पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’च्या १३६व्या भागात जपान ओपनचे विजेतेपद पटकावणाऱ्या भारताची स्टार बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूचे कौतुक केले. पंतप्रधानांच्या या गौरवपूर्ण शब्दांमुळे सिंधू भारावून गेली असून, त्यांनी सोशल मीडियावर मोदींचे आभार मानत त्यांच्या शुभेच्छा अधिक मेहनत करण्याची प्रेरणा देत असल्याचे म्हटले.
सिंधूने ‘एक्स’वरील पोस्टमध्ये म्हटले, “सर, आपल्या शुभेच्छा आणि प्रोत्साहनाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद. ‘मन की बात’मध्ये माझा उल्लेख होणे हा माझ्यासाठी मोठा सन्मान आहे. आपले शब्द मला अधिक मेहनत घेण्यास, सर्वोत्तम कामगिरी करण्यास आणि भारताचे नाव उंचावण्यासाठी सतत प्रेरित करतात.”
‘मन की बात’मध्ये पंतप्रधान मोदी यांनी सिंधूचे विशेष अभिनंदन करत ती जपान ओपनचे विजेतेपद पटकावणारी पहिली भारतीय खेळाडू ठरल्याचा अभिमान व्यक्त केला. अंतिम सामन्यात सिंधूने जपानच्या अकाने यामागुचीचा २१-१७, २१-१७ असा सरळ गेममध्ये पराभव करून प्रथमच हा प्रतिष्ठेचा किताब जिंकला.
गेल्या दोन वर्षांतील हा सिंधूचा पहिलाच बीडब्ल्यूएफ किताब ठरला. यापूर्वी तिने डिसेंबर २०२४ मध्ये सैयद मोदी आंतरराष्ट्रीय स्पर्धेचे विजेतेपद पटकावले होते. जपान ओपनमध्ये तिने प्री-क्वार्टर फायनलमध्ये जागतिक क्रमवारीतील पाचव्या क्रमांकाच्या हान यूचा पराभव केला. त्यानंतर क्वार्टर फायनल आणि उपांत्य फेरीत प्रतिस्पर्धी खेळाडू दुखापतग्रस्त झाल्यामुळे सिंधूला पुढील फेरीत प्रवेश मिळाला.
जपान ओपनमधील या ऐतिहासिक यशानंतर पंतप्रधान मोदी यांनी सोशल मीडियावरही सिंधूचे अभिनंदन करत तिची कामगिरी देशातील युवा पिढीसाठी प्रेरणादायी असल्याचे म्हटले.







