उत्तर प्रदेशमधील प्रयागराज येथे महाकुंभ मेळ्याचे आयोजन करण्यात आले. या धार्मिक मेळ्यात सहभागी होण्यासाठी देश- विदेशातून करोडोंच्या संख्येने भाविक प्रयागराजमध्ये दाखल होत आहेत. गंगा, यमुना आणि सरस्वती नद्यांच्या संगमात पवित्र स्नान करण्यासाठी लोकांची गर्दी होत असताना नवनवे विक्रम यंदा रचले जात आहेत. १३ जानेवारीपासून ते शनिवार, १५ फेब्रुवारी रोजी सकाळपर्यंत ५० कोटीहून अधिक भाविकांनी पवित्र स्नान केले आहे. भाविक मिळेल त्या साधनाने प्रयागराजमध्ये दाखल होत आहेत.
प्रयागराजमध्ये दाखल होण्यासाठी भाविक रस्ते, रेल्वे, हवाई मार्गाचा वापर करत आहेत. अनेक अडथळे पार करत हे भाविक महाकुंभमध्ये दाखल होत आहेत. काही भाविक हे खाजगी जेट किंवा चार्टर्ड विमानांनीही प्रयागराजमध्ये पोहचत आहेत. प्रयागराज विमानतळावर दररोज मोठ्या संख्येने चार्टर्ड आणि खाजगी जेट येत आहेत. यामुळे विमानतळ व्यस्त असून अनेकांना वाहने पार्क करण्यात अडचणी येत आहेत. मात्र, विमानांच्या संख्येनेही नवा विक्रम रचला आहे.
प्रयागराजमध्ये ११ फेब्रुवारी रोजी सर्वाधिक ७१ चार्टर्ड विमाने उतरली, जी आजपर्यंतचा विक्रम आहे. ८ फेब्रुवारीपासून दररोज ६० हून अधिक चार्टर्ड आणि खाजगी विमाने येथे उतरत आहेत. आतापर्यंत एकूण ६५० चार्टर्ड विमाने येथे उतरली आहेत. हजारो सेलिब्रिटी, परदेशी राजदूत, व्हीआयपी लोक आणि नेते मंडळी चार्टर्ड विमानाने आले आहेत. चार्टर्ड फ्लाइट्स व्यतिरिक्त स्पाइसजेट, इंडिगो, एअर इंडियाच्या सुमारे ३०० नियमित फ्लाइट्स देखील आठवड्याला उतरत आहेत.
विमानतळ अधिकाऱ्यांच्या मते, एका दिवसात प्रयागराज विमानतळावर उतरणाऱ्या लोकांची संख्या ही सामान्य दिवसांमध्ये एका महिन्यात प्रयागराजमध्ये उतरणाऱ्या लोकांपेक्षा जास्त आहे. प्रयागराज सध्या देशातील सर्वात व्यस्त विमानतळांपैकी एक बनले आहे.
हे ही वाचा :
जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी संबंध असल्या कारणावरून तीन सरकारी कर्मचारी बडतर्फ
न्यू इंडिया बँकेच्या माजी मॅनेजरने १२२ कोटींवर मारला डल्ला
‘छावा’ सिनेमाने बॉक्स ऑफिसवर मारले मैदान!
अशातच, आतापर्यंत एकूण ५० कोटीहून अधिक भाविकांनी पवित्र स्नान केल्याने प्रयागराजमध्ये असलेल्या महाकुंभ मेळ्यात नवा विक्रम रचला गेला आहे. हा सहभाग कोणत्याही धार्मिक, सांस्कृतिक किंवा सामाजिक कार्यक्रमासाठी इतिहासातील सर्वात मोठा जमाव असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. जगात एकाच ठिकाणी इतके भाविक एकत्र येण्याची ही पहिलीच वेळ आहे. शिवाय आकडेवारीनुसार, त्रिवेणी संगमात पवित्र स्नान करणाऱ्या भाविकांची संख्या भारत आणि चीन वगळता जगातील कोणत्याही देशाच्या लोकसंख्येपेक्षा जास्त आहे.