महाराष्ट्रात झालेल्या विधानसभा निवडणुकींच्या निकालानंतर महाविकास आघाडीला एकही क्षण चैन पडत नाही. कारण लोकसभा निवडणुकीत जे त्यांना यश मिळाले ते विधानसभा निवडणुकीत पुरते धुवून निघाले. कुणालाही आश्चर्यचकित करेल असाच हा विजय महायुतीला मिळाला. पण या पराभवामुळे महाविकास आघाडीकडून सातत्याने निवडणुकीविषयीच शंका घेतली जाऊ लागली. कधी ईव्हीएमवर आरोप कर तर कधी निवडणूक आयोगालाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे कर असा प्रकार रोजच्या रोज होऊ लागला. लोकांच्या मनात शंकांचे काहूर माजवायचे असाच प्रयत्न महाविकास आघाडीने सुरू केला. पण आता या निकालाला तीन-चार महिने होऊन गेले तरी महाविकास आघाडी त्या धक्क्यातून बाहेर येऊ शकलेली नाही. राहुल गांधी यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेत नव्याने काही प्रश्न उपस्थित केले. सोबत संजय राऊत आणि सुप्रिया सुळेही होत्या.
राहुल गांधी यांनी आरोप केले की, महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत ३९ लाख मतदार आले कुठून? लोकसभा निवडणूक आणि विधानसभा निवडणूक या दरम्यानच्या पाच महिन्यांच्या काळात हे मतदार वाढले कसे ? असा त्यांचा सवाल आहे. शिवाय, गेल्या पाच वर्षांत ३२ लाख मतदार वाढले आहेत, याविषयीही त्यांच्या मनात शंका आहे. या मतदारांची नावे, पत्ते, फोटोग्राफसह आम्हाला देण्यात यावी अशी त्यांची निवडणूक आयोगाकडे मागणी आहे.
राहुल गांधी यांनी हे प्रश्न उपस्थित केले असले तरी त्याची उत्तरे आधीच निवडणूक आयोगाने दिलेली आहे. पण सध्या निवडणूक आयोग ही संस्थाच महाविकास आघाडीने आरोपीच्या पिंजऱ्यात उभी केलेली असल्यामुळे त्यांनी कितीही स्पष्टीकरणे दिली तरी त्याला केराची टोपली दाखविली जाते.
हे ही वाचा:
पंतप्रधान मोदी १२, १३ फेब्रुवारी रोजी अमेरिका दौऱ्यावर जाणार!
सुप्रिया सुळे याच ईव्हीएमवर जिंकल्या, मग राहुल गांधींची नौटंकी का?
जम्मू-काश्मीरमध्ये तीन पाकिस्तानी जवानांना टिपले, ७ घुसखोर ठार!
युनूस सरकार विरोधात पोस्ट केल्याप्रकरणी अभिनेत्रीवर देशद्रोहाचा गुन्हा!
निवडणूक आयोगाने म्हटले होते की, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान ४८ लाख ८१ हजार इतके मतदार वाढले. अर्थात, त्यातील ८ लाख मतदार हे अपात्र ठरले. त्यामुळे ४० लाख मतदारांची नोंदणी झालेली आहे. पण राहुल गांधी यांना याच ४० लाख मतदारांवर आक्षेप आहे. त्यावरही निवडणूक आयोगाने म्हटले आहे की, या ४० लाख मतदारांपैकी १८-१९ वयोगटातील ८ लाख मतदार आहेत तर २० ते २९ या वयोगटातील १७ लाख मतदार आहेत. असे एकूण २६ लाख मतदारांची नोंदणी झालेली आहे. म्हणजेच उरलेले १४ लाख मतदार हे प्रौढ मतदार आहेत. त्यातलेही काही नवे असतील. आता या सगळ्या ४० लाख मतदारांची यादी राहुल गांधी यांना हवी आहे. त्यातून ते पोलखोल करण्याचा प्रयत्न करणार आहेत. मुळात ही यादी दिल्यानंतर त्यातून साध्य काय होणार? या यादीतील सगळ्यांना महायुतीलाच मतदान केले हे सिद्ध करायचे आहे का आणि ते कसे सिद्ध होणार ? विनाकारण लोकांच्या मनात भ्रम निर्माण करण्याच्या पलिकडे याला काहीही अर्थ नाही.
संजय राऊत यांनी तर म्हटले की, हे ३९ लाख मतदार बिहारच्या निवडणुकीत दिसतील नंतर उत्तर प्रदेशच्या निवडणुकीतही दिसतील. यावर आता हसावे की रडावे? असे कुणाला करता येत असेल तर त्याची पद्धती संजय राऊत यांनी सांगायला हवी. पण संजय राऊत हे असे आरोप नेहमीच करत असतात. असे ३९-४० लाख मतदार एकाचवेळी निर्माण करणं आणि ते नंतर दुसऱ्या राज्यातही नेणं हे जर कुणाला शक्य असेल तर त्याला निवडणुकीत पराभूत करणे कुणालाही कधी शक्य होणार नाही. मात्र सध्या आपल्या निवडणुकीतील पराभवाला मान्य करायचेच नाही, अशी एक भूमिका महाविकास आघाडीने घेतलेली आहे. काहीही करून खापर दुसऱ्यांवर फोडायचे, म्हणजे आत्मपरीक्षण करण्याची आवश्यकता भासणार नाही, अशी ही स्थिती आहे.
एखादा मुलगा नापास झाल्यावर आपल्याकडून काय चुका झाल्या याचा विचार करत असेल तर ठीक पण तोच मुलगा जर पेपर कठीण काढला, प्रश्नपत्रिका काढणाऱ्यांनी आपल्याविरोधा कट कारस्थान केले, नाहीतर आपण पास झालोच असतो अशी भूमिका घ्यायला सुरुवात केली तर त्याला कुणीही कधी पास करूच शकणार नाही. तशीच गत महाविकास आघाडीची झाली आहे. हे सगळे आरोप मविआकडून आणखी किती काळ सुरू राहणार आहेत कोण जाणे? य़ासंदर्भात न्यायालयात जाण्याची धमकीही वारंवार दिली जाते, पण अद्याप कुणीही न्यायालयात जाऊन हे आरोप केलेले नाहीत. फक्त मतदार, निवडणूक आयोग, ईव्हीएम या मुद्द्यांवर उर बडवणे हेच काम आता मविआपाशी शिल्लक राहिले आहे. त्यामुळे केवळ मीडिय़ा ट्रायल करायची आणि लोकांच्या मनात संभ्रम निर्माण करायचा यापलिकडे महाविकास आघाडीचा कोणताही उद्देश नाही, हे पुरेसे स्पष्ट झालेले आहे.