आयपीएल २०२६ मधील ४४वा सामना शनिवारी सायंकाळी चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात खेळवला जाणार आहे. दोन्ही संघ सध्या खराब फॉर्ममधून जात असल्याने हा सामना त्यांच्या हंगामासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.
दोन्ही संघांकडे प्रत्येकी ५ आयपीएल किताब असूनही यंदा कामगिरी अपेक्षेप्रमाणे झालेली नाही. सीएसकेने ८ सामन्यांत ३ विजयांसह ६ गुण मिळवत सातवे स्थान गाठले आहे. प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी उर्वरित सामन्यांमध्ये विजय अनिवार्य असल्याने घरच्या मैदानावर सीएसके विजयासाठी जोर लावणार आहे.
मुंबई इंडियन्सची स्थिती आणखी कठीण आहे. ८ सामन्यांत केवळ २ विजयांसह मुंबई इंडियन्स नवव्या स्थानावर असून प्लेऑफमध्ये जाण्यासाठी उर्वरित सर्व सामने जिंकणे गरजेचे आहे. त्यामुळे चेन्नईविरुद्धच्या सामन्यापासूनच पुनरागमन करण्याचे आव्हान मुंबईसमोर आहे.
हंगामातील पहिल्या सामन्यात मुंबईला घरच्या मैदानावर चेन्नईकडून पराभव पत्करावा लागला होता. त्यामुळे या सामन्यात त्या पराभवाची परतफेड करण्याचा प्रयत्न मुंबई इंडियन्स करेल.
दरम्यान, एमएस धोनी आणि रोहित शर्मा यांच्या खेळण्याबाबत अनिश्चितता असून चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे.
दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत ४० सामने झाले असून मुंबईने २१, तर चेन्नईने १९ सामने जिंकले आहेत.
चेपॉकवरील पिच फलंदाजांसाठी अनुकूल मानली जात असून मागील काही सामन्यांत उच्च धावसंख्या पाहायला मिळाली आहे. सामन्यादरम्यान तापमान सुमारे ३५ अंश सेल्सियस राहण्याचा अंदाज असून पावसाची शक्यता अत्यल्प आहे.
या पार्श्वभूमीवर, दोन्ही संघांसाठी हा सामना ‘करो किंवा मरो’ ठरण्याची शक्यता आहे. चाहत्यांचे लक्ष आता या हाय-व्होल्टेज लढतीकडे लागले आहे.







