28 C
Mumbai
Thursday, September 17, 2026
घरस्पोर्ट्सअखेरची झुंज अपुरी; विश्वचषकात भारत आठव्या स्थानी

अखेरची झुंज अपुरी; विश्वचषकात भारत आठव्या स्थानी

Google News Follow

Related

एफआयएच हॉकी विश्वचषक २०२६ मध्ये भारतीय पुरुष हॉकी संघाचा प्रवास अखेर निराशाजनक पराभवाने संपला. शुक्रवारी झालेल्या सामन्यात भारताला बेल्जियमविरुद्ध शूटआऊटमध्ये ४-३ असा पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळे भारतीय संघाला स्पर्धेत आठव्या स्थानावर समाधान मानावे लागले.

सामन्यात भारताने अखेरच्या क्षणी दमदार पुनरागमन करत निर्धारित वेळेतील खेळ ३-३ असा बरोबरीत आणला. त्यामुळे सामन्याचा निकाल शूटआऊटमध्ये लागला. मात्र, निर्णायक क्षणी बेल्जियमने बाजी मारत ४-३ असा विजय मिळवला.

भारताची आक्रमक सुरुवात

सामन्याच्या सुरुवातीपासून बेल्जियमने आक्रमक फुल-प्रेसचा अवलंब करत भारतीय बचावफळीवर दबाव निर्माण केला. मात्र, भारताने सुरुवातीचा धोका चांगल्या पद्धतीने परतवून लावला. त्यानंतर भारताने सामन्यावर हळूहळू पकड मिळवली.

६व्या मिनिटाला भारताने आघाडी घेतली. मनप्रीत सिंहने अभिषेकला टाइट अँगलवर पास दिला. अभिषेकने जोरदार प्रयत्न केला आणि बेल्जियमच्या व्हॅनाशकडूनच चेंडू गोलमध्ये गेला. त्यामुळे भारताने १-० अशी आघाडी घेतली.

बेल्जियमने लगेच प्रत्युत्तर देत पेनल्टी कॉर्नर मिळवला. मात्र, भारतीय गोलरक्षक सूरज करकेराने हेंड्रिक्सचा फ्लिक अप्रतिमरीत्या रोखला.

बेल्जियमचे पुनरागमन

बेल्जियमचा दबाव वाढत असतानाच भारताला मोठा धक्का बसला. हरमनप्रीत सिंहला यलो कार्ड मिळाल्याने भारताला काही काळ १० खेळाडूंवर खेळावे लागले. या संधीचा बेल्जियमने फायदा घेत भारतीय बचावावर सातत्याने हल्ले केले.

भारतीय गोलरक्षक करकेराने हेंड्रिक्सचे आणखी काही प्रयत्न रोखत संघाला सामन्यात कायम ठेवले.

दुसऱ्या क्वार्टरच्या सुरुवातीला हरमनप्रीत मैदानात परतला. भारताला पेनल्टी कॉर्नर मिळाला, मात्र त्याचे रूपांतर गोलमध्ये करता आले नाही.

यानंतर बेल्जियमने सामन्याचे चित्रच बदलले. २२व्या मिनिटाला डुवेकोटने गोल करत सामना १-१ असा बरोबरीत आणला. त्यानंतर अवघ्या एका मिनिटात बेल्जियमला पुन्हा पेनल्टी कॉर्नर मिळाला आणि लाबोशेरेने त्याचे गोलमध्ये रूपांतर करत बेल्जियमला २-१ अशी आघाडी मिळवून दिली.

पहिल्या हाफअखेर बेल्जियमने २-१ अशी आघाडी कायम ठेवली.

हरमनप्रीतने पुन्हा बरोबरी साधली

इंटरव्हलनंतर भारताने जोरदार पुनरागमन केले. राजिंदर सिंहच्या प्रयत्नातून भारताला पेनल्टी कॉर्नर मिळाला आणि हरमनप्रीत सिंहने दमदार ड्रॅग-फ्लिक करत गोल केला. त्यामुळे भारताने सामना २-२ असा बरोबरीत आणला.

बेल्जियमने या गोलविरोधात व्हिडिओ रेफरल घेतले. मात्र, तपासणीत कोणतेही उल्लंघन आढळले नाही आणि भारताचा गोल कायम ठेवण्यात आला.

यानंतर बेल्जियमने पुन्हा आक्रमण वाढवले. हेंड्रिक्सने पेनल्टी कॉर्नरवरून गोल करण्याचा प्रयत्न केला, मात्र भारताने यशस्वी रेफरल घेतल्याने तो गोल उंचीच्या नियमामुळे नाकारण्यात आला.

अखेरच्या क्वार्टरमध्ये थरार

तिसरा क्वार्टर २-२ असा बरोबरीत संपला. अखेरच्या क्वार्टरच्या सुरुवातीलाच बेल्जियमने पुन्हा आघाडी घेतली. मनप्रीत सिंहच्या चेहऱ्याला चेंडू लागल्याने त्याला रक्तबंबाळ अवस्थेत मैदानाबाहेर जावे लागले.

यानंतर बेल्जियमने आक्रमणाची संधी साधली. चेंडू भारतीय बचावपटूला लागून डी केर्पेलकडे गेला. त्याने मारलेला फटका टर्फवर आदळत थेट गोलमध्ये गेला. त्यामुळे बेल्जियमने ३-२ अशी आघाडी घेतली.

सामना संपण्यास काही मिनिटे शिल्लक असताना भारताने आक्रमण वाढवले. ५७व्या मिनिटाला अभिषेकच्या रिव्हर्स हिटवर व्हॅनाशने शानदार बचाव केला.

२६ सेकंद बाकी असताना भारताचा गोल!

सामना संपण्यास तीन मिनिटांपेक्षा कमी वेळ असताना भारताने गोलरक्षक सूरज करकेराला बाहेर काढून अतिरिक्त आउटफिल्ड खेळाडू मैदानात उतरवला.

भारताचा हा डाव अखेर यशस्वी ठरला. सामना संपण्यास अवघे २६ सेकंद बाकी असताना भारताला पेनल्टी कॉर्नर मिळाला. पुन्हा एकदा हरमनप्रीत सिंहने जबरदस्त ड्रॅग-फ्लिक करत व्हॅनाशला चकवले आणि भारताला ३-३ अशी बरोबरी मिळवून दिली.

निर्धारित वेळेत सामना बरोबरीत राहिल्याने विजेत्याचा निर्णय शूटआऊटमध्ये झाला. मात्र, शूटआऊटमध्ये बेल्जियमने ४-३ असा विजय मिळवत भारताच्या विश्वचषकातील प्रवासाचा शेवट केला.

भारतीय संघाला अखेर आठव्या स्थानावर समाधान मानावे लागले. खिताबाच्या शर्यतीतून आधीच बाहेर पडलेल्या भारताने अखेरच्या सामन्यात झुंज देत पुनरागमन केले, मात्र शूटआऊटमध्ये विजय मिळवण्यात अपयश आले.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
333,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा