राष्ट्रीय जनता दल (राजद) आणि माजी मुख्यमंत्री राबडी देवी यांच्या कुटुंबाशी गेली जवळपास दोन दशके जोडला गेलेला पटण्यातील १०, सर्क्युलर रोड येथील सरकारी बंगला लवकरच रिकामा होणार आहे. शुक्रवारी (२६ जून) या बंगल्याबाहेरील सीसीटीव्ही कॅमेरे काढण्यात आले, तर घरातील सामानही टप्प्याटप्प्याने नव्या ठिकाणी हलविण्याचे काम सुरू करण्यात आले.
गेल्या सुमारे २० वर्षांपासून हा बंगला राजदच्या राजकीय घडामोडींचे प्रमुख केंद्र म्हणून ओळखला जात होता. राबडी देवी २००६ पासून या सरकारी निवासस्थानी वास्तव्यास होत्या. बिहार विधानसभेतील विरोधी पक्षनेते आणि त्यानंतर बिहार विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते या नात्याने त्यांना हा बंगला अधिकृतपणे देण्यात आला होता. राजदचे अध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांनीही अनेक वर्षे याच निवासस्थानी वास्तव्य केले. दरम्यान, बिहार सरकारने हा सरकारी बंगला आता पशुसंवर्धन व मत्स्य संसाधन मंत्री नंद किशोर राम यांना वाटप केला आहे. तर राबडी देवी यांना बिहार विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते या नात्याने ३९, हार्डिंग रोड येथील सरकारी निवासस्थान देण्यात आले आहे.
माहितीनुसार, राबडी देवी यांनी १०, सर्क्युलर रोड येथील बंगल्यातच राहण्याची परवानगी मागितली होती. मात्र, भवन निर्माण विभागाने त्यांची ही विनंती फेटाळून लावली. विभागाकडून आतापर्यंत चार वेळा नोटिसा बजावत बंगला रिकामा करण्याचे निर्देश देण्यात आले असून, २९ जून ही अंतिम मुदत निश्चित करण्यात आली आहे. त्यानंतर हा बंगला अधिकृतपणे नव्या वाटपधारकाच्या ताब्यात दिला जाणार आहे.
हे ही वाचा:
भारताच्या परकीय चलनसाठ्यात मोठी घसरण
गोपाळगड नेमका आहे तरी कुणाचा? एका व्हीडिओमुळे सोशल मीडियात चर्चा
सोन्याच्या आयातीला मोठा ब्रेक!
संरक्षण सचिव राजेश कुमार बनले डीआरडीओचे अध्यक्ष
दुसरीकडे, हार्डिंग रोडवरील नव्या सरकारी निवासस्थानी काही बांधकाम आणि आवश्यक बदलांचे काम सुरू आहे. राबडी देवी यांनी काही संरचनात्मक बदलांची मागणी केली होती. त्यानुसार भवन निर्माण विभागाकडून आवश्यक कामे केली जात असल्याची माहिती मिळाली आहे. १०, सर्क्युलर रोड येथून सुरक्षा उपकरणे हटविणे आणि घरातील सामानाची सुरू असलेली स्थलांतरण प्रक्रिया पाहता, या बंगल्याचा ताबा हस्तांतरित करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहोचल्याचे मानले जात आहे.
