34 C
Mumbai
Saturday, May 18, 2024
घरदेश दुनियाचारशे कोटींचे खाशाबांचे स्टेडियम महाराष्ट्रात का नाही?

चारशे कोटींचे खाशाबांचे स्टेडियम महाराष्ट्रात का नाही?

Google News Follow

Related

देशातील प्रतिष्ठेच्या खेलरत्न पुरस्काराचे राजीव गांधी यांच्याऐवजी मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार असे नामकरण करण्यात आल्यानंतर वाद होणे स्वाभाविकच होते. त्यात राजकारण आहे, असा आरोप विरोधक करत आहेत. पण मेजर ध्यानचंद यांचे नाव देऊ नये, असे म्हणण्याची हिंमत अद्याप तरी कुणात दिसत नाही. ती नसल्यामुळे महाराष्ट्राचे ऑलिम्पिक पदकविजेते खाशाबा जाधव यांचं नाव का दिले नाही? अन्य खेळांतील खेळाडूंची नावे का दिली नाहीत?  असे ताकाला जाऊन भांडे लपविण्याचे प्रकार केले जात आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे नाव बदलण्यामागे एक कारण आहे ते टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतीय हॉकी संघाने केलेली ऐतिहासिक कामगिरी. तब्बल ४१ वर्षांनी भारतीय पुरुष हॉकी संघाने ऑलिम्पिक पदक जिंकले तर भारतीय महिलाही प्रथमच बाद फेरीत खेळल्या, ब्राँझपदकासाठी कडवा संघर्ष त्यांनी केला. या कामगिरीमुळे देशात हॉकीमय वातावरण झाले. या वातावरणात पुरस्काराचे नाव बदलून तिथे हॉकीच्या जादुगाराचे नाव देण्यात आले असेल तर त्यात वावगे वाटण्याचे कुणाला काही कारण नाही. हा मुहूर्त साधूनच पंतप्रधानांनी हा नामबदल केलेला आहे.

राजीव गांधी यांचे नाव का काढले, असा सवाल उपस्थित करणाऱ्यांनी राजीव गांधी यांचे नाव का दिले, याचे स्पष्टीकरणही देण्याची गरज आहे. तिथे आधीच मेजर ध्यानचंदच नव्हे तर इतर खेळाडूचे नाव देण्याचा का प्रयत्न झाला नाही, हे सांगायला हवे. शिवाय, ज्यांनी हा प्रश्न उपस्थित केला त्यांनी हेही सांगावे की, राजीव गांधी यांचे नाव तर आज असंख्य संस्था, महामार्ग, स्टेडियम्स, विविध योजनांना आहे मग खेलरत्नसारख्या एका पुरस्काराचे नाव बदलल्यामुळे असा काय मोठा गहजब झाला, त्याचीही कारणमीमांसा केली पाहिजे.

‘सामना’ने यावर अग्रलेख लिहीत यात कसे राजकारण आहे, हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे आणि त्याचवेळी खाशाबा जाधव यांच्यासारख्या खेळाडूच्या नावाचा का विचार झाला नाही, असा प्रश्नही उपस्थित केला आहे. प्रश्न योग्यच आहे. पण मग खाशाबा जाधव यांचे नाव अकलुजच्या इनडोअर स्टेडियमचा अपवाद वगळता महाराष्ट्रातील कोणत्याही मोठ्या स्टेडियमला, क्रीडासंकुलाला देण्याचा का प्रयत्न झाला नाही, हेही विचारायला हवे. ज्या खाशाबा जाधव यांनी भारताला पहिले वैयक्तिक पदक हेलसिंकी (१९५२) ऑलिम्पिकमध्ये जिंकून दिले आणि जी महाराष्ट्राची भूमी कुस्तीसाठी ओळखली जाते, त्या महाराष्ट्रात खाशाबा जाधव यांचे स्टेडियमरूपी एखादे ४०० कोटींचे स्मारक का उभारले गेले नाही, हादेखील प्रश्न विचारायला जायला हवा. दिल्लीतील इंदिरा गांधी स्टेडियममध्ये कुस्तीचे स्टेडियम खाशाबा यांच्या नावाने आहे, पण महाराष्ट्रात असे भव्य स्टेडियम तरी आजवर बांधले गेलेले नाही. महाराष्ट्रात आता क्रीडाविद्यापीठ उभे राहणार आहे, असे म्हटले जाते. त्या क्रीडाविद्यापीठाला खाशाबांचे नाव दिले जाणार आहे का? याच खाशाबांनी जे ब्राँझपदक जिंकले ते आपण कधी संग्रहालयात ठेवून ते महाराष्ट्रातील आणि महाराष्ट्राबाहेरील क्रीडाप्रेमींना पाहता यावे असा तरी विचार झाला का?

पंतप्रधानांनी ऑलिम्पिकला जाणाऱ्या खेळाडूंशी संवाद साधला, त्यांचा आत्मविश्वास उंचावला, त्यांना प्रोत्साहन दिले, चीअर फॉर इंडियासारखी मोहीम राबवून भारतीय खेळाडूंच्या पाठीशी सगळा देश असल्याचा विश्वास खेळाडूंना दिला. तेवढेच नाही तर पुरुष हॉकी संघ पदकविजेता ठरल्यावर त्या प्रत्येक खेळाडूशी त्यांनी संवाद साधला. महिला खेळाडूंना ब्राँझ हुकल्याचे दुःख अनावर झाले, तेव्हा त्यांचे सांत्वन करून त्या भारतातील कोट्यवधी तरुणींचे कसे प्रेरणास्थान आहेत, हे सांगितले. असा संवाद याआधी कुणी कधी साधला होता का? का नाही महाराष्ट्रातून ऑलिम्पिकला गेलेल्या खेळाडूंशी आपल्या मुख्यमंत्र्यांनी संवाद साधला, त्यांना भेटायला बोलावले, त्यांचे कौतुक केले? रोजंदारीवर काम करणाऱ्या पालकांचा गुणवत्तावान मुलगा प्रवीण जाधवने तिरंदाजीत कमाल केली, पंतप्रधानांनी मन की बातमध्ये त्याचा गौरव केला महाराष्ट्रात का नाही त्याचे कौतुक झाले? कुणी रोखले होते, अशा खेळाडूंचे कौतुक करण्यापासून.

मुंबईत अंधेरीमध्ये शहाजीराजे क्रीडासंकुल आहे. काय आहे त्या स्टेडियमची अवस्था. तिथे खेळ होत नाहीत, कर्मचाऱ्यांना पगार देण्यासाठी पैसे नाहीत, त्याच स्टेडियममध्ये असलेले वर्ल्डकप संग्रहालय अस्ताव्यस्त झाले. हा शहाजीराजांचा अपमान नाही का? मग भिकेकंगाल होईपर्यंत या स्टेडियम व्यवस्थापनाची अवस्था का होऊ दिली?  शहाजीराजांच्या अपमानाची आधी दखल घ्यायची की राजीव गांधींचा अपमान झाल्याचा उगाच कांगावा करायचा?

पंतप्रधानांनी एका महान खेळाडूचेच नाव पुरस्काराला दिले आहे. त्यात काही वावगे आहे असे जर वाटत असेल तर ध्यानचंद यांच्या नावाविरोधात विरोधकांनी सवयीप्रमाणे आंदोलन छेडायला हवे. आणि जर त्यांना ध्यानचंद यांचे नाव पसंत असेल तर मग ही बडबड तरी थांबवावी. देशातील अनेक संस्था, योजना, रस्ते, चौक यांना राजीव गांधी, इंदिरा गांधी, जवाहरलाल नेहरू यांची नावे आहेत. अनेक वर्षे तीच तीच नावे दिली गेली आहेत. ज्याने भारतीय हॉकीला एक उंची मिळवून दिली, आंतरराष्ट्रीय स्तरावर दबदबा मिळवून दिला, त्याचे नाव पुरस्काराला ठेवले तर एवढी पोटदुखी होण्याचे कारण काय? हे नाव बदलणे ही जर द्वेषभावना असेल तर मग सगळ्या संस्था, योजना, रस्ते, चौक यांना गांधी परिवारातील सदस्यांचे नाव देणे हा अतिरेक नाही का? ध्यानचंद यांना पद्मभूषणने सन्मानित करण्यात आले, त्यांच्या नावे मेजर ध्यानचंद जीवनगौरव पुरस्कारही आहे, हे खरे म्हणून जर त्यांचे नाव खेलरत्नला देण्याची गरज नाही, असे म्हणणे असेल तर मग राजीव गांधी यांचे तरी नाव सगळीकडे देण्याची गरज काय होती, याचाही उलगडा करावा.

हे ही वाचा:
शिवसेना राष्ट्रवादीच्या खुंटीला बांधल्याचे चित्र

फडणवीस-शहा भेटीत काय होणार?

कुठे सापडले पाहा सात कोटींचे अमली पदार्थ

श्रीरामपूरमध्ये संतापाची लाट; लव्ह जिहादचे जाळे टाकून अल्पवयीन मुलीला पळवले

पंतप्रधानांनी घेतलेल्या या निर्णयाचे आजी-माजी खेळाडूंनीही कौतुक केले आहे. लांब उडीपटू अंजू बॉबी जॉर्जनेही म्हटले की, पंतप्रधानांनी खेळाडूंशी जसा संवाद साधला, तसा आमच्या काळात कधी साधला गेला नाही. लोकसत्ता म्हणतो की, पंतप्रधानांकडून अशा कौतुकाची गरज नाही. अमेरिका, जपान, इंग्लंड वगैरे देश असे करत नाहीत. प्रत्येकवेळेला याच देशांशी आपली तुलना करण्याची काय गरज आहे? आपल्याला अपेक्षित पदके लोकसंख्येच्या तुलनेत मिळत नाहीत हे खरेच आहे. त्याची समीक्षा व्हायला पाहिजे. पण त्याला असंख्य गोष्टी कारणीभूत आहेत.

उधारमतवादी क्रीडापत्रकारिता

ही सगळी टिकाटिप्पणी करताना आपण खरोखरच खेळांबद्दल गंभीर असू तर मग आपल्या पत्रकारांना, निदान भाषिक वर्तमानपत्रांमध्ये तरी, दर चार वर्षांनी येणाऱ्या ऑलिम्पिकला पाठविण्याची तसदी का घेतली जात नाही? तिथे गेलेल्या मुक्त पत्रकारांना आपल्या वतीने लिहावे लागेल, अशी परिस्थिती का आली आहे? तिथे गेलेल्या पत्रकारांनी लिहायचे आणि इकडे बसलेल्या आपल्या अधिकृत पत्रकारांनी ते एडिट करण्याची खर्डेघाशी करायची यात कोणते क्रीडाप्रेम आहे? तिथे पत्रकारांना पाठवताना बजेट आडवे येते, मग सरकारने क्रीडाक्षेत्राचे बजेट का कमी केले, असे विचारण्याचा अधिकार राहतो का? आज चॅनल्सना स्वतंत्र क्रीडापत्रकार नाहीत किंबहुना, क्रीडा या विषयासाठी वेगळा कार्यक्रमही दाखवला जात नाही. वर्तमानपत्रात तर क्रीडापत्रकारांची संख्या दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. मग आपण क्रीडाक्षेत्रात सरकार काय करते आहे, असा प्रश्न कुणाला आणि का विचारावा? मुळात आपल्याला क्रीडाप्रेम आहे हे वर्तमानपत्रे, चॅनल्सनीही दाखवून दिले पाहिजे. तिथे जाऊन आपल्या पत्रकारांनी दर चार वर्षांनी येणारा क्रीडासोहळा मग ते ऑलिम्पिक असेल, क्रिकेट वर्ल्डकप असेल किंवा आशियाई क्रीडा स्पर्धा असेल, तो कव्हर करावा, त्याचा आँखो देखा हाल आपल्याच वर्तमानपत्रात ‘एक्स्लुझिव्ह’ असावा असे का वाटत नाही? तेव्हा क्रीडाक्षेत्रात सुधारणा नक्कीच हव्या आहेत, पण त्याची सुरुवात प्रसारमाध्यमांनी स्वतःपासून करावी.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
153,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा