उन्हाळा सुरू होताच बाजारात आंबा, टरबूज, खरबूज आणि लीचीसारख्या फळांची रेलचेल दिसू लागते. गोड चव, रसाळपणा आणि आकर्षक स्वादामुळे लीची हे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचे आवडते फळ आहे. पोषणतज्ज्ञही लीचीला जीवनसत्त्वे आणि अँटिऑक्सिडंट्सने समृद्ध मानतात. मात्र, हे फळ जितके फायदेशीर आहे तितकेच काही परिस्थितींमध्ये आरोग्यासाठी धोकादायकही ठरू शकते.
लीचीमध्ये व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात आढळते, जे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यास मदत करते. याशिवाय त्यामध्ये फायबर, पोटॅशियम, कॉपर आणि विविध प्रकारचे नैसर्गिक अँटिऑक्सिडंट्स असतात. त्यामुळे त्वचा, हृदय आणि एकूणच आरोग्यासाठी लीची उपयुक्त मानली जाते.
तज्ज्ञांच्या मते, लीचीतील व्हिटॅमिन सी शरीरात कोलेजन तयार होण्यास मदत करते. कोलेजन हे त्वचा, हाडे आणि रक्तवाहिन्या मजबूत ठेवण्यासाठी महत्त्वाचे प्रथिन आहे. तसेच लीचीतील फायबर पचनक्रिया सुधारते, आतड्यांचे आरोग्य राखते आणि बद्धकोष्ठतेसारख्या समस्यांपासून आराम देते. पोटॅशियममुळे रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास आणि शरीरातील द्रवांचे संतुलन राखण्यास मदत होते.
रिकाम्या पोटी लीची खाणे का ठरू शकते घातक?
वैज्ञानिक संशोधनांनुसार, कच्च्या किंवा अर्धपिकलेल्या लीचीमध्ये हायपोग्लायसिन-ए आणि मेथिलीन सायक्लोप्रोपाइल ग्लायसिन (MCPG) सारखी नैसर्गिक रसायने आढळतात. सामान्य परिस्थितीत ही रसायने गंभीर समस्या निर्माण करत नाहीत. मात्र, दीर्घकाळ उपाशी राहिल्यानंतर किंवा सकाळी रिकाम्या पोटी मोठ्या प्रमाणात लीची खाल्ल्यास त्यांचा विपरीत परिणाम होऊ शकतो.
रक्तातील साखर अचानक घसरू शकते
शरीराला ऊर्जेसाठी ग्लुकोजची आवश्यकता असते. जेव्हा एखादी व्यक्ती बराच वेळ अन्न खात नाही, तेव्हा शरीर साठवलेल्या ऊर्जेचा वापर करते. पण शरीरातील ऊर्जा साठा आधीच कमी असेल, तर समस्या निर्माण होऊ शकते. लीचीतील काही रसायने शरीराच्या नवीन ग्लुकोज तयार करण्याच्या प्रक्रियेत अडथळा आणू शकतात. त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी झपाट्याने कमी होऊ शकते. या अवस्थेला हायपोग्लायसेमिया असे म्हणतात.
मेंदूवर होऊ शकतो गंभीर परिणाम
रक्तातील साखर खूप कमी झाल्यास त्याचा सर्वाधिक परिणाम मेंदूवर होतो. मेंदू मुख्यतः ग्लुकोजवर अवलंबून असतो. पुरेशी ग्लुकोज न मिळाल्यास अशक्तपणा, चक्कर येणे, बेशुद्ध पडणे किंवा काही गंभीर प्रकरणांमध्ये झटके येण्याची शक्यता असते.
हे ही वाचा:
व्हेनेझुएलाच्या मदतीसाठी भारताचे ‘ऑपरेशन अमिस्ताद’
ऑपरेशन सिंदूरमधील सहा हुतात्म्यांची नावे प्रथमच जाहीर
राम मंदिर देणगी गैरव्यवहार प्रकरणानंतर चंपत राय यांचा राजीनामा
सिया दोषी असेल तर मृत्युदंडाची शिक्षा द्या!
तज्ज्ञांचा सल्ला
तज्ज्ञांच्या मते, लीचीमुळे समस्या तेव्हाच निर्माण होते जेव्हा ती रिकाम्या पोटी, अतिप्रमाणात किंवा कुपोषणाच्या अवस्थेत खाल्ली जाते. निरोगी व्यक्तीने संतुलित आहार घेतल्यानंतर योग्य प्रमाणात लीची खाल्ल्यास त्यातील जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटिऑक्सिडंट्सचा पुरेपूर फायदा मिळतो. त्यामुळे लीची खाणे टाळण्याची गरज नाही, मात्र ती उपाशीपोटी न खाणे आणि मर्यादित प्रमाणात सेवन करणे हे आरोग्यासाठी अधिक सुरक्षित मानले जाते.







