तुर्कीचे अध्यक्ष रेसेप तय्यिप एर्दोगान हे सध्या पाकिस्तानच्या दौऱ्यावर आहेत. एर्दोगन यांनी पुन्हा एकदा काश्मीर मुद्द्यावर भाष्य करत भारताच्या अंतर्गत बाबींमध्ये नाक खुपसण्याचे काम केले आहे. त्यांनी काश्मीरचा प्रश्न भारत आणि पाकिस्तानने चर्चेने सोडवण्याचा सल्ला दिला आहे. यापूर्वी काश्मीरच्या मुद्द्यावर भाष्य करणाऱ्या सर्वच देशांना भारताने काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग असून आमचा अंतर्गत मुद्दा आहे त्यामुळे इतरांनी त्यावर सल्ले देऊ नये असा कठोर इशारा दिलेला आहे. यावर आता पुन्हा तुर्कीच्या अध्यक्षांकडून ही टिपण्णी आली आहे.
तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष एर्दोगान हे दोन दिवसीय पाकिस्तान दौऱ्यावर आले आहेत. यावेळी त्यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान शेहबाज शरीफ यांची भेट घेत चर्चा केली. दोन्ही नेत्यांनी दोन्ही बाजूंमधील २४ करार आणि सामंजस्य करारावर स्वाक्षरी समारंभाचेही साक्षीदार म्हणून काम पाहिले. यानंतर, त्यांनी माध्यमांना निवेदने वाचून दाखवली, ज्यात त्यांचे द्विपक्षीय संबंध मजबूत करण्याचा संकल्प व्यक्त केला. यावेळीच एर्दोगान यांनी काश्मीर मुद्द्याबद्दलही चर्चा केली. त्यांनी म्हटले की, काश्मीर प्रश्न हा भारत आणि पाकिस्तान यांच्यातील चर्चेद्वारे सोडवला पाहिजे आणि काश्मिरी लोकांच्या आकांक्षांचा योग्य विचार केला पाहिजे. संयुक्त राष्ट्रांच्या ठरावानुसार या प्रश्नावर चर्चेतून तोडगा काढावा. आपले राष्ट्र, पूर्वीप्रमाणेच आजही आपल्या काश्मिरी बांधवांसोबत एकजुटीने उभे असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला.
राष्ट्राध्यक्ष एर्दोगान यांनी पाकिस्तानसोबत संबंध वाढवण्यात उत्सुकता दर्शवली आहे. यावेळी बोलताना शेहबाज म्हणाले की, पाकिस्तान हे तुर्की नेत्याचे दुसरे घर आहे आणि पाच वर्षांनंतर त्यांचे परत येणे खूप आनंददायी आहे. भूकंप आणि पुरात पाकिस्तानच्या पाठीशी उभे राहिल्याबद्दल त्यांनी तुर्कीये यांचे आभार मानले.
हे ही वाचा :
मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू!
जामिया मिलियाचे १४ विद्यार्थी ताब्यात; निदर्शनावेळी तोडफोड!
दलाई लामा यांना केंद्राकडून झेड श्रेणीची सुरक्षा प्रदान!
दरम्यान, जम्मू- काश्मीर आणि लडाख हे केंद्रशासित प्रदेश भारताचा अविभाज्य भाग होते आहेत आणि कायमचे राहतील यावर भारताने वारंवार भर दिला आहे. ५ ऑगस्ट २०१९ रोजी भारताने संविधानातील कलम ३७० रद्द केल्यानंतर, जम्मू आणि काश्मीरचा विशेष दर्जा रद्द केल्यानंतर आणि राज्याचे दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये विभाजन केल्यानंतर पाकिस्तान आणि भारत देशांमधील संबंध आणखी बिघडले.