साऊथ आफ्रिकेचे माजी कर्णधार आणि दिग्गज फलंदाज एबी डिविलियर्स शनिवारी मुंबईतील इस्लाम जिमखाना येथे दाखल झाले. येथे त्यांनी व्हीलचेअर क्रिकेट खेळाडूंशी संवाद साधला, त्यांच्यासोबत सराव केला आणि सामना देखील खेळला. यावेळी त्यांनी खेळाडूंना काही मौल्यवान क्रिकेट टिप्सही दिल्या.
‘मिस्टर ३६०’ एबी डिविलियर्स यांना समोर पाहून खेळाडूंचा उत्साह ओसंडून वाहत होता. डिविलियर्स म्हणाले, “व्हीलचेअरवर असतानाही हे खेळाडू हसतमुखपणे क्रिकेट खेळताना पाहणं खूपच प्रेरणादायक आहे. भविष्यात या खेळाडूंना अधिक संधी, सुधारित सुविधा आणि उपकरणांसाठी प्रायोजक मिळावेत, हीच अपेक्षा आहे.”
दरम्यान, आयपीएल २०२५ मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने ९ वर्षांनंतर अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. २९ मे रोजी पंजाब किंग्सविरुद्ध झालेल्या क्वालिफायर-१ सामन्यात आरसीबीने ८ गडी राखून विजय मिळवला होता. आता आरसीबीला पहिलंवहिलं आयपीएल विजेतेपद जिंकण्याची संधी मिळाली आहे.
या पार्श्वभूमीवर एबी डिविलियर्स म्हणाले, “आरसीबीच्या अंतिम फेरीतील प्रवेशामुळे मला खूप आनंद झाला आहे. मुंबई आणि पंजाब यांच्यातील दुसरा क्वालिफायर सामना देखील रोचक ठरणार आहे. सध्या मुंबई संघ मजबूत वाटतो, मात्र क्रिकेटमध्ये कोणतीही गोष्ट शक्य आहे.”
डिविलियर्स यांनी भारतीय युवा खेळाडूंवर विश्वास व्यक्त केला. त्यांनी म्हटले, “शुभमन गिलने जबाबदारी स्वीकारली आहे. भारतात खूप टॅलेंट आहे आणि त्याचे श्रेय आयपीएलला जाते. ही स्पर्धा भारतीय क्रिकेटपटूंना एक उत्तम प्लॅटफॉर्म देते.” यावेळी त्यांनी युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी याचेही कौतुक केले.
विराट कोहलीने नुकतीच टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. यावर प्रतिक्रिया देताना डिविलियर्स म्हणाले, “तुम्हाला तुमच्या मनाचा आवाज ऐकावा लागतो. कोहलीने त्याच्या फीलिंगनुसार निर्णय घेतला. त्याने भारतीय क्रिकेटसाठी खूप काही दिलं आहे. सुदैवाने आपण त्याला अजूनही क्रिकेटच्या मैदानावर खेळताना पाहू शकणार आहोत.”
