इंग्लंड दौरा संपल्यानंतर भारतीय पुरुष टी-२० संघाच्या कामगिरीचा सविस्तर आढावा घेतला जाईल, अशी माहिती भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) सचिव देवजित सैकिया यांनी दिली. इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या टी-२० सामन्यातील पराभवानंतर भारताने प्रथमच इंग्लंडकडून द्विपक्षीय टी-२० मालिका गमावली आहे.
सैकिया यांनी ‘आयएएनएस’शी बोलताना सांगितले की, भारताचा टी-२० संघ सध्या खराब फॉर्ममधून जात आहे. आयर्लंडविरुद्धची मालिका गमावल्यानंतर आता इंग्लंडविरुद्धही निराशाजनक कामगिरी झाली आहे. त्यामुळे मालिका संपल्यानंतर संघाच्या कामगिरीचे सखोल विश्लेषण केले जाईल.
“भारतीय टी-२० संघ कठीण काळातून जात आहे. खेळाडूंना कोणत्या अडचणींचा सामना करावा लागत आहे, याचा तपशीलवार आढावा घेतला जाईल. १९ जुलैला इंग्लंडमधील एकदिवसीय मालिका संपल्यानंतर लगेचच पुनरावलोकन बैठक होईल,” असे सैकिया म्हणाले.
इंग्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेत भारतीय फलंदाज पूर्णपणे अपयशी ठरले आहेत. तिसऱ्या सामन्यात भारताचा डाव अवघ्या ७६ धावांत संपुष्टात आला होता आणि संघाला १२५ धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता. चौथ्या सामन्यात भारताने ७ बाद १५८ धावा केल्या, मात्र इंग्लंडने हे लक्ष्य केवळ १३.५ षटकांत एका विकेटच्या मोबदल्यात पार केले.
वैभव सूर्यवंशी, तिलक वर्मा, ईशान किशन, अक्षर पटेल आणि शिवम दुबे यांना मालिकेत अपेक्षित कामगिरी करता आलेली नाही. अव्वल आणि मधल्या फळीतील अपयशामुळे भारतीय संघावर सलग दुसऱ्या टी-२० मालिकेत पराभवाची वेळ आली आहे.
भारताला आता टी-२० आंतरराष्ट्रीय क्रमवारीतील अव्वल स्थान कायम राखण्यासाठी शनिवारी साऊथॅम्प्टन येथील द रोज बाऊल मैदानावर होणाऱ्या पाचव्या आणि अखेरच्या टी-२० सामन्यात विजय मिळवणे अत्यावश्यक ठरणार आहे.







