अमेरिकेच्या अलास्कातील नोमजवळ बेरिंग एअरचे विमान १० जणांसह गुरुवारी दुपारी बेपत्ता झाले होते. अलास्कातील उनालाक्लीट शहरातून दुपारी २:३७ वाजता (स्थानिक वेळेनुसार) उड्डाण केल्यानंतर दुपारी ३:१६ वाजता विमान रडारवरून अचानक गायब झाले. यानंतर बेपत्ता विमानाचा शोध घेण्यासाठी शोधमोहीम राबवण्यात येत होती. यानंतर संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले की, एका विमानाचे अवशेष समुद्रात साठलेल्या बर्फावर आढळून आले आहेत. विशेष म्हणजे हे अवशेष बेपत्ता झालेल्या विमानाच्या वर्णनाशी जुळते आहेत. विमानात तीन मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.
यूएस कोस्ट गार्डचे प्रवक्ते कॅमेरॉन स्नेल म्हणाले की, शोधमोहीम करणारे पथक अद्याप विमान पूर्णपणे उघडू शकलेले नाहीत. अजूनही शोध काम सुरू असून सध्या फक्त तीन जणांचे मृतदेह सापडले आहेत. यूएस कोस्ट गार्डचे दुसरे प्रवक्ते माईक सालेर्नो यांच्या म्हणण्यानुसार, बचाव पथक हे हेलिकॉप्टरने विमानाचा शोध घेत असताना त्यांना अवशेष दिसले. त्यानंतर त्यांनी विमानाच्या तपासासाठी दोन जणांना खाली उतरवले.
फ्लाइट रडारच्या आकडेवारीनुसार, नोमकडे जाणाऱ्या विमानाने गुरुवारी दुपारी स्थानिक वेळेनुसार दुपारी २:३७ वाजता अलास्काच्या उनालाक्लीट शहरातून उड्डाण केले. साधारण ३९ मिनिटांनंतर हे विमान अचानक रडारवरून गायब झाले. सेस्ना २०८ बी ग्रँड कॅराव्हॅन विमानात पायलटसह दहा प्रवासी होते. राष्ट्रीय हवामान सेवेनुसार, त्यावेळी हलकी बर्फवृष्टी आणि धुके होते, तापमान १७ अंश (उणे ८.३ सेल्सिअस) होते. विमान कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, विमान पूर्ण क्षमतेने चालत होते.
यूएस सिव्हिल एअर पेट्रोलने दिलेल्या रडार फॉरेन्सिक डेटावरून असे दिसून आले की, गुरुवारी दुपारी ३.१८ वाजता विमानात काहीतरी अशी घटना घडली ज्यामुळे त्यांना विमानाच्या उंचीमध्ये आणि वेगात जलद घट झाल्याचा अनुभव आला. मात्र याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. तसेच विमानातून येणाऱ्या कोणत्याही संकटाच्या सिग्नलची माहिती पोहचली नव्हती. विमानांमध्ये आपत्कालीन स्थिती शोधण्यासाठी ट्रान्समीटर असतो. समुद्राच्या पाण्याच्या संपर्कात आल्यास, हे उपकरण उपग्रहाला सिग्नल पाठवते, जे नंतर तो संदेश तटरक्षक दलाला परत पाठवते जेणेकरून विमान संकटात असल्याचे सूचित होईल. तटरक्षक दलाला असे कोणतेही संदेश मिळालेले नाहीत, असे त्यांनी सांगितले.
हे ही वाचा:
पंतप्रधान मोदी १२, १३ फेब्रुवारी रोजी अमेरिका दौऱ्यावर जाणार!
सुप्रिया सुळे याच ईव्हीएमवर जिंकल्या, मग राहुल गांधींची नौटंकी का?
जम्मू-काश्मीरमध्ये तीन पाकिस्तानी जवानांना टिपले, ७ घुसखोर ठार!
हे विमान बेपत्ता होणे ही आठ दिवसांत अमेरिकेतील तिसरी मोठी विमान दुर्घटना आहे. २९ जानेवारी रोजी देशाच्या राजधानीजवळ एक व्यावसायिक जेटलाइनर आणि लष्कराचे हेलिकॉप्टर यांच्यात टक्कर झाली, ज्यामध्ये ६७ जणांचा मृत्यू झाला. ३१ जानेवारी रोजी फिलाडेल्फियामध्ये एक वैद्यकीय वाहतूक विमान कोसळले, ज्यामध्ये विमानातील सहा जणांचा आणि जमिनीवर असलेल्या एका व्यक्तीचा मृत्यू झाला.
अलास्कामध्ये डोंगराळ प्रदेश आणि बदलते हवामान आहे. येथील अनेक गावे रस्त्याने जोडलेली नाहीत. विशेषतः हिवाळ्यात, कोणत्याही अंतराच्या प्रवासासाठी विमाने हा एकमेव पर्याय असतो. हिवाळ्यात या प्रदेशात अचानक बर्फवृष्टी आणि जोरदार वारे होण्याची शक्यता असते आणि हवामान खूप धोकादायक असते. बेरिंग एअर पश्चिम अलास्कातील ३२ गावांना नोम, कोटझेब्यू आणि उनालक्लीट या केंद्रांमधून सेवा देते. बेरिंग एअर ही अलास्कातील एक प्रादेशिक विमान कंपनी आहे जी सुमारे ३९ विमाने आणि हेलिकॉप्टर चालवते.







