गेल्या काही दिवसांपासून उद्धव ठाकरे यांनी विविध ठिकाणी सभा घेण्याचा सपाटा लावला आहे. त्यावेळी ते भाषण करताना जो त्रागा व्यक्त करत आहेत, जी चिडचिड झालेली दिसते आहे ती पाहता ते अजूनही सत्ता गेल्याच्या धक्क्यातून सावरलेले नाहीत हेच दिसून येते. विशेष म्हणजे महाराष्ट्रात घडलेल्या काही घटनांचा आधार घेत त्यांनी उपमुख्यमंत्री तसेच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा मागितला आहे.
खरे तर ही मागणीही तशी नवी नाही. याआधी सुप्रिया सुळे रोज कोणत्याही घटनेवर गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करतात. तसेच उद्धव ठाकरेंना आता फडणवीसांचा राजीनामा हवा आहे. त्यामागील कारणही सगळ्यांना ठाऊक आहे. उद्धव ठाकरे असोत की शरद पवार या दोन्ही पक्षांची शकले पाडण्यात फडणवीसांनी महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे. त्यामुळे या दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये फडणवीसांबद्दल कमालीचा राग आणि संताप असणे स्वाभाविक आहे. त्यातूनच ती राजीनाम्याची मागणी समोर येत असते. पण तेवढेच नाही तर फडणवीसांबद्दल अपशब्दांचा वापर करणे, खालच्या पातळीवर जाऊन टीका करणे हेदेखील आता ठाकरे आणि पवार गटाचे एक लक्षण बनले आहे. त्यातून फडणवीस चिडतील, आपल्याबद्दलही अद्वातद्वा बोलतील, खालची पातळी गाठतील अशी विरोधकांना अपेक्षा असावी. पण फडणवीस या त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत आलेले आहेत. किंबहुना ते सौम्य भाषेतच याबद्दल टीका करतात किंवा बोलतात.
पण आता ठाकरे, शरद पवार या दोन्ही गटाच्या नेत्यांची भाषा बोलणारे आणखी एक संघटन समोर आले आहे ते म्हणजे निर्भय बनो अभियान. गेल्या काही दिवसांपासून या निर्भय बनोचे कार्यक्रम राज्यातील विविध भागात सुरू झाले आहेत. तथाकथित विचारवंत, तथाकथित पुरोगामी, समाजवादी, डावे यांचा हा कार्यक्रम आहे. पण आता तो केवळ वैचारिक भूमिकेतून नाही तर राजकीय भूमिकेतून सुरू झाला आहे. नरेंद्र मोदी यांचे असो की महाराष्ट्रातील शिंदे-फडणवीस-अजित पवार यांचे सरकार असो. ही सरकारे पाडणे आणि इंडी आघाडी किंवा महाविकास आघाडीला पुन्हा सिंहासनावर बसवणे हा या निर्भय बनोचा उद्देश आहे. तसाही हा विचार याआधीही या सगळ्या मंडळींचा होता पण तेव्हा ते पडद्यामागून या भूमिका मांडत असत. आता त्यांनीही महाविकास आघाडीच्या मांडीला मांडी लावून राजकीय संगतसोबत करण्याचे ठरवले आहे. एखाद्या राजकीय पक्षाच्या बाजूला कल असणे यात गैर काही वाटले नसते पण तो कल द्वेषातून निर्माण झालेला आहे. आपल्याला एखादा पक्ष आवडत नाही म्हणून दुसरा पक्ष हवा एवढीच ही भूमिका आहे.
त्यातून या निर्भय बनोच्या सगळ्या सभांत देवेंद्र फडणवीस यांचा उद्धार केला जातो. ते अकार्यक्षम गृहमंत्री आहेत, त्यांनी राजीनामा द्यावा, ते गुन्हेगार आहेत असे म्हणण्यापर्यंत या सभांत भाषण करणारे निखिल वागळे यांची मजल गेली आहे. पुण्यात निखिल वागळे, असीम सरोदे, विश्वंभर चौधरी यांच्यावर हल्ला झाल्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत आम्ही आता महाविकास आघाडीची राजकीय भूमिका स्वीकारल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे आता महाविकास आघाडीत आणखी एक पक्ष सामील झाला आहे, असे म्हणायला हरकत नाही. याआधी विचारवंत वगैरे मंडळी आपापली भूमिका स्वतंत्रपणे मांडत असत पण भाजपाचे केंद्रात आणि राज्यात सरकार आल्यानंतर शिवाय केंद्रात भाजपाचे सरकार तिसऱ्या टर्ममध्येही कायम राहील ही शक्यता जवळपास सगळ्यांनीच व्यक्त केल्यानंतर हे तथाकथित विचारवंत मविआ, इंडी आघाडीच्या आसऱ्याला आले आहेत. महाराष्ट्रात तर उद्धव ठाकरे, शरद पवार या गटांमध्ये पडलेल्या फुटीनंतर त्यांना एकेक माणूस जोडण्याची गरज निर्माण झाली आहे. त्यातून मग त्यांनी या तथाकथित विचारवंतांना जवळ केले आहे. त्यांनाही पक्षांचे छत्र हवे आहे.
असे झाल्यामुळेच पुण्याच्या सभेत रोहित पवार समोर श्रोत्यांमध्ये बसलेले दिसतात. तेही आता या तथाकथित विचारवंतांच्या कळपात सामील झालेले आहेत. कारण या सगळ्यांचा एकमेव शत्रू भाजपा आणि महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस आहे. फडणवीस हे त्यांचे राजकीय विरोधक आता राहिलेले नाहीत तर ते निव्वळ शत्रू बनले आहेत. त्यामुळे या दोन्ही गटात एकाचप्रकारचा त्रागा, संताप, चिडचिड दिसते. त्यांचा शत्रू एकच असतो, त्यांचा विचार मविआचे सरकार राज्यात येणे किंवा भाजपाला पराभूत करणे हाच असतो.
हे ही वाचा:
पंतप्रधान मोदींकडून रोजगार मेळाव्यात १ लाख नियुक्ती पत्रांचे वाटप
एलॉन मस्क दहा लाख लोकांना मंगळावर नेणार!
हल्द्वानी हिंसाचाराप्रकरणी ३० जणांना अटक
भारताचा पुन्हा भ्रमनिरास; १९ वर्षांखालील विश्वचषक ऑस्ट्रेलियाने हिरावला
त्यामुळे आज रोहित पवार हे या सभेला आले असले तरी उद्या कदाचित स्वतः उद्धव ठाकरेही या निर्भय बनो आंदोलनात दिसले तर आश्चर्य वाटायला नको. मागे एक पत्रकार राष्ट्रवादी काँग्रेसच्या सभेत उपस्थित होता. त्यांनी कशी भूमिका मांडली पाहिजे, याविषयी मार्गदर्शन सदर पत्रकाराने केले. त्यामुळे आता काही पत्रकार, तथाकथित विचारवंत, तथाकथित पुरोगामी हे मविआ, इंडी आघाडीचे लाडके बनले आहेत. उद्धव ठाकरे त्यांच्या सभेत जाऊन त्यांचे कौतुक कधीतरी करतील, असेच सध्याचे वातावरण आहे. तसेही वागळे व इतर काही पुरोगामी हे बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाच्या समितीत होते. त्यामुळे त्यांच्यासाठी मविआ ही काही नवी नाही. याचा उद्धव ठाकरेंना किती फायदा आणि या तथाकथित विचारवंतांना किती फायदा हे लवकरच स्पष्ट होईल.