गृहमंत्री अमित शहा यांनी राज्यांना अमली पदार्थांच्या तस्करीविरुद्ध शोधा, मोडून काढा आणि नष्ट करा ही रणनीती स्वीकारण्याचे आवाहन केले. त्यांनी ड्रग्ज माफिया आणि त्यांच्या प्रमुख सूत्रधारांवर कठोर कारवाई करण्याची गरज व्यक्त केली, तर व्यसनाधीन व्यक्तींप्रती सहानुभूतीपूर्ण दृष्टिकोन ठेवण्याचा सल्लाही दिला. गेल्या काही काळात किती प्रमाणात अमली पदार्थ जप्त करण्यात आले याची आकडेवारी देत मोदी सरकारच्या काळात अमली पदार्थविरोधात सरकार कशी पावले उचलत आहेत हेदेखील त्यांनी सांगितले.
नार्को-कोऑर्डिनेशन सेंटर (NCORD) च्या दहाव्या सर्वोच्चस्तरीय बैठकीत बोलताना अमित शाह म्हणाले की, भारताच्या अमली पदार्थांविरुद्धच्या लढाईत पुढील तीन वर्षे अत्यंत निर्णायक ठरणार आहेत. त्यांनी राज्यांना परस्पर समन्वय, रिअल-टाइम गुप्त माहितीची देवाणघेवाण आणि ड्रग्ज सिंडिकेटविरोधात कठोर अंमलबजावणी करण्याचे आवाहन केले.
जप्त करण्यात आलेल्या अमली पदार्थांमध्ये मोठी वाढ
केंद्र सरकारच्या अमली पदार्थविरोधी मोहिमेचा उल्लेख करताना शाह म्हणाले की, २००४ ते २०१४ या काळात २६ लाख किलो सिंथेटिक ड्रग्ज जप्त करण्यात आले. तर २०१४ ते २०२६ या काळात १ कोटी १८ लाख किलो सिंथेटिक ड्रग्ज जप्त करण्यात आले.
ते म्हणाले, “यावरून आपली मोहीम सातत्याने यशाकडे वाटचाल करत असल्याचे दिसून येते. २००४ ते २०१४ दरम्यान जप्त करण्यात आलेल्या अमली पदार्थांची किंमत सुमारे ४०,००० कोटी रुपये होती. तर २०१४ ते २०२६ या काळात जप्त करण्यात आलेल्या अमली पदार्थांची किंमत सुमारे १.८४ लाख कोटी रुपये आहे. यावरून आपल्या कारवाईची व्याप्ती आणि परिणामकारकता मोठ्या प्रमाणात वाढल्याचे स्पष्ट होते.”
ते म्हणाले, “आज आपला देश अमली पदार्थांविरुद्धच्या लढाईत अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यावर उभा आहे. पुढील तीन वर्षे ठरवतील की व्यसन आपल्यावर विजय मिळवेल की आपण व्यसनावर विजय मिळवू. पुढील शंभर वर्षांच्या भारताच्या भविष्यासाठी आपण सर्वांनी एकत्रितपणे ठाम निर्धाराने ही लढाई लढली पाहिजे. यासाठी सर्व सरकारांनी एकाच व्यासपीठावर यायला हवे. समाजाला दिशा देणारे संत, देशाचे भविष्य घडवणारे युवक आणि मातृशक्तीलाही या अभियानात सहभागी करून घ्यायला हवे.”
हे ही वाचा:
१ जुलैपासून बदलणार तुमच्या खिशाचं गणित!
टीईटी परीक्षेचा पेपर फुटला; शिक्षक पात्रता परीक्षा पुढे ढकलली
रशिया-युक्रेनमध्ये १६०-१६० युद्धकैद्यांची अदलाबदल
आता लोकल रेल्वेच्या डब्यातून धर्मांतरणांचे रॅकेट
सर्व राज्यांनी समन्वयाने काम करावे
अमित शाह म्हणाले, “अमली पदार्थांची तस्करी पूर्णपणे नष्ट करण्यासाठी सर्व राज्यांनी समन्वयाने काम करणे आवश्यक आहे. त्यांनी ड्रग्ज माफियांविरुद्ध कठोर कारवाई आणि व्यसनाधीन व्यक्तींच्या पुनर्वसनावर भर दिला. ड्रग्जच्या व्यवसायात गुंतलेले लोक हे सर्वात मोठे अडथळे आहेत. त्यांच्याविरुद्ध आपला दृष्टिकोन नियोजनबद्ध आणि अत्यंत कठोर असला पाहिजे. मात्र व्यसनाच्या बळी ठरलेल्या व्यक्तींशी सहानुभूतीने वागले पाहिजे.”
यंदाचा रोडमॅप स्पष्ट
गृहमंत्री म्हणाले की, यंदाच्या वर्षासाठी सरकारची रणनीती स्पष्ट असून पुढील वर्षी तिचा आढावा घेऊन नवीन कृती आराखडा तयार केला जाईल. कोणत्याही स्तरावर संभ्रम नाही. पुढील वर्षी आपण अमली पदार्थांविरुद्धच्या लढ्याचा आढावा घेऊ आणि पुढील टप्प्याची योजना आखू. यंदाचा रोडमॅप पूर्णपणे स्पष्ट आहे.
नार्को-कोऑर्डिनेशन सेंटर बैठका परिणामकारक व्हाव्यात
अमित शाह यांनी सांगितले की, नार्को-कोऑर्डिनेशन सेंटरच्या बैठका केवळ संख्येने वाढून उपयोग नाही, तर त्या परिणामकारक असायला हव्यात. ते म्हणाले, “सर्व मुख्य सचिव आणि पोलीस महासंचालकांनी नार्को-कोऑर्डिनेशन सेंटर बैठका परिणामकारक बनविण्यासाठी प्रयत्न करावेत. बैठकींची संख्या वाढत आहे, परंतु त्या बैठकीत घेतलेल्या निर्णयांची प्रभावी अंमलबजावणी होते का, पुढील बैठकीत त्यांचा आढावा घेतला जातो का आणि त्यांचे गंभीर विश्लेषण होते का, हेही तितकेच महत्त्वाचे आहे.”
त्यांनी सांगितले की, “गेल्या वर्षभरात अमली पदार्थांविरुद्धच्या लढ्यात १५,८७६ बैठका घेण्यात आल्या. आता या बैठका खरोखर उद्दिष्टपूर्तीसाठी होत आहेत का, याचा आढावा घेणे गरजेचे आहे.”
शोधा, कमी करा आणि नष्ट करा….
अंमलबजावणीबाबत बोलताना अमित शाह म्हणाले की, डार्क वेबवर कठोर देखरेख, सिंथेटिक ड्रग्ज तयार करणाऱ्या प्रयोगशाळांचा नाश, तस्करीची संपूर्ण साखळी उद्ध्वस्त करणे, यांना सर्वोच्च प्राधान्य दिले पाहिजे.
ते म्हणाले, “डार्क वेबवर देखरेख, अमली पदार्थांचा प्रसार आणि सिंथेटिक ड्रग्जच्या प्रयोगशाळांवर कारवाई ही आपली प्राथमिकता असली पाहिजे. तस्करांचे संपूर्ण नेटवर्क मोडून काढले पाहिजे. ते पूर्णपणे नष्ट केले पाहिजे. कोणताही किंगपिन (मुख्य सूत्रधार) सुटता कामा नये. शोधा, कमी करा आणि नष्ट करा हीच आपली तीन प्रमुख उद्दिष्टे असली पाहिजेत.”
रिअल-टाइम माहितीची देवाणघेवाण
अमित शाह यांनी राज्यांना गुप्त माहितीची त्वरित देवाणघेवाण करण्याचे आवाहन केले. ते म्हणाले, “सर्व परिस्थितीत रिअल-टाइम माहितीची देवाणघेवाण सुनिश्चित केली पाहिजे. यासाठी अमली पदार्थ नियंत्रण विभाग (NCB) ने अनेक पोर्टल विकसित केले आहेत. सर्व मुख्य सचिव आणि पोलीस प्रमुखांनी आपल्या राज्यांतील गुन्ह्यांची माहिती वेळेत या पोर्टलवर अपलोड करावी. त्यामुळे केंद्र सरकारला प्रकरणांचा आढावा घेऊन आवश्यक सूचना देता येतील.”
आंतरराष्ट्रीय अमली पदार्थविरोधी दिन
२६ जून हा दिवस आंतरराष्ट्रीय अमली पदार्थविरोधी आणि बेकायदेशीर तस्करीविरोधी दिवस म्हणून संयुक्त राष्ट्रसंघाकडून पाळला जातो. या दिवसाचा उद्देश, अमली पदार्थांच्या दुष्परिणामांविषयी जनजागृती करणे, अमली पदार्थांचे व्यसन आणि बेकायदेशीर तस्करीविरोधात लढा मजबूत करणे, हा दिवस १९८९ पासून पाळला जात आहे.
२६ जून ही तारीख चीनचे राजकीय विचारवंत व नेते लिन झेक्झु यांनी ग्वांगडोंग प्रांतातील हुमेन येथे अफू व्यापाराविरुद्ध केलेल्या मोहिमेच्या स्मरणार्थ निवडण्यात आली आहे. ही मोहीम २५ जून १८३९ रोजी, चीनमधील पहिल्या अफू युद्धापूर्वी, यशस्वीरीत्या पूर्ण झाली होती.
