बांगलादेशातील सध्याच्या संकटात अमेरिकेची कोणतीही भूमिका नसल्याचे स्पष्ट मत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मांडले. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या अमेरिका दौऱ्यावर असून वॉशिंग्टनमध्ये व्यापार आणि भारत- अमेरिका संबंधांवर चर्चा झालेल्या द्विपक्षीय बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत डोनाल्ड ट्रम्प यांनी ही भूमिका स्पष्ट केली.
डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या बांगलादेशमधील हिंसाचारासंबंधीची भूमिका स्पष्ट केली आहे. बांगलादेशमधील परिस्थितीमध्ये अमेरिकेचा काहीही संबंध नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. शिवाय पुढे त्यांनी हे ही स्पष्ट केले की, मी बांगलादेशचा प्रश्न पंतप्रधान मोदींवर सोडेन. दरम्यान, ट्रम्प प्रशासनाने त्यांच्या देणगीदार संस्थेच्या माध्यमातून बांगलादेशातील सर्व काम तात्काळ थांबवण्याची घोषणा केल्यानंतर, नोबेल पारितोषिक विजेते मुहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालील बांगलादेश सरकारला अमेरिकेने सर्व मदत थांबवली आहे. एजन्सीने भागीदारांना कळवले की, त्यांच्या बांगलादेश ऑपरेशन्स अंतर्गत सर्व प्रकल्प स्थगित करण्यात येणार आहेत.
बांगलादेशातील संकटाला विद्यार्थी आंदोलनाने सुरुवात झाली. पुढे जाऊन हे आंदोलन उग्र झालं आणि देशात सत्तापालट झाला. माजी पंतप्रधान शेख हसीना यांना बांग्लादेश सोडून भारतात आश्रय घ्यावा लागला. सध्या बांग्लादेशात कायदा-सुव्यवस्थेची स्थिती चिंताजनक आहे. अल्पसंख्यांक खासकरुन हिंदुंवर तिथे हल्ले सुरु आहेत. बंगलादेशकडून शेख हसीना यांच्या प्रत्यर्पणाची मागणी करण्यात येत आहे.
दरम्यान, पंतप्रधान मोदींनी अमेरिकेच्या राष्ट्रीय गुप्तचर संचालक तुलसी गॅबार्ड यांची भेट घेतली होती. गॅबार्ड यांच्याशी झालेल्या भेटीबाबत परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की, चर्चेचे मुद्दे हे द्विपक्षीय गुप्तचर सहकार्य वाढवणे, सायबर सुरक्षा, उदयोन्मुख धोके आणि धोरणात्मक गुप्तचर माहितीची देवाणघेवाण हे होते. तसेच बांगलादेशातील परिस्थितीबाबतही दोघांमध्ये चर्चा झाल्याचे मानले जाते.
हे ही वाचा :
जामिया मिलियाचे १४ विद्यार्थी ताब्यात; निदर्शनावेळी तोडफोड!
दलाई लामा यांना केंद्राकडून झेड श्रेणीची सुरक्षा प्रदान!
दिल्लीपुढे न झुकणारे आदित्य ठाकरे दिल्लीत राहुल गांधींची हुजरेगिरी करतायेत!
डोनाल्ड ट्रम्प यांनी गॅबार्ड यांना असाधारण धाडसी आणि देशभक्ती असलेली अमेरिकन महिला म्हणून संबोधले होते. ते म्हणाले की, तुलसी यांना आर्मी नॅशनल गार्डमध्ये तीन वेळा तैनात करण्यात आले आहे. तुलसी यांनीही राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी त्यांच्यावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल आभार मानले. तसेच पदाची शपथ घेतल्यानंतर, त्यांनी अमेरिकेच्या गुप्तचर समुदायावर पुन्हा लक्ष केंद्रित करण्याचे वचन दिले आहे.