अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांनी राष्ट्राध्यक्ष पदाची सूत्रे हाती घेताच अमेरिकेतील बेकायदेशीर स्थलांतरितांचा मुद्दा त्यांनी उचलून धरला आहे. शिवाय कारवाई करून या बेकायदेशीर स्थलांतरितांना त्यांच्या मायदेशात परत पाठवले जात आहे. असेच काही दिवसांपूर्वी अमेरिकेत बेकायदेशीरपणे राहणाऱ्या १०४ भारतीयांना अमेरिकन हवाई दलाच्या विमानाने भारतात परत पाठवण्यात आले. आता आणखी एक अमेरिकन लष्करी विमान काही बेकायदेशीर स्थलांतरित भारतीयांना घेऊन शनिवारी भारतात दाखल होणार आहे. पहिल्या विमानातून भारतीय परतल्यानंतर यातील काही जणांनी ते अमेरिकेत बेकायदेशीरपणे कसे गेले, त्यांची कशी फसवणूक झाली, त्यांना कोणत्या अडचणींचा सामना करावा लागला याबद्दल भाष्य केले. या भारतीयांच्या जबाबाच्या आधारे, अमेरिकेत जाणाऱ्या ‘डंकी मार्गां’बद्दल (Donkey Routes) बरेच काही समोर आले आहे. ‘आज तक’ने यासंबंधी अहवाल दिला आहे.
अमेरिकेत जाण्याचे स्वप्न उराशी बाळगून हे भारतीय अमेरिकेच्या प्रवासाला लागले होते. पण, त्यांची स्वप्ने फार काळ टिकली नाहीत. अमेरिकेत पोहोचल्यानंतर तर काहींना अगदी सीमेवरचं अटक करण्यात आली आणि लष्करी विमानातून हातकड्या घालून भारतात परत पाठवण्यात आले. यातील २९ जणांच्या जबाबातून असे दिसून आले आहे की, यातील अनेक जण हे आवश्यक असलेली कागदपत्रे घेऊन अमेरिकेसाठी निघाले होते. पण, त्यांची फसवणूक झाली आणि बेकायदेशीर स्थलांतरीत म्हणून त्यांना मायदेशात पुन्हा धाडण्यात आले.
दक्षिण अमेरिकेत पोहोचण्यासाठी, त्यांचा पहिला थांबा होता ते म्हणजे सोपे व्हिसा नियम असलेले देश. त्यांच्यापैकी आठ जण दुबईत, आठ जण स्पेनमध्ये, पाच जण इटलीमध्ये, चार जण ब्रिटनमध्ये आणि प्रत्येकी एक व्यक्ती ब्राझील, गयाना, फ्रान्स आणि सुरीनाममध्ये उतरले. ‘डंकी रूट’ हा अत्यंत धोकादायक आणि प्रवासासाठी कुप्रसिद्ध असा मार्ग अनेक दशकांपासून अस्तित्वात आहे. २०२३ मध्ये शाहरुख खानचा ‘डंकी’ हा चित्रपट यावर आधारित होता आणि आता अमेरिकेत पोहोचण्यासाठी या मार्गाचा वापर करणाऱ्या अनेक भारतीयांना पुन्हा पाठवल्यानंतर त्याची अधिक चर्चा केली जात आहे.
हद्दपार झालेल्या भारतीयांसाठी त्यांचा अमेरिकेला पोहचण्याचा प्रवास हा प्रथम एजंटशी संपर्क साधून सुरू होतो. हे एजंट्स अमेरिकेत पोहोचवण्याचे आश्वासन देतो. एजंट्सला एका व्यक्तीमागे ४० लाख ते १ करोड रुपये द्यावे लागतात. एकदा करार झाला, पैसे दिले की, या व्यक्तींना लॅटिन अमेरिकेत उतरण्यापूर्वी ब्राझील, इक्वेडोर, बोलिव्हिया किंवा गयाना सारख्या तुलनेने सौम्य व्हिसा नियम असलेल्या देशात विमानाने पाठवले जाते. काही प्रकरणांमध्ये, एजंट्सकडून दुबईहून थेट मेक्सिकोला व्हिसाची व्यवस्थाही केली जाते.
लॅटिन अमेरिकेतील कोणत्याही देशात पोहचणे हे या प्रवासातील पहिले आणि प्रत्यक्षात सर्वात सोपे पाऊल होते. आता इथून पुढे या स्थलांतरितांनी धोकादायक जंगलांमधून अमेरिका- मेक्सिको सीमेपर्यंतचा प्रवास सुरू केला. कोलंबियाहून पनामा सिटीला पोहोचण्यासाठी स्थलांतरित लोक घनदाट जंगलातून सुमारे १०० किलोमीटरचा प्रवास करतात. गेल्या वर्षी, अंदाजे २,५०,००० लोकांनी डॅरियन गॅप ओलांडला. हे कोलंबिया- पनामा सीमेवर पसरलेले जंगल खूप मोठे आहे. त्यापैकी बरेच जण अमेरिकेत पोहोचू पाहत होते. प्रवासाच्या मार्गाबद्दल अधिक माहिती देताना, निर्वासितांपैकी एक, गुरविंदर सिंग यांनी सांगितले की त्यांना कारने गयानाहून ब्राझीलला नेण्यात आले. तिथून ते बोलिव्हिया, पेरू आणि इक्वेडोर मार्गे बसने कोलंबियाला पोहोचले. दक्षिण आणि मध्य अमेरिकेला जोडणाऱ्या पॅन- अमेरिकन महामार्गावरील ‘गॅप’वरून डॅरियन गॅपचे नाव देण्यात आले आहे. येथील खडकाळ भूभागामुळे येथे कोणत्याही प्रकारचे बांधकाम अशक्य आहे. स्थलांतरित सामान्यतः पाच ते नऊ दिवस येथील जंगलातून १०६ किलोमीटरचा प्रवास चालत करतात, कोलंबियापासून सुरुवात करून पनामा सीमेवरून पश्चिमेकडे बाजो चिकिटोपर्यंत जातात. जिथे स्थलांतरितांना स्वागत केंद्रात ठेवले जाते. तिथून ते उत्तरेकडे प्रवास सुरू ठेवण्यापूर्वी सॅन व्हिसेंटे किंवा लाजस ब्लँकास सारख्या इतर केंद्रांवर जातात.
हे ही वाचा :
मोदी- ट्रम्प भेटीवर शशी थरूर यांची स्तुतीसुमने!
बांगलादेशात शोलोहाटी दुर्गा मंदिरावर कट्टरवाद्यांचा हल्ला, मूर्तींची केली तोडफोड!
राजस्थानच्या धोलपूरमध्ये तीन गो तस्करांना अटक, २६ गायींची सुटका!
मुस्लीम नर्स म्हणाली, ‘आम्ही अनेक इस्रायली रुग्णांना मारले, नरकात पाठवले’
गुरविंदर सिंग म्हणाले की, एजंटने दिलेल्या बनावट ओळखपत्राचा वापर करून, त्याला मुसा मार्गे मेक्सिकन सीमा ओलांडण्यास मदत करण्यात आली. त्यानंतर तो बसने मेक्सिकन शहरे सॅन्कोबा आणि तिजुआना येथे गेला आणि नंतर अमेरिकेची सीमा ओलांडली. अमेरिका-मेक्सिको बॉर्डर पेट्रोलने अनेक निर्वासितांचा प्रवास थांबवला, त्यानंतर त्यांना सॅन दिएगो केंद्रात ताब्यात घेण्यात आले.
हरियाणातील खानपूर खुर्द येथील निशांत मोर गेल्या वर्षी त्याचा फोन आणि एक योजना घेऊन अमेरिकेला रवाना झाला. त्याला ‘डॅरियन गॅप’च्या धोकादायक जंगलातून प्रवास रेकॉर्ड करायचा होता आणि तो युट्युबवर पोस्ट करायचा होता. त्याच्या सहा भागांच्या मालिकेत, तो बॅकपॅकसह उत्तरेकडे जातो. पुढे नद्या, चिखल, मृत्यूची टेकडी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मार्गावर स्वतःचा व्हिडिओ आणि सेल्फी घेतो. अखेर तो अमेरिकेत पोहोचण्यात यशस्वी झाला, परंतु ५ फेब्रुवारी रोजी त्याला हद्दपार करण्यात आले.