राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावर एसटी कर्मचाऱ्यांनी केलेल्या हल्ल्यानंतर अटक केलेले वकील गुणरत्न सदावर्ते यांची पोलीस कोठडी आज संपणार होती. याप्रकरणी सदावर्ते यांना आज मुंबईत गिरगावमधील न्यायालयात सुनावणी झाली आहे. त्यांच्या कोठडीत अजून दोन दिवसांची वाढ करण्यात आली आहे.
न्यायालयात सरकारी वकिल प्रदीप घरत यांनी गुणरत्न सदावर्ते यांची कोठडी ११ दिवसांनी वाढवून मागितली होती. मात्र न्यायलयाने गुणरत्न सदावर्ते यांच्या कोठडीत दोन दिवसांची वाढ केली असून, १३ तारखेपर्यंत सदावर्ते हे पोलीस कोठडीत असणार आहेत. या दोन दिवसात त्यांची अधिक चौकशी केली जाणार असून पोलीस अजून या प्रकरणाचा शोध घेणार आहेत.
सुनावणीच्या वेळी सरकारी वकील प्रदीप घरत यांनी मोठमोठे खुलासे केले आहेत. या प्रकरणी ४ नवीन लोकांना अटक केली आहे तर एकाच शोध सुरु आहे. तसेच या प्रकरणाचा अधिक तपास घेण्यासाठी सदावर्ते यांचा मोबाईल जप्त करण्यात आला आहे.
सातारा पोलीस सदावर्ते यांचा ताबा घेण्यासाठी आले होते. आज जर सदावर्ते यांची सुटका झाली असती तर सातारा पोलिसांनी त्यांचा ताबा घेतला असता. दीड दोन वर्षापूर्वी सदावर्ते यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गादीचा अपमान केल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे १३ तारखेला सदावर्ते यांची सुटका झाली की, सातारा पोलीस सदवार्तेना ताब्यात घेण्याची शक्यता आहे.
हे ही वाचा:
५८ कोटी कुठले, एवढेच पैसे दिले सोमय्यांनी
‘मुंबईची पुन्हा होणार तुंबई; फक्त ७५ टक्के नालेसफाई करण्याचे टेंडर’
मानखुर्दमध्ये रामनवमीच्या मिरवणुकीत वाद
सिल्व्हर ओक हल्लाप्रकरणी पत्रकारांना आता चौकशीसाठी बोलावणार
शरद पवार यांच्या घरावरील आंदोलनासाठी एसटी कर्मचाऱ्यांना चिथावणी दिल्याच्या आरोपाखाली अटकेत असलेले वकील गुणरत्न सदावर्ते यांची रविवारी पोलिसांनी सहा ते सात तास कसून चौकशी केली होती. दरम्यान, सदावर्ते यांना आज न्यायालयात हजर करण्यापूर्वी पोलिस कोठडी वाढवून मिळावी, यासाठी पोलिसांकडून पुराव्यांची जुळवाजुळव केली जात होती. त्याचबरोबर न्यायालयीन कोठडीतील आंदोलकांपैकी प्रत्यक्ष कटामध्ये सहभागी असलेल्यांचीही माहिती घेण्यात येत असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.







