राज्यातील वाढत्या लव्ह जिहादच्या घटनांना आळा घालण्यासाठी आता राज्यातील फडणवीस सरकारने पुढाकार घेतला आहे. लव्ह जिहाद व फसवणूक तसेच बळाचा वापर करून केलेले धर्मांतरण रोखण्यासाठी कायदा करण्यात येणार आहे. यासाठी राज्य सरकारने पोलिस महासंचालकांच्या अध्यक्षतेखाली एक विशेष समिती गठीत केली आहे. ही समिती लव्ह जिहाद फसवणूक आणि बळाचा वापर करून केलेले धर्मांतरण यावर उपाययोजना सुचवून कायद्याचा मसूदा तयार करणार आहे.
महाराष्ट्र सरकारने १४ फेब्रुवारी रोजी राज्य पोलिस प्रमुख रश्मी शुक्ला यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली आहे. या समितीला ‘लव्ह जिहाद आणि फसवे किंवा जबरदस्तीने धर्मांतर रोखण्यासाठी’ कायद्याचा मसुदा तयार करण्याचे काम सोपवण्यात आले आहे. भाजपाचे नेते आणि मंत्री नितेश राणे यांच्यासह राज्यातील विविध हिंदू संघटनांनी राज्यात लव्ह जिहाद कायदा लागू करण्याची मागणी लावून धरली होती. हा कायदा करण्याचे आश्वासन तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिले होते.
देशात आतापर्यंत उत्तर प्रदेश, हरियाणा, हिमाचल प्रदेश, गुजरात, झारखंड, मध्यप्रदेश, उत्तराखंड, ओडिसा आणि छत्तीसगड या नऊ राज्यांनी लव्ह जिहादविरोधी कायदा आणला आहे. त्यामुळे लव्ह जिहादच्या विरोधात कायदा करणारे महाराष्ट्र हे देशातील दहावे राज्य ठरणार आहे. ही समिती इतर राज्यांनी लागू केलेल्या अशाच प्रकारच्या कायद्यांचा अभ्यास करेल आणि कायद्याचा मसुदा तयार करणार आहे. या समितीत महिला व बालकल्याण विभागाचे सचिव,अल्पसंख्यांक विकास विभागाचे सचिव, विधी व न्याय विभागाचे सचिव, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे सचिव, गृहविभागाचे सचिव तसेच गृह विभागाचे (विधी) सचिव हे सदस्य असतील.
हे ही वाचा :
अमेरिकेतून आलेल्या स्थलांतरितांनी सांगितली ‘डंकी मार्गा’ची सुरवात ते शेवट!
“श्रीमान पंतप्रधान, तुम्ही महान आहात” म्हणत ट्रम्प यांच्याकडून मोदींना खास भेट!
ममता सरकारला उच्च न्यायालयाचा झटका, संघाच्या जनसभेला दिली परवानगी!
राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेकरिता महाराष्ट्राचे नेतृत्व आकाश शिंदेकडे
२०२३ मध्ये, फडणवीस म्हणाले की राज्य सरकार ‘लव्ह जिहाद’ रोखण्यासाठी कायदा आणण्याचा विचार करत आहे परंतु निर्णय घेण्यापूर्वी इतर राज्यांमधील अशाच कायद्यांचा अभ्यास करेल. “मुलींचे लग्न करून धर्मांतर केल्याची अनेक प्रकरणे समोर आली आहेत. याविरुद्ध कायदा करण्याची मागणी सर्वत्र होत आहे,” असे ते यावेळी म्हणाले होते.