शिवसेनेत फाटाफूट झाल्यानंतर ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळावा छत्रपती शिवाजी महाराज पार्क मैदानावर पार पडला. पण त्या मेळाव्यात पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांनी तेच मुद्दे, तेच टोमणे, तेच शब्द यांचा वापर करत एकनाथ शिंदे, भाजपा यांच्यावर टीका केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आदल्यादिवशी उद्धव ठाकरेंचे भाषण हे शिमग्याचे भाषण असेल अशी खिल्ली उडविली होती. त्याचीच चर्चा उद्धव ठाकरे यांच्या भाषणानंतर सुरू होती.
उद्धव ठाकरेंनी शिंदे यांच्याबाबत बोलताना पुन्हा खोकासुराचा उल्लेख केला. खोकासुराचे दहन करणार असल्याचे ते म्हणाले. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाबद्दलही त्यांना आनंद झाल्याचे ते म्हणाले. जरांगे पाटील यांनी धनगरांना साद घातल्याचेही समाधान उद्धव ठाकरेंच्या भाषणात दिसले. मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्जचा मुद्दा पुन्हा उद्धव
ठाकरेंनी उकरून काढला. यावेळी त्यांनी लाठीचार्जची तुलना करताना जनरल डायरचा संदर्भ घेतला. जनरल डायरने अमृतसरमध्ये जालियनवाला बागेत घुसून हल्ला केला होता तसेच यांनी पोलिसांना घुसवून आंदोलनात शांत बसलेल्या मराठा आंदोलकांवर हल्ला केला. आपण मुख्यमंत्री असतानाही हा मुद्दा होता पण कधी मराठा बांधवांना मारण्याचे आदेश दिलेले नाहीत, असे म्हणत स्वतःची पाठही थोपटली. पोलिसांवर मात्र ते पुन्हा एकदा घसरले. ते म्हणाले की, जे पोलीस तेव्हा होते तेच पोलीस आजही आहेत. पोलीस इतके रानटी होऊ शकतात का? लाठीहल्ल्याचा आदेश देणारा हा डायर कोण आहे? कोणी याची चौकशी केली का? असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले.
भाजपावर टीका करताना त्यांनी संयुक्त महाराष्ट्र लढ्यात त्यांचा संबंध नसल्याचा राग पुन्हा आळवला. भाजपाचा आणि जनसंघाचा कोणत्याही लढ्यात संबंध नाही. संयुक्त महाराष्ट्र चळवळीतही त्यांचा सहभाग नव्हता. भाजपा जिकडे जाणार तिकडे नाश करणार आणि म्हणूनच मनोज जरांगे पाटलांना सावध करताना ठाकरेंनी जनरल डायरची उपमा मागे सोडून आता भाजपाची तुलना अब्दालीशी केली.
त्या मुद्द्यावरून त्यांनी आमदार अपात्रतेच्या मुद्द्यावरून आपला संताप व्यक्त केला. प्रत्येकवेळी सर्वोच्च न्यायालय यांचे कानफाड फोडत आहे तरी निर्लज्जपणे सांगत आहेत आम्ही आमचंचं वेळापत्रक देणार म्हणत आहेत असे म्हणत न्यायालयाने निर्णय लावायचा तेव्हा लावू देत पण आज देश आणि जग बघत आहे.
घराणेशाहीची बाजू घेताना उद्धव ठाकरे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले घराणेशाही सुरू आहे. त्यावर म्हणीन मी हो मी आहे पाईक. मला माझ्या घराण्याचा अभिमान आहे. पण, जी व्यक्ती कुटुंब व्यवस्था मानत नाही त्यांना यावर बोलण्याचा अधिकार कोणी दिला? करोना काळात महाराष्ट्राला कुटुंब मानलं आणि कुटुंब प्रमुखाचे स्थान मिळालं याचा अभिमान आहे, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी कुटुंबप्रमुख मुद्द्यावरून स्वतःचे कौतुक केले.
बुलेट ट्रेनचा फायदा काय?
बुलेट ट्रेनचा सर्वसामान्यांना कोणताही फायदा नाही, असे बोलत खरंतर गद्दारांना सुरतला सहज पाळता यावं म्हणून ही ट्रेन आहे, असा नवा टोमणा त्यांनी लगावला. गाडल्याशिवाय राहणार नाही, हिंमत असेल तर पीएम केअर फंडची चौकशी करा, लढणार अशी आव्हानेही त्यांनी दिली.
हे ही वाचा:
निलेश राणेंनंतर सुशीलकुमार शिंदेंचाही राजकारणाला ‘जय महाराष्ट्र’
रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांना हार्ट अटॅक?
नाशिकच्या गिरणा नदीत सापडलं कोट्यवधींचं ड्रग्ज
चॅटजीपीटीने लिहिलं काही क्षणात गाणं; बँडने केला लाईव्ह परफॉर्मन्स
करपट ढेकरांना हे विचारांचे सोने म्हणतात
यावर भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशीष शेलार यांनी उद्धव ठाकरेंच्या भाषणाचा समाचार घेतला. ते म्हणाले की, शिवतीर्थावर पूर्वी वंदनीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंची तोफ धडाडत असे. आता “काँग्रेसी हृदयसम्राट” बालिशसाहेबांचे आपटीबार फुटतात. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा एकेरी उल्लेख केलात, त्यावरुन तुमची पातळी दिसली. पंतप्रधानांनी भ्रष्टाचार, घराणेशाहीच्या विरोधात दिलेला काढ्याचा असर झालाय हेही सगळ्यांना कळले. हल्ली मळमळ, उलट्या, अपचन यांच्या करपट ढेकरांना हे विचारांचे सोने म्हणतात, असेही शेलार म्हणाले. परमपूज्य सरसंघचालक मोहन भागवत यांनी नागपूरात वाटले ते खरे विचारांचे सोने! शिवसैनिकांचा खरा भरगच्च मेळावा आझाद मैदानात महाराष्ट्राने पाहिला, अशी टिप्पणीही त्यांनी केली.