मागील सतरा वर्षांपूर्वी घर सोडून गेलेल्या पती व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी भेटल्यामुळे तिचा खऱ्या अर्थाने व्हॅलेंटाईन डे साजरा झाला आहे. मुंबई पोलिसांनी शोधून आणलेला पती १७ वर्षांनी भेटल्याने तिने मुंबई पोलिसांचे आभार मानले आहेत.
चंद्रकांत कानू जोशी असे बेपत्ता झालेल्या पतीचे नाव असून तो मुरबाड येथील एका फार्महाऊसमध्ये काम करत असल्याचे पोलिसांना आढळून आले आणि पोलिसांनी त्याला सोबत घेऊन पत्नीच्या ताब्यात दिले आहे.
चंद्रकांत जोशी हे काळाचौकी येथील अभुदय नगर येथे पत्नीसह राहत होते. एप्रिल २००७ मध्ये चंद्रकांत जोशी हे अचानक घर सोडून निघून गेले होते. आज ना उद्या पती परत येईल म्हणून ५७ वर्षीय पत्नीने काही वर्षे वाट बघितली. त्यानंतर पतीला शोधण्यासाठी महिलेने राज्य महिला आयोगाकडे मदत मागितली होती. तिच्या तक्रारीनंतर, काळाचौकी पोलिसांनी १२ मार्च २०२४ रोजी हरविल्याची तक्रार दाखल केली होती. तात्काळ कोणताही पुरावा न मिळाल्याने पोलिसांनी त्याच्या कुटुंबाशी, मित्रांशी आणि नातेवाईकांशी संपर्क साधला, परंतु कोणालाही कोणतीही माहिती मिळाली नाही.
हे ही वाचा:
महाराष्ट्रातही आता ‘लव्ह जिहाद’ विरोधात कायदा!
३८ व्या राष्ट्रीय स्पर्धेत मल्लखांब क्रीडाप्रकारात निधी राणेची रौप्य पदकाची कमाई
तथापि, त्याच्या एका जुन्या मित्राने २०१५ ते २०१६ दरम्यान मुरबाडमधील एका फार्महाऊसमध्ये त्याला बघितल्याचे सांगितले होते, या माहितीवरून पोलिसांनी तांत्रिक तपास करून, पोलिसांनी मुरबाड येथे असलेल्या फार्महाऊसमध्ये शोध सुरू केला, पोलिसांच्या या प्रयत्नांना व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी यश आले.
चंद्रकांत जोशी हे मुरबाड येथे एका फार्महाऊस मध्ये केअरटेकर म्हणून काम करीत होते. काळाचौकी पोलिसांनी मुरबाडच्या चौरे गावातील एका फार्महाऊस मधून जोशी यांची ओळख पटवून त्याला काळाचौकी पोलिस ठाण्यात आणण्यात आले. शुक्रवारी व्हॅलेंटाईन डे च्या दिवशी चंद्रकांत जोशी यांच्या पत्नीला पोलीस ठाण्यात बोलावण्यात आले. १७ वर्षांपासून नजरेआड असलेल्या पतीला बघून पत्नीच्या डोळ्यात आनंदाश्रू वाहू लागले. पतीला सुखरूप शोधून दिल्याबद्दल महिलेने मुंबई पोलिस तसेच काळाचौकी पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी यांचे आभार मानले.