उत्तर प्रदेशमधील प्रयागराज येथे आयोजित महाकुंभ मेळ्याची उत्सुकता देशविदेशात असून या अध्यात्माची अनुभूती घेण्यासाठी या धार्मिक मेळ्यात सहभागी होण्यासाठी देश- विदेशातून करोडोंच्या संख्येने भाविक दाखल होत आहेत. गंगा, यमुना आणि सरस्वती नद्यांच्या संगमात पवित्र स्नान करण्यासाठी भाविकांचा जनसागर प्रयागराजमध्ये लोटला आहे. दिवसागणिक लोकांची संख्या वाढत असून नवनवे विक्रम यंदा रचले जात आहेत. अशातच महाकुंभाला सुरुवात झाल्यापासून म्हणजेच १३ जानेवारीपासून ते शनिवार, १५ फेब्रुवारी रोजी सकाळपर्यंत ५० कोटीहून अधिक भाविकांनी पवित्र स्नान केले आहे.
आतापर्यंत एकूण ५० कोटीहून अधिक भाविकांनी पवित्र स्नान केल्याने प्रयागराजमध्ये असलेल्या महाकुंभ मेळ्यात नवा विक्रम रचला गेला आहे. हा सहभाग कोणत्याही धार्मिक, सांस्कृतिक किंवा सामाजिक कार्यक्रमासाठी इतिहासातील सर्वात मोठा जमाव असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. जगात एकाच ठिकाणी इतके भाविक एकत्र येण्याची ही पहिलीच वेळ आहे. शिवाय आकडेवारीनुसार, त्रिवेणी संगमात पवित्र स्नान करणाऱ्या भाविकांची संख्या भारत आणि चीन वगळता जगातील कोणत्याही देशाच्या लोकसंख्येपेक्षा जास्त आहे.
महाकुंभाच्या सुरुवातीला, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या मेळ्यात ४५ कोटींहून अधिक भाविक प्रयागराजमध्ये दाखल होऊन पवित्र स्नान करतील, असा अंदाज व्यक्त केला होता. मात्र, हा मैलाचा दगड ११ फेब्रुवारी रोजीचं गाठला गेला. आता १४ फेब्रुवारीपर्यंत, स्नान करणाऱ्यांची संख्या ५० कोटींपेक्षा जास्त झाली आहे. महाकुंभ मेळाव्याचा समारोप होण्यापूर्वी आणखी १२ दिवस आणि त्यात एक अमृत स्नान बाकी आहे. त्यामुळे भाविकांची ही संख्या ५५ ते ६० कोटींपेक्षा जास्त होण्याची शक्यता अधिकाऱ्यांकडून वर्तवण्यात येत आहे. महाकुंभात पोहोचणाऱ्या भाविकांची प्रचंड गर्दी पाहता यावेळी महाकुंभसाठी येणाऱ्या भाविकांच्या संख्येचा नवा विक्रम होईल. अजूनही दररोज लाखो भाविक प्रयागराजला पोहोचत आहेत.
महाकुंभमध्ये महत्त्वाच्या स्नानाच्या दिवशी भाविकांचा प्रचंड सहभाग दिसून येत आहे. २९ जानेवारी रोजी मौनी अमावस्या होती, त्यादिवशी तेथे ८ कोटी भाविकांनी पवित्र स्नान केले होते. तर, मकर संक्रांती (१४ जानेवारी) रोजी एकूण ३.५ कोटी भाविकांनी अमृत स्नानात सहभाग घेतला. ३० जानेवारी आणि १ फेब्रुवारी रोजी दोन कोटींहून अधिक भाविकांनी स्नान केले. पौष पौर्णिमेला १.७ कोटी भाविकांनी स्नान केले. वसंत पंचमीला २.५७ कोटी भाविकांनी विधी स्नानात भाग घेतला. माघी पौर्णिमेच्या महत्त्वाच्या स्नान उत्सवात त्रिवेणी संगमात २ कोटींहून अधिक भाविक उपस्थित होते.
हे ही वाचा :
मोदी- ट्रम्प भेटीवर शशी थरूर यांची स्तुतीसुमने!
बांगलादेशात शोलोहाटी दुर्गा मंदिरावर कट्टरवाद्यांचा हल्ला, मूर्तींची केली तोडफोड!
राजस्थानच्या धोलपूरमध्ये तीन गो तस्करांना अटक, २६ गायींची सुटका!
मुस्लीम नर्स म्हणाली, ‘आम्ही अनेक इस्रायली रुग्णांना मारले, नरकात पाठवले’
देशभरातून आणि जगाच्या विविध भागातून, दररोज लाखो-कोटी भाविक प्रयागराजला पुण्य प्राप्त करण्यासाठी पोहोचत आहेत. वसंत पंचमीच्या शेवटच्या अमृत स्नानानंतरही, भक्तीचा प्रचंड उत्साह लोकांना संगम तीरावर आकर्षित करत आहे. स्नान करणाऱ्यांमध्ये १० लाख कल्पवासी तसेच देश-विदेशातील भक्त आणि संतांचा समावेश होता.