शरीरसौष्ठवपटूंच्या स्वप्नातील मानाचा किताब मानल्या जाणाऱ्या ‘मुंबई श्री’ स्पर्धेत अखेर बॉडी वर्कशॉप जिमच्या गणेश पेडामकरने आपले नाव कोरले. अनेक वर्षांच्या अथक परिश्रमांना आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांना यंदा यशाची जोड लाभली आणि त्याने मुंबई श्रीचा मान पटकावला. महिलांच्या शरीरसौष्ठव स्पर्धेत बॉडी फिटनेस जिमच्या रेखा शिंदे हिने अपेक्षेप्रमाणे बाजी मारत आपले वर्चस्व कायम राखले.
गणेश पेडामकरसाठी हा विजय अत्यंत खास ठरला. यापूर्वी तो एकदा गटविजेता आणि एकदा कांस्यपदक विजेता ठरला होता; मात्र मुंबई श्रीचे जेतेपद त्याच्या हातातून निसटत होते. अपयशाने खचून न जाता त्याने प्रयत्न सुरूच ठेवले. अखेर चौथ्या प्रयत्नात त्याच्या मेहनतीचे चीज झाले आणि मुंबई शरीरसौष्ठवाचे ‘ऑस्कर’ मानल्या जाणाऱ्या मुंबई श्री किताबावर त्याने मोहोर उमटवली.

चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्सच्या अंतिम फेरीत आठही गटविजेते रंगमंचावर उतरले तेव्हा प्रेक्षकांचे लक्ष गणेश पेडामकर, मनीष वाघेला, अक्षय खोत आणि चेतन नाईक यांच्याकडे लागले होते. या सर्व तगड्या प्रतिस्पर्ध्यांमध्ये गणेशचा पीळदार देहयष्टी, उंची आणि स्नायूंचे संतुलित आकार विशेष उठून दिसत होते. त्याच्या आखीवरेखीव शरीरयष्टीने आणि प्रभावी पोझिंगने जजेसना प्रभावित करत त्याने मनीष वाघेला, अक्षय खोत आणि चेतन नाईक यांना मागे टाकत जेतेपदावर शिक्कामोर्तब केले.
मुंबई शरीरसौष्ठवाची खरी श्रीमंती ज्या मंचावर अवतरते, अशी ही मानाची स्पर्धा बृहन्मुंबई शरीरसौष्ठव संघटना आणि मुंबई उपनगर शरीरसौष्ठव व फिटनेस संघटनेतर्फे मालाड येथील पंडित दीनदयाळ उपाध्याय उद्यानात उत्साहात पार पडली. मोठ्या संख्येने खेळाडूंनी सहभाग घेतल्यामुळे प्रत्येक गट अत्यंत चुरशीचा ठरला. गटविजेत्यांची निवड करताना जजेसचाही चांगलाच कस लागला.

महिलांमध्ये रेखा शिंदेचे वर्चस्व
अलिकडच्या काळात महिलांमध्येही फिटनेस आणि शरीरसौष्ठवाची आवड वाढताना दिसत आहे. त्यामुळे महिलांच्या स्पर्धांना प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळू लागला आहे. यंदाच्या स्पर्धेत बॉडी फिटनेस जिमच्या रेखा शिंदेने दुर्गा कुमारी आणि लविना नरोन्हा यांच्या आव्हानावर मात करत प्रथम क्रमांक पटकावला. तिच्या सशक्त देहयष्टीने आणि आत्मविश्वासपूर्ण सादरीकरणाने प्रेक्षकांचीही मने जिंकली.

संघटनेचे नियोजन पुन्हा ठरले कौतुकास्पद
जय भवानी व्यायाम मंदिर ट्रस्ट आणि नगरसेवक अॅड. सिद्धांत शर्मा यांच्या सहकार्याने आयोजित या स्पर्धेत खेळाडूंचा अभूतपूर्व सहभाग पाहायला मिळाला. मोठ्या संख्येने स्पर्धक असूनही आयोजकांनी अत्यंत शिस्तबद्ध आणि वक्तशीर नियोजन करत स्पर्धा वेळेत पूर्ण केली. गेल्या काही वर्षांप्रमाणे यंदाही स्पर्धा रात्री दहाच्या सुमारास संपल्याने खेळाडू आणि क्रीडाप्रेमींनी संघटनेच्या नियोजनाचे कौतुक केले.
स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा माजी खासदार गजानन कीर्तीकर, आमदार अतुल भातखळकर, नगरसेवक सिद्धांत शर्मा, विजय भोसले, मुंबई अध्यक्ष अजय खानविलकर, सरचिटणीस राजेश सावंत, मुंबई उपनगर शरीरसौष्ठव संघटनेचे अध्यक्ष किट्टी फनसेका, सरचिटणीस विशाल परब, सुनील शेगडे, भारत श्री शाम रहाटे, कुणाल केरकर, नगरसेवक सचिन डोंगरे, माजी नगरसेवक प्रशांत कदम यांच्या उपस्थितीत पार पडला. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी अब्दुल मुकादम, राजेश निकम तसेच जय भवानी व्यायाम मंदिर ट्रस्टचे विश्वस्त आणि संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.
या स्पर्धेतून मुंबई आणि उपनगर संघाची निवड करण्यात आली असून हा संघ १५ मार्च २०२६ रोजी पनवेल येथे होणाऱ्या महाराष्ट्र श्री स्पर्धेत सहभागी होणार आहे.

मुंबई श्री २०२५ स्पर्धेचा निकाल
५५ किलो : १. राजेश तारवे (शाहू जिम), २. कीसन यादव (ए.व्ही. फिटनेस), ३. नीशांत नांदीवडेकर (श्री दत्तगुरु जिम), ४. रजीत बंगेरा (अदीअंश जिम), ५. नितीन शेगर (परब फिटनेस).
६० किलो : १. प्रशांत घोलम (आर्यन पॅराडाईज), २. अक्षय गवाणे (पावर फिटनेस), ३. हसिबुल शेख (परब फिटनेस), ४. पवन विश्वकर्मा (बॉडी वर्कशॉप), ५. सिद्धांत लाड (परब फिटनेस).
६५ किलो :
१. निखिल सावंत (आय.क्यू. फिटनेस),
२. संदीप सावळे (परब फिटनेस),
३. अरुण पाटील (सालम जिम),
४. स्टीफन राजा (परब फिटनेस),
५. सिद्धेश सुर्वे (परब फिटनेस),
७० किलो : १. विशाल धावडे (बालमित्र जिम),
२. संजय जाधव (आर.एम. भट व्यायामशाळा),
३. महेश पवार (सालम फिटनेस),
४. अनिल शिंदे (डी.एन. फिटनेस),
५. मयुर जगताप (माँ साहेब जिम),
७५ किलो : १. मनीष वाघेला (बालमित्र जिम),
२. विश्वंभर राऊळ (माँ साहेब जिम),
३. सुरेंद्र नाईक (परब फिटनेस),
४. नदिम अन्सारी (सावरकर जिम),
५. संदेश धाटावकर (बॉडी वर्कशॉप),
८० किलो : १. गणेश पेडामकर (बॉडी वर्कशॉप), २. सिद्धांत यादव (आर्यन पॅराडाईज)
३. राजेंद्र जाधव (परब फिटनेस),
४. सौरभ म्हात्रे (आय.क्यू. फिटनेस),
५. फ्रान्सिस्को फर्नाडिस (सावरकर जिम),
८५ किलो : १. अक्षय खोत (परब फिटनेस),
२. अमित साटम (माँ साहेब जिम),
३. ओमकार कळके (फिटनेस पॉईंट जिम),
४. सचिन कांबळे (स्टील बॉडी जिम),
५. आयुष तांडेल (परब फिटनेस),
८५ किलो वरील :
१. चेतन नाईक (परब फिटनेस),
२. अविनाश शिंदे (परब फिटनेस),
३. क्षितिज साळुंके (आर्यन पॅराडाईज),
४. मनोज बोचरे (आर्यन पॅराडाईज),
५. अभिषेक लोढे (विशाल फिटनेस).
मेन्स फिजीक १७० सेमी :
१. अनिकेत चव्हाण (प्राईम फिटनेस),
२. अनिश शिंदे (डीएनए ३६० फिटनेस),
३. रोहन भोसले (बी. फिटनेस),
४. नितीन शेरेगर (परब फिटनेस),
५. अनिकेत पवार (आय.क्यू. फिटनेस),
मेन्स फिजिक १७० सेमी वरील
१) निलेश गुरव – माँसाहेब जिम २)रेहमत खान – आदि्यांश जिम
३) असिफ खान – बॉडी वर्क शॉप
४) अमोल कदम – सावरकर जिम
५) रॉजर तावरो – बॉडी वर्क शॉप
महिला शरीरसौष्ठव :
१. रेखा शिंदे (बॉडी फिटनेस),
२. दुर्गा कुमारी (परब फिटनेस),
३. लविना नरोन्हा (आय.क्यू. फिटनेस),
४. अपर्णा झगडे (आय.व्ही. फिटनेस),
५. पूजा चौटमल (माँ साहेब जिम).
किताब विजेता : गणेश पेडामकर (बॉडी वर्कशॉप)
उपविजेता : मनीष वाघेला (बालमित्र जिम)







