टेरीफच्या मुद्द्यावरून अमेरिका भारताला चेपण्याचा प्रयत्न करते आहे. कालपर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत गोड असलेले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड अचानक वाकड्यात का शिरले, याबाबत तज्ज्ञ बऱ्याच कारणांची चर्चा करतायत. त्यातले एक कारण अत्यंत ठोस आहे. भारताने अमेरिकेचा बोलबाला असलेल्या एका अशा प्रांतात पाऊल टाकले आहे, जे अमेरिकेला सहन होणे अशक्य आहे. कालपरवा सुरू झालेल्या एका कंपनीने तयार केलेले एक संरक्षण उत्पादन अमेरिकी दर्जाशी स्पर्धा करणारे आहे, तरीही अमेरिकेपेक्षा ९० टक्के स्वस्त. भारताची हीच क्षमता अमेरिकेला धडकी भरवते आहे. भारत रशियाकडून तेल खरेदी करतो, त्यामुळेच आम्ही भारतावर ५० टक्के टेरीफ लादले हे कारण अत्यंत तकलादू आहे. भारताने आकडेवारीसह हे उघड केले आहे. रशियाकडून सर्वाधिक तेल खरेदी करणारा देश चीन आहे, सर्वाधिक गॅस युरोपियन युनियनमधील देश विकत घेतात, अमेरिकेचा रशियासोबतचा व्यापार गेल्या सहा महिन्यात २० टक्के वाढला आहे, मग भारताने तेल खरेदी केले तर त्यात गैर काय? असा थेट सवाल आपले परराष्ट्र मंत्री डॉ.एस जयशंकर यांनी उपस्थित केला आहे. भारताच्या तेलाबाबत समस्या असेल तर नका करू खरेदी, असेही त्यांनी सडेतोडपणे सांगितले आहे. डॉ.जयशंकर यांनी अमेरिकेचे कारण तकलादू असल्याचे स्पष्ट केले आहे. ते भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने अनेकदा स्पष्ट केलेले आहे. अमेरिकेची समस्या ही नाही. काही तरी वेगळेच खटकते आहे आणि भलतेच दाखवण्याचा प्रयत्न होतो आहे. अमेरिकेने हे स्पष्ट सांगितले नसले तरी काही उदाहरणावरून हे लक्षात येऊ शकते, की भारताचे वाढते तंत्रज्ञान सामर्थ्य अमेरिकेच्या पचनी पडत नाही.



