नाशिकमधील बहुचर्चित टीसीएस प्रकरणात आता आणखी एक महत्त्वाची घडामोड समोर आली असून एआयएमआयएमनंतर आता इस्लाम पार्टीनेही या प्रकरणात उडी घेतली आहे. या प्रकरणातील आरोपींना कायदेशीर मदत देण्यासाठी इस्लाम पार्टी पुढे सरसावली असून पक्षाचे संस्थापक आणि माजी आमदार आसिफ शेख यांनी गरज पडल्यास ही लढाई सर्वोच्च न्यायालयापर्यंत नेण्याची स्पष्ट घोषणा केली आहे. त्यामुळे आधीच राज्यभर चर्चेत असलेल्या या प्रकरणाला आता राजकीय आणि सामाजिक पातळीवर नवे परिमाण मिळाले आहे.
नाशिक न्यायालयात झालेल्या सुनावणीदरम्यान आसिफ शेख स्वतः उपस्थित राहिले होते. आरोपी दानिश शेखच्या बाजूने न्यायालयात युक्तिवाद करण्यासाठी स्वतंत्र वकील नेमण्यात आला असून आरोपींना न्याय मिळावा यासाठी इस्लाम पार्टी सर्वतोपरी मदत करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आरोपींच्या कुटुंबीयांनी संपर्क साधल्यानंतर पक्षाने या प्रकरणात हस्तक्षेप करण्याचा निर्णय घेतल्याचेही त्यांनी सांगितले.
हे ही वाचा:
भडकाऊ वक्तव्य केल्याप्रकरणी ममता यांच्याविरोधात एफआयआर
काय दिवस आले… काँग्रेसला मजबूत करणार उबाठा?
पुण्यातून १.३६ कोटी रुपयांची संशयित बनावट दारू जप्त
केन विल्यमसनचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटला निरोप
सुनावणीनंतर माध्यमांशी संवाद साधताना आसिफ शेख यांनी या संपूर्ण प्रकरणाला धार्मिक आणि राजकीय रंग दिला जात असल्याचा आरोप केला. त्यांच्या मते, संबंधित युवक-युवती एकमेकांच्या परिचयातील होते आणि या प्रकरणातील काही घटनांचे चुकीचे चित्रण करण्यात आले आहे. सत्य समोर आणण्यासाठी आणि आरोपींची बाजू न्यायालयात प्रभावीपणे मांडण्यासाठी इस्लाम पार्टी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी म्हटले. तसेच न्यायासाठीची ही लढाई कोणत्याही दबावाला बळी न पडता सुरू राहील आणि आवश्यक असल्यास सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजेही ठोठावले जातील, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
दरम्यान, आरोपींच्या वकिलांनी न्यायालयात विविध कायदेशीर मुद्दे उपस्थित केले. अटकेनंतर आरोपींना पोलिस कोठडी आणि त्यानंतर न्यायालयीन कोठडी देण्यात आल्याची माहिती देत जामीनासाठी पुन्हा प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. यापूर्वी दाखल करण्यात आलेला जामीन अर्ज फेटाळण्यात आला असला तरी पुढील सुनावणीत नव्या मुद्द्यांच्या आधारे दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
या प्रकरणातील मुख्य आरोपींसह इतर आरोपींच्या जामीन अर्जांवर लवकरच पुढील सुनावणी होणार आहे. विशेष तपास पथकाकडून या प्रकरणाचा तपास सुरू असून विविध आरोपांच्या अनुषंगाने पुरावे गोळा करण्याचे काम वेगाने सुरू आहे. धर्मांतरण, फसवणूक, लैंगिक शोषण आणि कटकारस्थानासारख्या गंभीर आरोपांमुळे हे प्रकरण राज्यभर चर्चेचा विषय ठरले आहे.
आता इस्लाम पार्टीने उघडपणे या प्रकरणात भूमिका घेतल्याने न्यायालयीन लढाई अधिक तीव्र होण्याची चिन्हे आहेत. आगामी सुनावण्यांमध्ये नेमके कोणते नवे पुरावे आणि युक्तिवाद समोर येतात, याकडे राज्यातील जनतेसह राजकीय वर्तुळाचेही लक्ष लागले आहे. आरोपींच्या समर्थनार्थ उभ्या राहिलेल्या संघटनांमुळे आणि वाढत्या राजकीय हस्तक्षेपामुळे नाशिक टीसीएस प्रकरण पुढील काही दिवसांत आणखी गाजण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
