दिल्ली विधानसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवानंतर आम आदमी पक्षाचे ‘आप’चे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. केंद्रीय दक्षता आयोगाने (CVC) भाजपाच्या ‘शीशमहल’ आरोपांची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिल्याने अरविंद केजरीवाल यांचा पाय आणखी खोलात गेला आहे. सीव्हीसीच्या आदेशानुसार नोव्हेंबरपासून या प्रकरणाची चौकशी सुरू होती.
अरविंद केजरीवाल यांचे अधिकृत निवासस्थान असलेल्या ६ फ्लॅगस्टाफ रोड बंगल्याचे नूतनीकरण करण्यासाठी झालेल्या खर्चाची सखोल चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. प्राथमिक अहवाल प्राप्त झाल्यानंतर, आता सविस्तर चौकशीचे आदेश जारी करण्यात आले आहेत. गेल्या वर्षी १४ ऑक्टोबर २०२४ रोजी भाजपा आमदार विजेंद्र गुप्ता यांनी या प्रकरणाची तक्रार सीव्हीसीकडे केली होती. राजपूर रोडवरील प्लॉट क्रमांक ४५ आणि ४७ आणि दोन बंगले (८-अ आणि ८-ब, फ्लॅगस्टाफ रोड) यासह सरकारी मालमत्ता पाडून नवीन घरांमध्ये विलीन केल्याचा आरोप करण्यात आला होता, ज्यामुळे ग्राउंड कव्हरेज आणि फ्लोअर एरिया रेशो (FAR) नियमांचे उल्लंघन झाले. ५ डिसेंबर २०२४ रोजी, सीपीडब्ल्यूडीच्या मुख्य दक्षता अधिकाऱ्यांनी (सीव्हीओ) विजेंद्र गुप्ता यांच्या तक्रारीवर आधारित तथ्यात्मक अहवाल सीव्हीसीला सादर केला. १३ फेब्रुवारी २०२५ रोजी, तथ्यात्मक अहवालाची तपासणी केल्यानंतर, सीव्हीसीने सीपीडब्ल्यूडीच्या सीव्हीओला या प्रकरणाची सविस्तर चौकशी करण्यास सांगितले.
विजेंद्र गुप्ता यांनी याबाबत दिल्लीचे उपराज्यपाल व्ही. के. सक्सेना यांना पत्रही लिहिले होते. त्यांनी लेफ्टनंट गव्हर्नर व्ही. के. सक्सेना यांना विनंती केली की, त्यांनी मालमत्तेला त्याच्या मूळ स्थितीत पुनर्संचयित करावे आणि जवळच्या सरकारी मालमत्तेवरील अतिक्रमणे विलंब न करता काढून टाकावीत.
हे ही वाचा :
३८ व्या राष्ट्रीय स्पर्धेत मल्लखांब क्रीडाप्रकारात निधी राणेची रौप्य पदकाची कमाई
बांगलादेशी, रोहिंग्यांना हुसकावण्यासाठी हिंदु राष्ट्र समन्वय समितीच्या माध्यमातून साताऱ्यात मोर्चा
महाराष्ट्रातही आता ‘लव्ह जिहाद’ विरोधात कायदा!
महाकुंभमध्ये लोटला जनसागर; पवित्र स्नान घेणाऱ्या भाविकांची संख्या ५० कोटी पार
विजेंद्र गुप्ता यांनी पत्रात पुढे लिहिले होते की, शहरातील रहिवासी मूलभूत गरजांसाठी संघर्ष करत असताना, ही आलिशान हवेली बांधण्यासाठी दिल्लीच्या तिजोरीतून कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले. माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी स्वतःला सामान्य माणूस असल्याचा दावा केला होता, परंतु त्यांनी स्वतःसाठी एक आलिशान राजवाडा बांधण्यासाठी जनतेच्या पैशाचा वापर केला. अरविंद केजरीवाल यांनी लोकांच्या कष्टाने कमावलेले पैसे त्यांच्या आलिशान राजवाड्यावर निर्दयपणे खर्च केले. हा केवळ भ्रष्टाचारच नाही तर जनतेचा विश्वासघातही आहे.