उत्तराखंड येथे नुकतेच ३८ व्या राष्ट्रीय स्पर्धेचे अयोजन करण्यात आले होते. देशभरातून मोठ्या संख्येने खेळाडू या स्पर्धेत सहभागी झाले होते. महाराष्ट्राने या स्पर्धेत चांगली कामगिरी केली. तर मल्लखांब स्पर्धेत मुंबईच्या सुपुत्रीने पदकाची कमाई करत यश संपादन केले आहे.
३८ व्या राष्ट्रीय स्पर्धेत मल्लखांब क्रीडाप्रकारात महाराष्ट्र संघाचे नेतृत्व करणाऱ्या निधी राणे हिने रौप्य पदकाची कमाई केली आहे. तिच्या या यशानंतर निधी हिच्यासह तिचे प्रशिक्षक आशिष देवल आणि संचिता देवल यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
प्रशिक्षक आशिष देवल यांच्याशी ‘न्यूज डंका’ने संवाद साधला असता त्यांनी निधी राणे हिने संपादित केलेल्या यशाचे कौतुक केले. त्यांनी सांगितले की, निधी राणे ही गेली १२ वर्षे सातत्याने मल्लखांबचा सराव करत आहे. पूर्वीपासून खेळाची आवड असलेली निधी मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर गेली चार वर्षे मल्लखांब क्रीडाप्रकारात राष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभाग घेत आहे. सध्या ती मुंबईतील बोरिवली येथील कल्चर सेंटरमध्ये प्रशिक्षक आशिष देवल यांच्या मार्गदर्शनाखाली मल्लखांबचा सराव करत धडे गिरवत आहे.
उत्तराखंडमध्ये झालेल्या ३८ व्या राष्ट्रीय स्पर्धेत रौप्य पदकाची कमाई करणाऱ्या निधी राणे हिने यापूर्वी गोव्यात झालेल्या ३७ व्या राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्ण पदकाला गवसणी घातली होती. तर, नुकताच क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, मुंबई उपनगर यांनी निधी राणे हिला २०२३- २४ चा ‘जिल्हा क्रीडा पुरस्कार’ प्रदान करुन सन्मानित केले. पालकमंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते निधी हिला हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. निधी राणे हिने प्राप्त केलेल्या यशानंतर लोकमान्य प्रतिष्ठान आणि सुविद्या प्रसारक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित गुणगौरव सोहळ्यात नेते गोपाल शेट्टी यांच्या हस्ते आणि द्रोणाचार्य पुरस्कार विजेते दिनेश लाड यांच्या प्रमुख उपस्थितीत निधी राणे, तिचे आई वडील आणि प्रशिक्षक आशिष देवल, संचिता देवल यांचा गौरव करण्यात आला.
हे ही वाचा :
बांगलादेशी, रोहिंग्यांना हुसकावण्यासाठी हिंदु राष्ट्र समन्वय समितीच्या माध्यमातून साताऱ्यात मोर्चा
महाराष्ट्रातही आता ‘लव्ह जिहाद’ विरोधात कायदा!
महाकुंभमध्ये लोटला जनसागर; पवित्र स्नान घेणाऱ्या भाविकांची संख्या ५० कोटी पार
महाराष्ट्रातील सर्व आयुक्तालयांमध्ये लवकरात लवकर नवे फौजदारी कायदे लागू करा!
प्रशिक्षक आशिष देवल हे स्वतः गेली ३१ वर्षे मल्लखांब क्रीडाप्रकारात सहभागी असून सध्या अनेक मुलांना ते घडवत आहेत. आशिष देवल यांनी स्वतः १३ वर्षे मल्लखांब क्रीडाप्रकारात राष्ट्रीय स्पर्धा गाजवल्या आहेत. त्यांना २०१०-११ सालचा ‘जिल्हा क्रीडा पुरस्कार’ ही मिळाला आहे. तर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आशिष देवल यांना २०२१- २२ साली महाराष्ट्र ‘स्वामी विवेकानंद युवा पुरस्कारा’ने सन्मानित केले आहे.