धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर आधारित ‘छावा’ सिनेमा शुक्रवार, १४ फेब्रुवारी रोजी सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित झाला. छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनपटावर आधारित या चित्रपटाची प्रेक्षकांना पूर्वीपासूनचं उत्सुकता होती. अपेक्षेप्रमाणे चित्रपटाला पहिल्याच दिवशी प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे. शिवाय या सिनेमाने अनेक विक्रमही रचले आहेत.
“हम शोर नहीं करते हैं, सीधा शिकार करते हैं”, “औरंग जब तू मरेगा तब यह तेरी मुगल सल्तनत भी मर जाएगी” हे अंगावर रोमांच आणणारे संवाद सिनेमाच्या ट्रेलरमध्ये ऐकूनचं लोकांनी सिनेमा हिट ठरणार असे भाकीत केले होते. धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराजांच्या धाडसाची, साहसाची कथा ‘छावा’ सिनेमाच्या माध्यमातून मोठ्या पडद्यावर अनुभवण्यासाठी प्रेक्षक सिनेमाची वाट पाहत होते.
लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘छावा’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर प्रभावी पदार्पण केले. पहिल्याच दिवशी सिनेमाने बॉक्स ऑफिसचे सर्व रेकॉर्ड मोडले आहेत. २०२५ मध्ये प्रदर्शित झालेल्या सर्व सिनेमांचे रेकॉर्ड मोडत ‘छावा’ ने रिलीजच्या पहिल्याच दिवशी ३१ कोटींची कमाई केली आहे. ‘छावा’ सिनेमाने २०२५ साली प्रदर्शित झालेल्या सर्व दक्षिण ते बॉलीवूड सिनेमांच्या ओपनिंग डे कलेक्शनचा विक्रम मोडला आहे आणि वर्षातील सर्वात मोठा ओपनर सिनेमा ठरला आहे. या वर्षी दक्षिण आणि बॉलीवूडसह आठ सिनेमे थिएटरमध्ये प्रदर्शित झाले.
‘छावा’ सिनेमाने प्रदर्शनानंतर पहिल्या दिवशी ३१ कोटी रुपयांची कमाई केली. ‘विदामुयार्ची’ सिनेमाने पहिल्या दिवशी २६ कोटींची कमाई केली. ‘स्काय फोर्स’ सिनेमाने पहिल्या दिवशी १५.३० कोटी रुपयांची कमाई केली होती. पण हे सर्व रेकॉर्ड्स ‘छावा’ सिनेमाने मोडीत काढले आहेत. याव्यतिरिक्त, ‘छावा’ हा चित्रपट अभिनेता विकी कौशल याचा आतापर्यंतचा सर्वात मोठा ओपनर चित्रपट ठरला. ‘उरी: द सर्जिकल स्ट्राईक’ने बनवलेला ८.२० कोटी रुपयांचा विक्रम मागे टाकला आहे.
पहिल्याच दिवशी सकाळच्या शोपासूनच प्रेक्षकांची सिनेमा पाहायला गर्दी उसळली होती. सिनेमाच्या आगाऊ बुकिंगमध्येच साधारण पाच लाख तिकीट विकले गेले होते. यातूनच १३.७० कोटी कमाई झाली होती. ‘सॅकनिल्क’मध्ये प्रकाशित झालेल्या अहवालानुसार, छावा सिनेमासाठी सकाळच्या शोमध्ये ३०.५१% प्रेक्षकांची गर्दी दिसून आली. त्यानंतर दुपारच्या शोमध्ये ३४.५०%, संध्याकाळच्या शोमध्ये ४०.५१% आणि रात्रीच्या शोमध्ये ६२.५५% प्रेक्षकांची गर्दी दिसून आली. प्रेक्षकांच्या अभूतपूर्व प्रतिसादामुळे, ‘छावा’ सिनेमासाठी एकूण गर्दी ४२.०२% इतकी झाली होती. जी २०२५ मध्ये पहिल्या दिवशीची सर्वाधिक गर्दी आहे. सिनेमाचे बजेट १३० कोटी असून ‘छावा’ सिनेमाने बॉलिवूडला दमदार सुरुवात करुन दिली आहे.
हे ही वाचा :
३८ व्या राष्ट्रीय स्पर्धेत मल्लखांब क्रीडाप्रकारात निधी राणेची रौप्य पदकाची कमाई
बांगलादेशी, रोहिंग्यांना हुसकावण्यासाठी हिंदु राष्ट्र समन्वय समितीच्या माध्यमातून साताऱ्यात मोर्चा
महाराष्ट्रातही आता ‘लव्ह जिहाद’ विरोधात कायदा!
‘छावा’ सिनेमामध्ये छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका अभिनेता विकी कौशल याने साकारली असून त्याने या भूमिकेला न्याय दिला आहे. त्याचा वावर, छत्रपती संभाजी महाराजांचा लूक, संवाद, भूमिका या सगळ्याच बाबींवर त्याने उत्तम काम केले आहे. याशिवाय लक्ष्मण उतेकर यांनी ‘छावा’चे दिग्दर्शन केले असून सिनेमात रश्मिका मंदाना, अक्षय खन्ना, दिव्या दत्ता, डायना पेंटी यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. अनेक मराठी कलाकारांनीही सिनेमात काम केले आहे.