काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्या झालेल्या भेटीवर स्तुतीसुमने उधळली आहेत. त्यांनी म्हटले आहे की, शुक्रवारी नरेंद्र मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यातील बैठक म्हणजे आशादायक आहे. शिवाय या चर्चेतून अनेक प्रमुख चिंता दूर करण्यात आल्या आहेत.
दोन दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी व्हाईट हाऊसमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतली. यावेळी या दोन्ही नेत्यांनी व्यापार, संरक्षण आणि इमिग्रेशन अशा अनेक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा केली. याशिवाय २६/११ च्या मुंबई हल्ल्यातील आरोपी दहशतवादी तहव्वूर राणा याचे प्रत्यार्पण, F-35 लढाऊ विमानांची ऑफर, बांगलादेश मुद्द्यावर भारताकडे सोपवलेली जबाबदारी अशा अनेक विषयांवर या बैठकीत चर्चा झाली.
जगभराचे या भेटीकडे लक्ष असताना काँग्रेस नेते शशी थरूर यांनी या बैठकीचे कौतुक करत ही बैठक अत्यंत आशादायक असल्याचे मान्य केले. डोनाल्ड ट्रम्प यांनी अतिरिक्त शुल्काची घोषणा करत अनेक देशांना इशारा दिल्यानंतर भारत आणि अमेरिका या देशांमधील नेत्यांच्या चर्चेवर याचे सावट असताना दोन्ही बाजूंनी वाटाघाटी करण्यास सहमती दर्शविली आहे हे एक सकारात्मक चिन्ह आहे, असं शशी थरूर म्हणाले. शशी थरूर म्हणाले की, “मला वाटते की चर्चेतून आलेला निकाल हा खूप चांगला आहे अन्यथा, वॉशिंग्टनमध्ये काही घाईघाईने निर्णय घेतले गेले असते आणि त्याचा परिणाम आपल्या निर्यातीवर झाला असता, अशी भीती होती. पण, अशा प्रकारे झालेल्या चर्चेमुळे आता पुढील चर्चा आणि वाटाघाटी करण्यासाठी वेळ आहे.”
बेकायदेशीर स्थलांतराबद्दल, शशी थरूर यांनी पंतप्रधान मोदींच्या भूमिकेचे समर्थन केले, परंतु अमेरिकेतून हद्दपार केलेल्या कागदपत्र नसलेल्या भारतीय स्थलांतरितांना ज्या पद्धतीने वागवले जाते त्याकडे लक्ष द्यायला हवे होते, असेही म्हटले. जो कोणी दुसऱ्या देशात बेकायदेशीरपणे प्रवेश करतो, त्याला त्या देशात राहण्याचा अजिबात अधिकार नाही, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. पंतप्रधानांशी सहमती दर्शवत थरूर म्हणाले की, हे दिशाभूल केलेले तरुण आहेत ज्यांना बेकायदेशीरपणे स्थलांतर करण्यास प्रोत्साहित केले गेले आहे. जर ते भारतीय नागरिक असतील तर त्यांना परत घेतले पाहिजे. मला नक्कीच आशा आहे की, बंद दाराआड काहीतरी सांगितले गेले असेल आणि भविष्यात या स्थलांतरितांशी गैरवर्तन टाळले जाईल.
हे ही वाचा :
बांगलादेशात शोलोहाटी दुर्गा मंदिरावर कट्टरवाद्यांचा हल्ला, मूर्तींची केली तोडफोड!
राजस्थानच्या धोलपूरमध्ये तीन गो तस्करांना अटक, २६ गायींची सुटका!
मुस्लीम नर्स म्हणाली, ‘आम्ही अनेक इस्रायली रुग्णांना मारले, नरकात पाठवले’
“मुंबई साखळी बॉम्बस्फोटाचा निर्णय देण्यापूर्वी बदलीची टांगती तलवार डोक्यावर होती”
शशी थरूर यांनी F-35 लढाऊ विमानांच्या कराराचेही कौतुक केले. थरूर म्हणाले की, संरक्षणाच्या बाबतीत आम्हाला F-35 स्टेल्थ विमान विकण्याची वचनबद्धता खूप मौल्यवान आहे कारण ते एक अत्याधुनिक विमान आहे. आपल्याकडे आधीच राफेल आहे. F-35 सह, भारतीय हवाई दल खूप चांगल्या स्थितीत येईल.