हिंदी भाषेच्या तथाकथित सक्तीवरून गेले काही दिवस महाराष्ट्रात चर्चा सुरू असताना ५ जुलैला राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकाच मंचावर एकत्र आले. विजय मेळाव्याच्या निमित्ताने दोन बंधू १९ वर्षांनी एकत्र आल्यानंतर आता महाराष्ट्राच्या राजकारणातील चित्र बदलणार असे बोलले जाऊ लागले. पण प्रत्यक्षात ही युती होण्याची चिन्हे तूर्तास तरी दिसत नाहीत. राज ठाकरे यांनीच तसे संकेत दिले आहेत.
महाराष्ट्रातील महायुती सरकारने पहिली पासून हिंदी भाषा तिसरी भाषा असेल अशा अर्थाचा जीआर काढला होता. त्यावरून मराठी माणसावर हिंदीची सक्ती असा दावा करत वेगवेगळ्या स्तरावर संताप व्यक्त होऊ लागला. हिंदी भाषिकांना मारहाण केली गेली. ५ जुलैला मोर्चाचे आवाहनही करण्यात आले. मात्र त्यापूर्वीच राज्य सरकारने तो जीआर रद्द केला. तरीही ५ जुलैला वरळीत मनसे आणि उबाठा या दोन पक्षांनी विजयी मेळावा करण्याचे ठरविले. प्रत्यक्षात दोन ठाकरे बंधू एकत्र यावेत ही इच्छा होती. ती अखेर पूर्ण झाली. पण केवळ त्या मंचापुरती. अजूनही राज ठाकरे यांनी या युतीबद्दल कोणतीही सकारात्मकता दाखविलेली नाही.
आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या इगतपुरी येथील तीन दिवसांच्या शिबिरात राज ठाकरेंनी युतीसंदर्भातील आपली भूमिका पुरेशी स्पष्ट केली आहे. ५ जुलैला झालेला मेळावा हा मराठीपुरता होता, त्याचा राजकारणाशी कोणताही संबंध नाही. आता युतीची चर्चा ही नोव्हेंबर डिसेंबरमध्ये तेव्हाचे चित्र कसे आहे, हे पाहून होईल, असा संदेश राज ठाकरे यांनी दिला आहे. त्यामुळे तूर्तास चार महिने युतीबाबतच कोणतीही चर्चा होणार नाही, हे स्पष्ट झाले आहे.
दरम्यान त्रिभाषा सुत्राचा जीआर रद्द केल्यानंतर मुंबईत विजयी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या मेळाव्याला दोन्ही ठाकरे बंधू शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे उपस्थित होते, या मेळाव्यानंतर पुन्हा एकदा शिवसेना ठाकरे गट आणि मनसेची युती होणार असल्याच्या चर्चेनं जोर धरला. मात्र दोन्ही पक्षांकडून अद्याप कोणतीही अधिकृत भूमिका जाहीर करण्यात आलेली नाहीये.
मात्र आजपासून इगतपुरी येथे मनसेचं शिबिर सुरू झालं आहे. या शिबिरामधून मोठी बातमी समोर आली आहे, ती म्हणजे मराठीचा विजयी मेळावा केवळ मराठी पुरताच होता, त्याचा राजकारणाशी संबंध नाही, नोव्हेंबर – डिसेंबरदरम्यान चित्र पाहूनच युतीचा निर्णय घेऊ, असं राज ठाकरे यांनी इगतपुरीत पत्रकारांशी अनौपचारिक गप्पांदरम्यान म्हटलं आहे.
राज ठाकरेंचा तीन दिवस इगतपुरीत मुक्काम
मनसेनं नेते आणि पदाधिकाऱ्यांसाठी शिबिराचं आयोजन केलं आहे, या शिबिराला इगतपुरी येथे आजपासून सुरुवात झाली आहे. या शिबिराच्या माध्यमातून राज ठाकरे हे मनसेच्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. हे शिबिर तीन दिवसांचं असून तीनही दिवस राज ठाकरे यांचा मुक्काम इगतपुरी येथे असणार आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या शिबिराला महत्त्व प्राप्त झालं आहे.







