस्रायलने युद्धात झालेल्या मोठ्या नुकसानीबद्दल पूर्ण आर्थिक भरपाई द्यावी, अशी मागणी केली आहे. चौथ्या अटीत सर्व अमेरिकन बँकिंग आणि व्यापार निर्बंध हटवून परदेशातील गोठवलेल्या इराणी मालमत्ता पूर्णपणे मुक्त करण्याची मागणी करण्यात आली आहे. पाचव्या अटीमध्ये होर्मूझ सामुद्रधुनीवरील आपल्या पूर्ण आंतरराष्ट्रीय सार्वभौमत्वाला मान्यता देण्याची मागणी इराणने केली आहे, जेणेकरून सागरी वाहतुकीवर नियंत्रण ठेवता येईल.
हे ही वाचा:
एअर शोदरम्यान दोन अमेरिकन लढाऊ विमानांची टक्कर; वैमानिक थोडक्यात बचावले
पंतप्रधान मोदी नॉर्वेमध्ये दाखल; पंतप्रधान स्टोरे यांनी केले स्वागत
बंगालमध्ये मौलांनांची भाषा बदलली… गाईचं मांस खाऊ नका, तिला राष्ट्रीय प्राणी घोषित करा!
“भारत समजून घेण्यात कमतरता” प्रेस स्वातंत्र्याच्या मुद्द्यावर भारताची भूमिका
दरम्यान, युद्धविराम कमकुवत होत असल्याचे संकेत मिळत आहेत. आठवड्याच्या शेवटी संयुक्त अरब अमिरातीतील बराकाह अणुऊर्जा प्रकल्पाजवळील बाह्य जनरेटरवर ड्रोन हल्ला झाला, तर इस्रायलने दक्षिण लेबनॉनमध्ये १०० हून अधिक हवाई हल्ले केले. या हल्ल्यांमध्ये पॅलेस्टिनी इस्लामिक जिहाद आणि हिजबुल्लाहच्या कमांडरांना लक्ष्य करण्यात आल्याचे सांगितले जाते.







