हरियाणातील फरीदाबाद येथील तुरुंग प्रशासनाच्या निष्काळजीपणाचे प्रकरण समोर आले आहे. नीमका तुरुंगातील दोन कैद्यांची नावे आणि त्यांच्या वडिलांची नावे सारखीच असल्याने मारहाण करणारा आरोपी तुरुंगात राहिला आणि नऊ वर्षाच्या मुलावर वारंवार बलात्कार करणारा आरोपी सोडला गेला. या निष्काळजीपणामुळे पाच कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे.
२७ वर्षीय नितेश पांडे याला ऑक्टोबर २०२१ मध्ये फरिदाबादमध्ये नऊ वर्षाच्या मुलावर बलात्कार केल्याबद्दल अटक करण्यात आली होती. त्याच्या वडिलांचे नाव रवींद्र असे आहे. दुसरा २४ वर्षीय नितेश, ज्याच्या वडिलांचे नाव देखील रवींद्र आहे, त्याला घरात घुसखोरी आणि मारहाणीच्या आरोपाखाली तुरुंगात टाकण्यात आले होते.
