भारताचा अनुभवी सलामीवीर रोहित शर्माच्या वनडे निवृत्तीबाबत सुरू असलेल्या चर्चांवर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) अखेर अधिकृत भूमिका स्पष्ट केली आहे. इंग्लंडविरुद्ध लॉर्ड्सवर होणारा तिसरा आणि निर्णायक वनडे सामना हा रोहित शर्माचा अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना नसल्याचे बीसीसीआयचे सचिव देवजित सैकिया यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या निवृत्तीच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.
गेल्या दोन दिवसांपासून विविध माध्यमांमध्ये रोहित शर्मा इंग्लंड दौऱ्यानंतर वनडे क्रिकेटमधून निवृत्त होणार असल्याच्या बातम्या समोर येत होत्या. काही वृत्तांमध्ये राष्ट्रीय निवड समिती २०२७ च्या वनडे विश्वचषकाच्या तयारीच्या दृष्टीने युवा खेळाडूंना संधी देण्याच्या भूमिकेत असून रोहितला पुढील योजनांमध्ये स्थान नसल्याचा दावा करण्यात आला होता.
मात्र, या सर्व चर्चांवर प्रतिक्रिया देताना बीसीसीआय सचिव देवजित सैकिया यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “रोहित शर्माच्या भवितव्याबाबत माध्यमांमध्ये अनेक तर्कवितर्क सुरू आहेत. मात्र, लॉर्ड्सवरील सामना त्याचा शेवटचा वनडे सामना असेल, अशी कोणतीही चर्चा झालेली नाही. अशा वृत्तांमध्ये कोणतेही तथ्य नाही.” सैकिया यांनी पुढे सांगितले की, रोहित शर्मा भारतीय वनडे संघाचा नियमित सदस्य आहे आणि जोपर्यंत तो संघाच्या योजनांचा भाग असेल, तोपर्यंत तो भारताचे प्रतिनिधित्व करत राहील. मात्र, त्यांनी २०२७ च्या वनडे विश्वचषकासाठी रोहितच्या सहभागाबाबत कोणतीही ठोस भूमिका व्यक्त केली नाही.
दरम्यान, इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत रोहितची फलंदाजी अपेक्षेप्रमाणे झालेली नाही. कार्डिफ येथे झालेल्या दुसऱ्या वनडेत त्याला ४७ चेंडूत केवळ २६ धावा करता आल्या. मागील आठ वनड्यांमध्ये त्याने २४१ धावा केल्या असून त्यात केवळ एक अर्धशतक आहे. त्यामुळे त्याच्या फॉर्मवर आणि भवितव्यावर चर्चा रंगू लागली होती. या चर्चांदरम्यान भारतीय संघाचे फलंदाजी प्रशिक्षक सितांशु कोटक यांनीही रोहितच्या पाठीशी उभे राहत, निवृत्तीच्या चर्चांमुळे त्याच्यावर कोणताही दबाव नसल्याचे सांगितले. रोहितसारखा अनुभवी खेळाडू अशा परिस्थिती हाताळू शकतो आणि संघाला त्याच्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा असल्याचे त्यांनी नमूद केले.
हे ही वाचा:
वांगचुक यांना हटवल्यानंतर अभिजीत दिपके आमरण उपोषणावर
इराणमध्ये अमेरिकेच्या हवाई हल्ल्यांत ३८ ठार; ४०० हून अधिक जखमी
दिल्ली पोलिसांनी वांगचुक यांना उचलून नेले रुग्णालयात
‘भारत माता नाही, आरएसएस माता’ म्हणणाऱ्याला टीव्ही चर्चेदरम्यानच चपलेने मारले
भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसरा व निर्णायक वनडे सामना रविवारी ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानावर खेळवला जाणार आहे. मालिका सध्या १-१ अशी बरोबरीत असून निर्णायक सामन्याकडे क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागले आहे. बीसीसीआयच्या स्पष्टीकरणानंतर रोहित शर्माच्या निवृत्तीऐवजी आता त्याच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष केंद्रित झाले आहे.
