महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीसह ठाकरे गटाला पराभवाला सामोरे जावे लागल्यानंतर ठाकरे गटातील अंतर्गत कलह चव्हाट्यावर येऊ लागला आहे. दरम्यान, ठाकरे गटाने प्रवक्ते किशोर तिवारी यांची पक्षातून हकालपट्टी केली. यानंतर किशोर तिवारी यांनी माध्यमांसमोर येत ठाकरे गट, संजय राऊत, उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.
किशोर तिवारी यांनी संजय राऊत यांच्यावर निशाणा साधत म्हटले की, “संजय राऊत यांच्यामुळे पक्षाची विश्वासार्हता खालावली आहे. रोज सकाळी सकाळी येऊन ते काहीही बोलतात. संजय राऊत हे पक्षाचे नाही; तर स्वतःचे विचार मांडतात. पक्षाची ठोस भूमिकाचं राहिलेली नाही. पक्ष आर्थिक कार्यक्रम आणि दिशा घेऊन चालला असता तर इतके लोक आज पक्ष सोडून गेले नसते,” अशी टीका त्यांनी केली.
“पूर्वी पक्षाची भूमिका ही कट्टर हिंदुत्वाची होती आणि आता पक्ष सनातनला शिव्या देत आहे. काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे सनातनवर किती काही बोलले, काँग्रेसकडून अनेकदा स्वातंत्र्यवीर सावरकरांवर बोलले जाते. तेव्हा ठाकरे गटातील नेते सौम्य भूमिका घेतात. हे अजमेरला चादर पाठवत आहेत. मला स्वतःला अनिल देसाईंकडून सांगण्यात आलं की, काँग्रेसच्या हिंदू विरुद्ध वक्तव्यावर बोलायला माध्यमांसमोर जाऊ नका. निवडणुकीच्या वेळी हिंदुत्वाची लाईन घेऊ नका. ज्या बांगलादेशींनी वरुण सरदेसाई किंवा आदित्य ठाकरेंना निवडून आणलं… बांगलादेशी यांच्याकडून नसते तर यांची एकही सीट निवडून आली नसती. पक्षाची भूमिकाच नव्हती, यांनी काँग्रेससोबत राहायलाच नको,” असा गौप्यस्फोट किशोर तिवारी यांनी केला आहे.
पुढे तिवारी म्हणाले की, पक्षाच्या स्वबळाची भूमिका संजय राऊत यांनी नागपूरमध्ये येऊन घेतली. त्यांनी भूमिका जाहीर करताच पक्षाला गळती लागली. अगदी आदित्य ठाकरेंचे निकटवर्ती असलेले दुष्यंत चतुर्वेदीही पक्ष सोडून गेले. पक्षाला सोडून लोक चालले तर म्हटलं जातं ज्याला जायचं त्याने जा आम्हाला फरक पडत नाही. राजन साळवी यांच्या पक्षातून जाण्याने काही फरक पडत नाही, असंही म्हटलं गेलं. या तर विधानसभेतील पराभवानंतरच्या गोष्टी आहेत. त्यापूर्वीच माज तर पाहण्यासारखा आहे,” असा प्रहार किशोर तिवारी यांनी केला आहे.
ठाकरे गटावर आणि उद्धव ठाकरेंवर टीका करताना किशोर तिवारी म्हणाले की, “पक्षात संवाद नावाची गोष्टचं उरलेली नाही. उद्धव ठाकरेंना भेटायला म्हणून मी स्वतःचे पैसे खर्च करून १० वेळा मुंबईत गेलो. पण, हाकलवण्यात आले. एकदा गेटवर भेटले तेव्हा उद्धव ठाकरे म्हणाले की, आपण शांततेत भेटू आणि ती शांततेची वेळ अजून आलेली नाही. संवाद कधी पुढे झालाच नाही,” अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
तिवारी यांनी प्रियांका चतुर्वेदी यांच्यावर निशाणा साधत पक्ष नेतृत्वावरही टीका केली. प्रियांका चतुर्वेदी या काँग्रेसमधून आल्या आणि करोना काळात त्यांना राज्यमंत्री पद दिले. तेव्हा पदासाठी पक्षात इतर जुने लोक नव्हते का? पण, त्यांना पक्षात येण्यापूर्वीचं तिकीट देण्यात आले. प्रियांका चतुर्वेदी यांचे पक्षासाठी विशेष काम काय? त्या उत्तर भारतीय आहेत पण, मुंबईत एकही उत्तर भारतीय ठाकरे गटाला मत देत नाही. उत्तर प्रदेशमध्ये त्यांनी शिवसेना बळकट केली असेल तर माहित नाही, असा टोला किशोर तिवारी यांनी लगावला.
लबाड लोकं जमा करून, चाटुकारांची फौज तयार करून जर उद्धव ठाकरे पक्षाचे पुनरुज्जीवन करण्याचा प्रयत्न करणार असतील आणि लुटारू लोकांना आमच्यासारखी लोकं बोलत असतील आणि नंतर आम्हालाच दूर केलं जात असेल तर यावर काय बोलणार, अशी टीका त्यांनी उद्धव ठाकरेंवर केली आहे.
हे ही वाचा..
उत्तर प्रदेशातील ९०,००० कैद्यांनी केले पवित्र स्नान!
सकल हिंदू समाजाच्या आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर अनधिकृत थडग्यावर पालिकेची कारवाई
राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांना जीवे मारण्याची धमकी
महाकुंभात महिलांचे स्नान करतानाचे व्हिडीओ युट्युबवर अपलोड प्रकरणी; तिघांना अटक
पक्षातून पदमुक्त करण्यापूर्वी किशोर तिवारी यांनी एका वृत्तवाहिनीवरील चर्चेत ठाकरे गटातील काही वरिष्ठ नेत्यांवर गंभीर आरोप केले होते. त्यांनी खासदार विनायक राऊत, अरविंद सावंत, संजय राऊत आणि मिलिंद नार्वेकर यांच्यावर ‘मातोश्री’ आणि ‘सेना भवन’ ताब्यात घेण्याचा आरोप केला. तसेच, जनाधार असलेल्या नेत्यांना पक्ष सोडण्यास भाग पाडल्याचा आरोप करत या नेत्यांना विधानसभा निवडणुकीतील पराभवासाठी जबाबदार धरले पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली होती.