नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणी आमरण उपोषण करत असलेले सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी शुक्रवारी सांगितले की, २० जुलैपर्यंत ते आपले बेमुदत उपोषण सुरू ठेवणार आहेत, जेणेकरून कॉकरोच जनता पक्ष (CJP) आयोजित ‘संसद चलो’ मोर्चाचे ते स्वतः नेतृत्व करू शकतील. त्यांनी विनोदी शैलीत इशारा देत म्हटले की, “२० जुलैचा मोर्चा यशस्वी झाला नाही, तर मी भूत बनून परत येईन.”
शुक्रवारी वांगचुक यांच्या उपोषणाचा २० वा दिवस होता. त्यांची प्रकृती खालावत असल्याने विविध क्षेत्रांतील अनेकांनी त्यांना उपोषण मागे घेण्याचे आवाहन केले आहे. दिल्लीतील जंतर-मंतर येथे आंदोलनकर्त्यांना संबोधित करताना वांगचुक म्हणाले, “२० जुलैपर्यंत मी कोणत्याही परिस्थितीत जिवंत राहीन, जेणेकरून तुमच्यासोबत संसदेकडे मोर्चा काढू शकेन. आणि जर आपला मोर्चा यशस्वी झाला नाही, तर मी भूत बनून परत येईन.”
शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी
शिक्षण व्यवस्थेतील कथित गैरव्यवहारांच्या निषेधार्थ केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत सोनम वांगचुक यांनी २८ जूनपासून बेमुदत उपोषण सुरू केले आहे. दरम्यान, कॉकरोच जनता पक्षाचे (CJP) जंतर-मंतरवरील आंदोलन २८ व्या दिवसात प्रवेशले असून, २० जुलै रोजी होणारा ‘संसद चलो’ मोर्चा या आंदोलनाचा पुढील महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. योगायोगाने २० जुलैपासून संसदेच्या पावसाळी अधिवेशनालाही सुरुवात होत आहे.
“लोकशाहीच्या मंदिरात जाऊन आपली बाजू मांडू”
वांगचुक यांनी समर्थकांना मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करत म्हटले, “मी बाहेरून अशक्त आहे, पण आतून खूप मजबूत आहे. मला खात्री आहे की तुम्हीही आतून आणि बाहेरून मजबूत आहात. हीच ऊर्जा २० जुलैच्या संसद मोर्चासाठी आवश्यक आहे. आपण सर्वजण शांततापूर्ण पद्धतीने संसदेकडे जाऊ आणि लोकशाहीच्या मंदिरात आपली बाजू मांडू.”
“माझे उपोषण सोडण्याची विनंती करू नका”
गेल्या काही दिवसांत अनेक समर्थक, सामाजिक कार्यकर्ते आणि सार्वजनिक व्यक्तींनी वांगचुक यांना उपोषण मागे घेण्याची विनंती केली आहे. मात्र, त्यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले की, “मला उपोषण सोडण्याची विनंती करण्यापेक्षा २० जुलैच्या शांततापूर्ण संसद मोर्चात सहभागी व्हा.”
त्यांचे म्हणणे आहे की, केंद्र सरकारकडून कोणताही प्रतिसाद न मिळाल्याशिवाय उपोषण मागे घेतल्यास चुकीचा संदेश जाईल. त्यांनी पुन्हा एकदा केंद्राशी संवादाची तयारी दर्शवली असून, धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी कायम ठेवली आहे.
हे ही वाचा:
जागतिक अर्थव्यवस्थेवर मंदीचे सावट
चीनच्या रेअर अर्थ निर्बंधांचा जागतिक उद्योगांना मोठा धक्का
शिवसेना नेत्या शायना एन.सी. यांचे व्हॉट्सॲप हॅक; निकटवर्तीयांना गंडा
‘मेहनत, जिद्द, संस्कारांच्या बळावरच गाठता येते यशाचे शिखर’
उपोषण तिसऱ्या आठवड्यात पोहोचताच वांगचुक यांची प्रकृती आणखी खालावली आहे. गुरुवारी प्रसिद्ध झालेल्या वैद्यकीय अहवालानुसार, त्यांचे वजन ५६.६५ किलो झाले असून, गेल्या २४ तासांत ५०० ग्रॅम वजन कमी झाले आहे. उपोषण सुरू झाल्यापासून त्यांचे ९ किलोहून अधिक वजन घटले आहे. डॉक्टरांनी सांगितले की, ते शुद्धीवर असून मानसिकदृष्ट्या स्थिर आहेत, मात्र त्यांना सतत वैद्यकीय देखरेखीची गरज आहे.
दिल्ली उच्च न्यायालयाचे निर्देश
वांगचुक यांच्या प्रकृतीची दखल घेत दिल्ली उच्च न्यायालयाने केंद्र सरकार आणि दिल्ली सरकारला त्यांच्या आरोग्यावर दररोज लक्ष ठेवण्याचे आणि प्रकृती बिघडल्यास तातडीने वैद्यकीय मदत देण्याचे निर्देश दिले आहेत. केंद्र सरकारनेही न्यायालयात सांगितले की, वांगचुक यांच्या प्रकृतीवर बारकाईने लक्ष ठेवले जाईल.
आंदोलनाला मिळाली नवी ऊर्जा
सोनम वांगचुक यांच्या बेमुदत उपोषणामुळे कॉकरोच जनता पक्षाच्या आंदोलनाला नवे स्वरूप मिळाले आहे. सुरुवातीला हे आंदोलन विद्यार्थ्यांनी सुरू केलेले व्यंगात्मक अभियान म्हणून पाहिले जात होते. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी बेरोजगार तरुणांना “झुरळे” आणि “परजीवी” अशी उपमा दिल्यानंतर या आंदोलनाची सुरुवात झाली होती. दोन आठवड्यांनंतर विरोधी पक्षांचे नेते, लेखक, अभिनेते आणि विविध सामाजिक संघटनांनी या आंदोलनाला उघड पाठिंबा देण्यास सुरुवात केली. आज जंतर-मंतरवर येणारे अनेक नागरिक केवळ शिक्षण व्यवस्थेतील कथित त्रुटींविरोधात आंदोलन करण्यासाठी नव्हे, तर सोनम वांगचुक यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी येत आहेत.
तरीही वांगचुक यांचे म्हणणे स्पष्ट आहे की, “फक्त सहानुभूती पुरेशी नाही. २० जुलैच्या संसद मोर्चात किती लोक सहभागी होतात, त्यावरच माझ्या उपोषणाचे यश ठरेल. आणि शेवटी त्यांनी पुन्हा हसत-हसत इशारा दिला, “मोर्चात अपेक्षेइतकी गर्दी झाली नाही, तर मी भूत बनून परत येईन.”







