28 C
Mumbai
Thursday, March 28, 2024
घरराजकारणचिकन सूप आणि भातखळकर

चिकन सूप आणि भातखळकर

Google News Follow

Related

राजकारणात अनेक लोक एकमेकांवर आरोप करतात, त्यावर वादविवाद होतात. सनसनाटी निर्माण होते, पण सर्वसाधारणपणे हे संकेत असतात की, कुणीही एकमेकांशी झालेल्या वैयक्तिक स्वरूपाच्या भेटी, त्यातले संवाद उघड करायचे नसतात. या संकेतांचा भंग केल्यास त्याची चर्चा काहीकाळ होते खरी, पण अशी निष्कारण सनसनाटी निर्माण करणाऱ्या त्या व्यक्तीची राजकारणातली विश्वासार्हता मात्र कमी होते. तसेच काहीसे राज ठाकरे यांच्याबाबत झाले आहे.

तुम्हाला आठवत असेल ५-६ वर्षांपूर्वी राज ठाकरे यांनी बाळासाहेबांसंदर्भात एक विधान केले होते. त्यात ते म्हणाले होते की, बाळासाहेबांच्या अखेरच्या दिवसांत ते एकदा तेलकट बटाटेवडे खाताना आपल्याला दिसले. मी त्यांना विचारणा केली की, तुम्ही हे असे पदार्थ आता खाऊ नका. त्यावर बाळासाहेब म्हणाले की, मला जे वाढले जाते तेच मी खातो. तेव्हापासून मी त्यांच्याकडे घरी बनवलेले चिकन सूप पाठवू लागलो. तेच ते खाऊ लागले. ज्या शिवसेनाप्रमुखानी राज ठाकरे यांना भरभरून दिले, मोठे केले, जे शिवसेनाप्रमुख शिवसैनिकांसाठी दैवतापेक्षा कमी नाहीत त्या बाळासाहेबांशी अत्यंत खासगीतला आणि घरगुती प्रसंग शिवाजी पार्कातल्या आपल्या भाषणात राज यांनी चव्हाट्यावर आणला. यात खरे किती आणि राजकारण किती हे ईश्वरालाच माहिती, पण घरातील वडीलधाऱ्या व्यक्तीशी झालेला संवाद लोकांसमोर उघड केल्यामुळे त्यावेळी राज ठाकरे टीकेचे लक्ष्य बनले होते. शिवसैनिकांमध्येही नाराजी उफाळली होती. एवढेच काय, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही आपल्या एका वक्तव्यात याचा आधार घेत आम्ही कुणाचे बटाटेवडे किंवा चिकन सूप काढत नाही, असे म्हणत राजकारणात काही संकेत पाळावे लागतात, हे सुनावले होते. राज ठाकरे यांना मात्र तशी सवय असावी.

अलीकडेच लोकसत्ताच्या एका मुलाखतीत राज यांनी जुना कोळसा उगाळून याची पुनरावृत्ती केली. पण ते धडधडीत खोटे बोलल्याचे पुराव्यानिशी सिद्ध झाले, राज ठाकरे तोंडावर आपटले. कार्यक्रमात भाजपा नेते आमदार अतुल भातखळकर आणि पूर्वाश्रमीचे भाजपा नेते सदाशिव लोखंडे यांच्याविषयी स्फोटक विधान करून त्यांनी पतंगबाजी केली.

हे ही वाचा:

भोसले समितीत मराठा द्वेषी सदस्य

आता मागासवर्ग आयोग नेमणं हे ठाकरे सरकारला उशिरा सूचलेलं शहाणपण

ठाकरे सरकारमध्ये एक मुख्यमंत्री आणि अनेक सुपर मुख्यमंत्री

सुशांत सिंग राजपूत प्रकरण, अंगरक्षकही होणार साक्षीदार

सदाशिव लोखंडे हे मनसेमध्ये दाखल होण्यासाठी आपल्याकडे आले होते, मात्र आपण त्यांचे मन वळवले आणि त्याच पक्षात राहण्याचा सल्ला दिल्याचे सांगत राज ठाकरे यांनी स्वतःचेच कौतुक या मुलाखतीत केले खरे, पण नंतर हा संपूर्ण दावाच धडधडीत खोटा ठरला. लोखंडे हे त्याचवर्षी मनसेतर्फे कुर्ला मतदारसंघातून निवडणूक लढल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे राज ठाकरे यांची विश्वासार्हता तिथे तोंडघशी पडली. त्यातच त्यांनी भाजपा नेते अतुल भातखळकर यांच्याबाबतचे विधान करून नवे नाट्य उभे केले. पण तेही पडले.

राज ठाकरे आणि आमदार भातखळकर यांची जेव्हा कधी भेट झाली असेल त्याविषयी उघडपणे बोलून आपण बोललो तेच खरे हे सांगण्याचा केविलवाणा प्रयत्न राज ठाकरे यांनी केला. भाजपा नेते भातखळकर हे आपल्याच्या पक्षातून निवडणूक लढविण्यासाठी आले होते, असे केवळ बिनबुडाचे, निराधार आरोप करत पुन्हा एकदा जुना चिखल चिवडण्याचा प्रयत्न केला. खरे तर त्यांनी केलेले हे दावे कसे बोगस होते हे लवकरच सिद्ध झाले. राज ठाकरे यांनी खरे तर मनसेत येण्याची ऑफर भातखळकर यांना दिली होती आणि ती भातखळकर यांनी सपशेल धुडकावून लावली होती. राज ठाकरे यांनी केलेल्या अशा आरोपांतून भातखळकर यांचे कोणतेही नुकसान झाले नाही. कारण भाजपाला राज ठाकरे यांच्यापेक्षा भातखळकर यांच्यावर अधिक विश्वास आहे. नुकसान राज ठाकरे यांचे मात्र नक्कीच झाले. कारण याआधीही त्यांच्या अनेक कृतीतून त्यांच्या राजकीय विश्वासार्हतेला सुरुंग लागला आहे.

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सुरुवातीला स्तुतीसुमने उधळणारे राज ठाकरे गेल्या लोकसभा निवडणुकीत मात्र अचानक प्रचारसभांत मोदींविरोधातील व्हीडिओ दाखवून चर्चेत येऊ पाहात होते. खरे तर, लोकसभा निवडणुकीत त्यांच्या पक्षाचा एकही उमेदवार उभा राहिला नव्हता मग हा प्रचार ते कुणासाठी करत होते, त्यातून त्यांचा कोणता लाभ झाला हा प्रश्न विचारला जाऊ लागला होता. टाळीबाज वाक्ये पेरायची आणि तत्कालिन लाभ उठवायचा या पलिकडे त्यांचे राजकारण गेले नाही. एकेकाळी १३ आमदार आणि मुंबई महानगरपालिकेत २७ नगरसेवक असणाऱ्या राज ठाकरे यांच्या पक्षाची पाटी नंतर मात्र कोरी करकरीत झाली. पक्षाचे चिन्ह असलेल्या इंजिनाची दिशाही त्यांनी बदलून पाहिली. नंतर पक्षाचा झेंडाही बदलला. या धरसोडपणापायी अनेक नेते, कार्यकर्ते पक्षाला रामराम करून बाहेर पडले.

एरवी मराठी माणूस, महाराष्ट्राची अस्मिता याविषयी पोटतिडकीने बोलणारे राज ठाकरे छत्रपती संभाजी राजांबद्दल ‘रेनिसान्स स्टेट’ या गिरीश कुबेरांच्या पुस्तकातील आक्षेपार्ह लेखनाबद्दल चकार शब्दही बोललेले नाहीत. या पुस्तकावर बंदी घाला, पुस्तकाचे लेखक गिरीश कुबेर यांनी माफी मागायला हवी, असा तीव्र संताप महाराष्ट्रातून व्यक्त होत असताना राज ठाकरे मात्र गप्प आहेत. त्यामुळे मराठी आणि महाराष्ट्राबद्दलची भूमिका ही जेव्हा फायद्याची असते तेव्हा मांडायची असेच राज ठाकरे यांचे धोरण आहे, असे आता जनसामान्यांना वाटू लागले आहे. कारण सदाशिव लोखंडे, अतुल भातखळकर यांच्याविषयी अगदी आठवणीने बोलणारे राज ठाकरे छत्रपती संभाजी राजांबद्दल भूमिका घ्यायला विसरले. गिरीश कुबेर यांच्या स्क्रीप्टप्रमाणे या मुद्द्यांवर बोलायचे नसल्यामुळे कदाचित त्यांनी कातडीबचाव धोरण अवलंबले की काय, अशी शंका घ्यायला वाव आहे. एक मात्र खरे की, राज ठाकरे यांच्या बेभरवशाच्या राजकारणात या मुलाखतीच्या निमित्ताने आणखी नव्या बिनबुडाच्या प्रकरणांची भर पडली आहे. त्यामुळे मनसेच्या राजकीय वाटचालीतील अस्थिरता आणखी वाढणार आहे.

महेश विचारे

सहसंपादक, न्यूज डंका

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
144,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा