आयपीएल २०२६ ची सुरुवात टी-२० विश्वचषक २०२६ नंतर लगेचच झाली. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने टी-२० विश्वचषक जिंकला होता. त्या विजयी भारतीय संघात हार्दिक पांड्या, अक्षर पटेल आणि शिवम दुबे हे तीन अनुभवी ऑलराउंडर होते. भारताला सलग दुसऱ्यांदा टी-२० विश्वचषक जिंकून देण्यात तिघांनीही महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यामुळे त्यांच्या आयपीएल फ्रँचायझींनाही यंदाच्या हंगामात त्यांच्याकडून मोठ्या अपेक्षा होत्या. मात्र, तिघांचाही खेळ अपेक्षेप्रमाणे झालेला नाही.
या तिघांच्या तुलनेत एका युवा भारतीय ऑलराउंडरने आपल्या दमदार कामगिरीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. हा खेळाडू म्हणजे सनरायझर्स हैदराबादचा युवा ऑलराउंडर नितीश कुमार रेड्डी. आपल्या आक्रमक फलंदाजीसोबतच उपयुक्त वेगवान गोलंदाजीच्या जोरावर त्याने संघाच्या यशात मोठे योगदान दिले आहे.
२२ वर्षीय नितीशने १० सामन्यांतील ९ डावांत १ अर्धशतकासह २२२ धावा केल्या आहेत. त्याची सरासरी ३१.७१ तर स्ट्राइक रेट १६६.९१ इतका प्रभावी राहिला आहे. याशिवाय त्याने ७ विकेट्सही घेतल्या आहेत. सनरायझर्स हैदराबादने ११ सामन्यांत ७ विजय मिळवत गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले असून, त्यात नितीशच्या खेळींचा मोठा वाटा आहे.
दुसरीकडे, मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्याने ८ सामन्यांतील ८ डावांत १४६ धावा केल्या असून ४ विकेट्स घेतल्या आहेत. दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार अक्षर पटेल ११ सामन्यांतील ८ डावांत केवळ ४४ धावाच करू शकला आहे. गोलंदाजीत त्याच्या नावावर १० विकेट्स आहेत.
चेन्नई सुपर किंग्सकडून खेळणारा शिवम दुबे ९ सामन्यांतील ८ डावांत १५० धावा करू शकला आहे. त्याला एकही अर्धशतक झळकावता आलेले नाही. गोलंदाजीची संधी त्याला फक्त २ सामन्यांत मिळाली असून त्यात त्याने १ विकेट घेतली आहे.







