पुलवामात ४० निमलष्करी दलाच्या जवानांची झालेली हत्या हा विषय गेली अनेक वर्षे चर्चेत राहिलेला आहे. या जवानांची हत्या नरेंद्र मोदी सरकारच्या दिरंगाईमुळे झाली असा आरोपही विरोधी पक्षांकडून करण्यात आला. किंबहुना, सरकारनेच आपल्या स्वार्थासाठी ही हत्या घडवून आणल्याचा गंभीर दावाही विरोधी पक्षांनी केला. पण आता पाकिस्ताननेच ही हत्या घडवून आणल्याचे दाहक वास्तव समोर आले आहे. पाकिस्ताननेच त्याची कबुली दिली आहे.
२०१९मध्ये झालेला हा हल्ला पाकिस्तानी लष्कराच्या डावपेचातील अचूकता असल्याची कबुली पाकिस्तानने दिली आहे. विशेष म्हणजे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना पाकिस्तानच्या लष्करी अधिकाऱ्यांनीच ही कबुली दिल्यामुळे या घटनेमागे पाकिस्तानच होता, यावर आता शिक्कामोर्तब झाले आहे.
पाकिस्तानचे एअर व्हाइस मार्शल औरंगजेब अहमद म्हणाले की, पुलवामात आम्ही रणनीतीच्या बाबतीत जे चातुर्य दाखविले, त्यातून आम्ही भारताला संदेश देण्याचा प्रयत्न केला. औरंगजेब हे पाकिस्तान हवाई दलाच्या संपर्क विभागाचे संचालक आहेत. या कबुलीमुळे पुलवामा हल्ल्यामागे कोण होते यावरील पडदा उठला असून पहलगाम येथे २२ एप्रिलला झालेल्या हल्ल्यामागेही पाकिस्तानच असू शकतो, यावरही विश्वास बसू लागला आहे.
हे ही वाचा:
“भारत धर्मनिरपेक्ष राष्ट्र असून मशिदींचे नुकसान केल्याचा पाकचा दावा खोटा!”
अब्दुल कलामांनी ज्यांना निवडले, तेच ‘आकाश’चे निर्माते झाले!
पाकिस्तानी ड्रोनचा टार्गेट होते निष्पाप नागरिक
‘भारत-पाकिस्तान युद्धामुळे विनाश होऊ शकला असता’
औरंगजेब म्हणाले की, जर पाकिस्तानचे अवकाश, जमीन आणि पाणी तसेच जनतेला धमकावले गेले तर आम्ही तडजोड करणार नाही. त्याकडे अजिबात दुर्लक्ष केले जाणार नाही. सैन्यावर पाकिस्तानी जनतेचे असलेले प्रेम आणि विश्वास याला आम्ही कोणत्याही परिस्थितीत तडा जाऊ देणार नाही. पुलवामातील अचूक रणनीतीतून आम्ही ते दाखवून दिले आहे. आता आम्ही डावपेचात्मक अचूकता आणि आमच्या लष्करी कारवायांतील प्रगती दाखवून दिली आहे.
यावेळी नौदलाचे प्रवक्ते आणि लेफ्टनंट जनरल अहमद शरीफ चौधरीही उपस्थित होते.
चौधरी हे पाकिस्तानचे अणुशास्त्रज्ञ सुलतान बशिरुद्दीन महमूद यांचे पुत्र आहेत. ते अल कायदाचा प्रमुख ओसामा बिन लादेनला भेटले होते. त्यावेळी त्यांनी अण्वस्त्र तंत्रज्ञान दहशतवाद्यांना देण्याचा प्रयत्न केला होता.
पाकिस्तानने कायम पुलवामा हत्याकांडाशी आपला संबंध नसल्याचे म्हटले होते. तत्कालिन पंतप्रधान इम्रान खान यांनी हे प्रकरण चिंताजनक असल्याचे म्हटले होते पण पाक लष्कराचा त्यात सहभाग नाही, असे त्यांचे म्हणणे होते.
जैश ए मोहम्मदने या हत्येची जबाबदारी स्वीकारली होती. पाकिस्तानवर यासंदर्भात आरोप करण्यात आले होते, पण त्यांनी यासंदर्भातील पुरावे मागितले तसेच या आरोपांचा त्यांनी इन्कार केला.
भारताने सतत ठामपणे सांगितले होते की पाकिस्तानस्थित दहशतवादी गट पुलवामा हल्ल्यास जबाबदार आहेत, आणि जैश-ए-मोहम्मद (JeM) या गटाने त्याची जबाबदारीही स्वीकारली होती.
२०१९ च्या या हल्ल्याच्या प्रत्युत्तरात भारताने बालाकोटमधील जैश-ए-मोहम्मदच्या प्रशिक्षण तळावर हवाई हल्ले केले होते. याच हल्ल्यात भारताचा अधिकारी अभिनंदन वर्धमान याला पकडण्यात आले होते. पण या दोन देशातील वाढत्या तणावानंतर आणि भारताने पाकिस्तानला सज्जड दम भरल्यानंतर वर्धमानला सोडण्यात आले.
पाकिस्तानची ही अलीकडील कबुली प्रदेशातील सुरक्षाव्यवस्था, भारत-पाकिस्तान संबंध आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानच्या दहशतवादविरोधी भूमिकेवर मोठा परिणाम करू शकते.
आंतरराष्ट्रीय समुदाय या परिस्थितीकडे बारकाईने पाहत आहे आणि येत्या काही दिवसांत राजनैतिक व सामरिक प्रतिक्रिया अपेक्षित आहेत.







