बॉलिवूडला राम राम ठोकत अभिनेत्री ममता कुलकर्णी यांनी साध्वी होण्याचा निर्णय घेतला होता. उत्तर प्रदेशमध्ये होत असलेल्या प्रयागराजमधील महाकुंभमध्ये ममता कुलकर्णी यांनी संन्यास घेत किन्नर अखाड्याचे महामंडलेश्वर पद स्वीकारले होते. यावरून मोठा वाद निर्माण झाला. अखेर ममता कुलकर्णी यांना महामंडलेश्वर पदावरून हटवण्यात आलं. तर, काही दिवसांनी त्यांनी किन्नर आखाड्याच्या महामंडलेश्वर पदाचा राजीनामा दिला. आता पुन्हा एकदा त्यांनी त्यांच्या निर्णयावरून यु- टर्न घेतला असून किन्नर आखाड्याच्या महामंडलेश्वर पदावर कायम असल्याचे म्हणत राजीनामा मागे घेतला आहे.
अलीकडेच १० फेब्रुवारी रोजी ममता यांनी एक व्हिडिओ पोस्ट करत किन्नर आखाड्याच्या महामंडलेश्वर पदाचा राजीनामा देण्याची घोषणा केली होती. त्या म्हणाल्या होत्या की, काही लोकांना माझे महामंडलेश्वर असण्यावर समस्या आहे. मात्र, आता ममता यांनी म्हटले आहे की, त्यांच्या गुरू लक्ष्मी नारायण त्रिपाठी यांच्यावर झालेल्या आरोपानंतर त्यांनी राजीनामा दिला होता, पण त्यांनीच राजीनामा नाकारला आहे. त्यांनी मला पुन्हा या पदावर आणले याबद्दल मी मनापासून आभारी आहे. भविष्यात माझे जीवन किन्नर आखाडा आणि सनातन धर्मासाठी समर्पित असेल.
किन्नर आखाड्याचे मुख्य पुजारी आचार्य महामंडलेश्वर डॉ. लक्ष्मी नारायण त्रिपाठी यांनी म्हटले की, यमाई ममता नंद गिरी किन्नर आखाड्याच्या महामंडलेश्वर आहेत आणि राहतील. त्यांनी असा दावा केला की, ममता कुलकर्णी यांनी भावनिक अवस्थेत राजीनामा दिला होता, परंतु तो स्वीकारण्यात आला नाही. याला ममता यांनी दुजोरा दिला आहे.
हे ही वाचा :
आणखी अनधिकृत भारतीय अमेरिकेतून येणार
ट्रम्प म्हणाले, बांगलादेशाबाबत मोदींनी निर्णय घ्यावा, आमची काहीही भूमिका नाही!
तुर्कीने काश्मीर मुद्द्यावर पुन्हा खुपसले नाक
पंतप्रधान मोदी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प भेट; कोणकोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
काही दिवसांपूर्वीचं ममता कुलकर्णी यांनी किन्नर आखाड्यात प्रवेश केला होता. त्यांना महामंडलेश्वर पदाची जबाबदारीही देण्यात आली होती. यावरून वाद सुरू झाला होता. यानंतर किन्नर आखाड्याचे संस्थापक अजय दास यांनी कठोर कारवाई केली. त्यांनी अभिनेत्री ममता कुलकर्णी हिला किन्नर आखाड्याच्या महामंडलेश्वर पदावरून हटवले. त्या सोबतच लक्ष्मी नारायण त्रिपाठी यांनाही आचार्य महामंडलेश्वर पदावरून हटवण्यात आले. तसेच दोघांचीही किन्नर आखाड्यातून हकालपट्टी करण्यात आली होती.