आयपीएल २०२५ च्या क्वालिफायर-१ सामन्यात पंजाब किंग्जला रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूकडून ८ गडींचा दारुण पराभव पत्करावा लागला. हा सामना गुरुवारी चंदीगडजवळील मुल्लांपूर येथे खेळवण्यात आला. पंजाबच्या फलंदाजांनी पूर्णपणे हार पत्करल्याचे चित्र होते आणि या लाजीरवाण्या कामगिरीने संघाच्या चाहत्यांना मोठी निराशा दिली आहे.
पंजाब किंग्जने प्रथम फलंदाजी करताना केवळ १४.१ षटकांमध्ये १०१ धावांवर सर्वबाद अशी अत्यंत खराब कामगिरी केली. यामुळे आयपीएल प्लेऑफ इतिहासातील तिसऱ्या क्रमांकाचा सर्वात कमी धावसंख्येचा विक्रम पंजाबच्या नावे नोंदवण्यात आला आहे. याआधी २०१० मध्ये डेक्कन चार्जर्सने RCB विरुद्ध ८२ धावा आणि २००८ मध्ये दिल्ली कॅपिटल्सने राजस्थान रॉयल्सविरुद्ध ८७ धावा केल्या होत्या.
पंजाबकडून केवळ तीन फलंदाज दहाच्या वर धावा करू शकले. मार्कस स्टॉइनिसने सर्वाधिक २६ धावा केल्या, तर प्रभसिमरन सिंग आणि अजमतुल्लाह उमरजई यांनी प्रत्येकी १८ धावांचे योगदान दिले. RCB कडून जोश हेजलवुड आणि सुयश शर्माने प्रत्येकी तीन गडी बाद करत पंजाबच्या डावाला हादरा दिला.
१०२ धावांचे सोपे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या RCB ने सुरुवातीला विराट कोहलीचा विकेट ३० धावांवर गमावला. मात्र फिलिप सॉल्टच्या नाबाद ५६ धावांच्या खेळीच्या जोरावर RCB ने केवळ १० षटकांतच सामना जिंकत अंतिम फेरीकडे आपलं पाऊल उचललं.
पंजाब किंग्जला अद्याप क्वालिफायर-२ मधून अंतिम फेरीत पोहोचण्याची एक संधी मिळणार असली तरी या लाजीरवाण्या पराभवानंतर संघाला स्वतःला सिद्ध करण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागणार आहे.







