महाराष्ट्राच्या राजकारणात गौप्यस्फोट आणि भूकंपांचा इतका अतिरेक झालाय की इतके भूकंप जपानमध्ये सुद्धा होत नाहीत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवारांनी एक नवा गौप्यस्फोट केलेला आहे. निवडणुकीच्या आधी दोन लोक भेटले त्यांनी २८८ पैकी १६० जागांची गॅरींटी दिली, असा ताजा गौप्यस्फोट केलेला आहे. हे ऐकल्यानंतर पवारांनी आता फक्त आत्मचरीत्रापुरतं मर्यादीत न राहता, कादंबरी लिखाणाकडे वळावं असा सल्ला आम्हाला द्यावासा वाटतो. पवारांचा धनंजय झालेला आहे. हा महाभारतातला धनंजय नाही, विद्यमान युगातीलच आहे. जुन्या हिंदी सिनेमात स्मरणशक्ती गमावलेल्या एखाद्या नायकाला किंवा नायकाच्या आईच्या डोक्यावर अचानक कसला तरी फटका बसतो, आणि त्यांना पूर्वीचे सर्व काही आठवायला लागते, तसा काहीसा प्रकार पवारांबाबत झालेला दिसतो. २०२४ च्या जून महिन्यात लोकसभेच्या निवडणुका झाल्या. त्यानंतर नोव्हेंबरमध्ये विधानसभा निवडणुका झाल्या. या निवडणुकांमध्ये महायुतीला घसघशीत मतं मिळाली, त्यांची सत्ता आली. नंतर मारकडवाडी पॅटर्नची चर्चा झाली. तेव्हा पवारांना जे काही आठवलं नाही, ते त्यांना आज अचानक कसं काय आठवलं असा प्रश्न अनेकांना पडलेला आहे. मारकडवाडीतील तथाकथित मतदान घपल्याबाबत बोलताना पवारांनी एव्हीएमवर आरोप केले, परंतु आपल्याकडे काहीही पुरावे नसल्याचेही जाहीर केले. याला म्हणतात धाडस, पुरावे नसताना वाट्टेल ते आरोप करायचे.



